तुम्ही शिक्षित की साक्षर ?
शिक्षण म्हणजे नक्की काय?
फक्त लिहिता वाचता येणं म्हणजे शिक्षण की सुज्ञ, सुसंस्कृत होणं म्हणजे शिक्षण की
नैतिकता आंगीकरण्याचं बळ मिळणं म्हणजे शिक्षण की
फक्त प्रश्न विचारणं म्हणजे शिक्षण ? पूर्वीच्या काळी एकच समाज शिक्षित
होता त्यामुळे लिखा पढी , सरकारी दरबारी त्यांचाच रुतबा असायचा असे थोर इतिहासकार,
समाजसुधारक यांनी लिहून ठेवलं आहे. १८१३
मध्ये ब्रिटिश सरकारने अर्थात राणी ने ईस्ट इंडिया कंपनीस शिक्षणात कंपनीची भूमिका
असावी असे आदेश दिले आणि यासाठी सुमारे एक लाखांची तरतूद करण्यात आली. अशी तरतूद
असण्याची ब्रिटिश सत्ताक भारता साठी ही पहिलीच वेळ. परिणामी स्थानिकांच्या
शिक्षणाची जबाबदारी कंपनीस देण्यात आली. पुरोगामी भारतीय मंडळीनी इंग्रजी शिक्षण
आणि पाश्चात्य शिक्षणाच्या प्रसारास अनुकूलता दर्शविली. याच दरम्यान राजा राम मोहन
रॉय यांनी कलकत्ता, मद्रास, येथे संस्कृत महाविद्यालय आणि बंगाल मध्ये प्राच्य
महाविद्यालये स्थापन करण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला विरोध केला. यावर
प्रशासनाने इंग्रजी आणि आशिआई भाषांच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय
घेतला. साधारण १८१७ मध्ये प्रगतिशील बंगालींनी स्थापन केलेल्या कलकत्ता हिंदू
महाविद्यालयास अनुदान मिळाले. महाविद्यालयाने प्रामुख्याने इंग्रजी शिक्षण देण्यास
सुरुवात केली. १७९१ मध्ये प्रथम जॉनथन डंकन याने “संस्कृत” महाविद्यालय बनारस येथे
सुरू केलं पण त्याकाळी शिक्षक जास्त आणि विद्यार्थी कमी अशी अवस्था या
महाविद्यालाची झाली. महाराष्ट्रात कंपनी मार्फत १८२७ मध्ये राज्यपाल एल्फिस्टन
यांचे सन्मानार्थ त्यांचे नावे मुंबई येथे शिक्षणास सुरुवात एल्फिस्टन
महाविद्यालयातून झाली. या महाविद्यालयात अनेक क्रांतिकारी मंडळीनी शिक्षण घेतलं
आणि स्वतंत्रता संग्रामात योगदान दिलं. ही नवी शिक्षण पद्धती, त्यात इंग्रजी
माध्यमातून शिक्षण देण्याचा कंपनीचा हेतु सरळ स्पष्ट होता, की ही शिक्षित मंडळी
प्रशासन कार्यात त्यांना (ब्रिटिशांना) मदत करतील. तेंव्हा एका विशिष्ट समाजाने हे
शिक्षण घेतलं आणि ती मंडळी प्रशासनात काम करू लागली.
शिक्षणात अनेक
स्थित्यंतर आली, काळानुरूप अनेक बदल झाले पण स्वातंत्र्या नंतर भारतीय संविधानाने
सर्वाना शिक्षणाचा अधिकार दिला (कर्तव्य ही दिली आहेत पण तो विषय आज नको) आणि साक्षर
होण्याच प्रमाण वाढत गेलं. अर्थात यामुळे मंडळी साक्षर होऊ लागली पण सुज्ञ आणि
सुसंस्कृत किती झाली ? हा यक्ष प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही. पाटी कोरी असणं आणि
त्यावर रेघोट्या मारणं सोपं असतं पण लिहिलेल्या पाटीवर ती पुसून पुन्हा काही
लिहायचं म्हंटल की अवघड !! आजही आपण साक्षर आहोत का? याचं उत्तर होकारार्थी
देण्यात धन्यता मानणारी मंडळी आहेत. पण नैतिकता, मोठ्यांचा आदर, नम्रता, हे सार
शास्त्रोक्त आणि पुराणोक्त होतं चाललं आहे. याकडे कुणीच लक्ष देऊ शकत नाही? एक
पालक म्हणून तुमची जबाबदारी तुम्ही पूर्ण करणार नाही, तर कोण करणार?
घरात मोठ्यांचा आदर्श
घरातील लहान मंडळी घेतात, त्यानुसारच मार्गक्रमण करतात. हाच नियम समाजात सगळीकडे
लागू होतो असे माझे मत आहे. समाजात नेतृत्व करणाऱ्या मंडळीनी देखील हे ध्यानात
घेणं आवश्यक आहे. सोशल मीडिया वापरत असताना तुम्हीही पाहिलं असाव थोर, ज्येष्ठ
व्यक्तींचा एकेरी उल्लेख, संभाषण भाषेचा स्तर, सगळं खालावत चाललं आहे. यासाठी ही
माध्यमं कोणतीच नियमावली देऊ करीत नाहीत आणि कोणतचं सेन्सॉर नाही. पण आपण एक
शिक्षित आहोत, शिक्षणाचा संस्कार आपल्यावर करण्यात आला आहे हे विसरून कसे चालेल ?
कसलाही विचार न करता कमेन्टायचं (कमेन्ट करायची), मी सर्वज्ञ ही शेखी कुणापुढे आणि
कशासाठी मिरवायची ? अहो, विद्यार्थी म्हणून राहण्यात जे सुख आहे ते कशातच नाही.
एखादी नवीन गोष्ट समजली तर ती समजून घ्या, त्यावर काही शंका असल्यास त्या
क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तींचे (अशा व्यक्तिंना जाती पाती मध्ये अडकवू नका)
मार्गदर्शन घ्या, कमेंट करण्याची कसली घाई एवढी ? बर यामुळे होत काय तर समाजात तेढ
निर्माण होण्यास पोषक वातावरण निर्माण होतं. अक्षरांची ओळख होणं म्हणजे साक्षर
होणं आणि जीवनाची मूल्यं, तत्वं, कौशल्यं आत्मसात करणं आणि त्यानुसार मार्गस्थ
राहणं यास शिक्षण म्हणावं. संस्कार हे घरातूनच सुरू झाले पाहिजेत, आणि मग समाजात
राहताना त्या संस्कारांचा योग्य उपयोग करता येणं हे देखील तितकच महत्वाचं , नाही
का?
आजकाल हेच कुठेतरी
मीसिंग आहे असे नाही का वाटतं तुम्हाला? “साक्षर” तरुण मंडळीना भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिकवणं लक्षात येऊ नये ! ही मंडळी साक्षर झाली आहेत
पण त्यांनी शिक्षण घेतलं नाहीये असेच म्हणावे लागते. कारण ही मंडळी हेतु परस्पर
लक्ष देत नाहीयेत, यांचं लक्ष वेगळच आहे, असा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. डॉ. बाबासाहेब म्हणतात “न्याय्य समाज म्हणजे असा
समाज ज्यामध्ये आदराची चढती भावना आणि तिरस्काराची उतरती भावना, एका दयाळू
समाजाच्या निर्मिती मध्ये योगदान देऊ शकते.” माझ्या मागील लेखात, समस्त महापुरुषांचा
विचार वारसा या विषयी लिहिलं आहे. त्यांनी दिलेला विचारांचा वारसा आपण पुढे
चालवणार नाहीत काय? की सगळे महापुरुष हे फक्त जयंत्या आणि पुण्यतिथ्या साजरा
करण्यात इतपतच मर्यादित ठेवणार आहोत आपण? ज्या नेतृत्वास (उमलते ? कोमेजलेले?
पुनरुज्जीवीत होणारे) मार्केटिंग करून स्वत:चा ब्रॅंड स्थापन करायचा आहे तो / ती
आजकाल अशा जयंती आणि पुण्यतिथीना इवेंट म्हणून ट्रीट करतो. बक्कळ पैसा (कुठून
येतो, कुठे जातो अभ्यासाचा विषय !! ) खर्च होतो, युवकांना इवेंट साजरा करताना
कोणता संदेश मिळतो त्यांनाच माहिती. मराठी राजभाषा दिन नुकताच साजरा करण्यात आला,
विविध ठिकाणी पुस्तकांची प्रदर्शनं भरली, तिथे प्रतिसाद ही मिळाला पण ही जी युवा
पिढी आहे , टिन एजर्स जी सोशल मीडिया सर्वात जास्त वापरते त्यांनी अशा प्रदर्शनास
भेट देणं, पुस्तकांशी मैत्री करणं काळाची गरज आहे असे वाटते. येणाऱ्या ए. आय. च्या
युगात तुम्ही शिक्षित (ज्ञानी) असणं जास्त महत्वाचं आहे फक्त साक्षर असणं काहीच
कामाचं नाही.
अमित बाळकृष्ण कामतकर
ब्लॉगर, लेखक, सल्लागार , व्याख्याता, सॉफ्ट
स्किल ट्रेनर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा