मनमौजी किशोर- अद्वितीय प्रतिभेचा बादशाह
“अकेला गया था , मै , असे म्हणत
किशोर सोबतीला येतो आणि तिथून पुढे संपूर्ण प्रवासात सोबत करतो. मग एल. पी,
कल्याणजी आनंदजी , पंचम , बप्पी इतरही दिग्गज मंडळींच्या सुरांना किशोरने त्याचा
जादुई आवाजाने अमरत्व बहाल केलं आहे. “मै हू झुम झुम झुमरू”, ने वाहनात नवचैतन्य
निर्माण करतो. तर कधी “हमसे मत पुछो कैसे
मंदिर टुटा संपनो का”, अथवा “जिंदगी के सफर मे गुजर जाते है”, म्हणत आठवणींच्या
गर्तेत घेऊन जातो आणि त्यातून पुन्हा उभारी कशी घ्यावी हे सांगण्यासाठी “रुक जाना
नही, तू कही हार के”, असेही अधिकार वाणीने सांगतो. एकंदरीत काय तर किशोर इज ऑल्वेज
विथ यु”, हेच तो सतत सांगत राहतो. किशोरचा अलौकिक आवाज सर्वस्पर्शी वाटतो मला. किशोर
म्हणजे घरातील एक सदस्य, तो कधी मित्र होतो, कधी प्रेमी, कधी मेंटर तर कधी संयमी
मार्गदर्शक, तर कधी गुरु एक ना अनेक रूपात किशोर भेटतो म्हणून तो हक्काचा , आपला
वाटतो. कितीही इच्छा असली तरी आज मी किशोरला भेटू नाही शकत पण त्याचां आवाज सतत
सोबत करतो, तो येथेच कुठेतरी आहे, रफी साहेबांचे एक गीत आहे, “तू कही आस पास है
दोस्त”, अगदी तसेच. खरं तर किशोरदा ने त्याच्यातील लहान मुलास खूप छान सांभाळलं, जपलं
त्यामुळेच अनेक अशक्य प्राय असणाऱ्या गाण्यात किशोर सहज वावरताना दिसतो. त्याचा कुठलाच
सुर कधीच कुठे गडबडला आहे असे शोधूनही सापडत नाही.
किशोरचे अनेक किस्से
आहेत, मागे मी माझ्या लेखातून ते लिहिले देखील आहेत, अपेक्षा की आपण ते वाचले
असावेत. रेकॉर्डिंग करण्यास जाताना किशोर सोबत कुणी नसायचं, पण किशोर एका लहान
मुलाशी सतत बोलत असायचा. एके दिवशी रेकॉर्डिंगला स्टुडिओ मध्ये गेल्यावर आशाजी
सोबत त्या मुलाची ओळख देखील त्याने करून दिली, प्रत्यक्षात कुणीच नव्हतं तरी पण
आशाजीनी ठरवलं की या पुढे त्या लहान मुलाची चौकशी करायची, त्यांनी चौकशी केली की
किशोर स्वत:च लहान मुलाच्या आवाजात उत्तर द्यायचा. या नंतर काही महिन्यातच अमित
कुमारचा जन्म झाला. हा किस्सा येथे
सांगण्याचा उद्देश आपल्यातील लहान मूल सतत एन्जॉय करीत राहिलं पाहिजे, “जिंदगी एक
सफर है सुहाना”, असे किशोर कानात येऊन सांगतो खरा त्याच वेळी तो “आ चल के तुझे मै
लेके चलू”, म्हणत धीरही देतो आणि आपल्या कल्पनेच्या पुढे एक वेगळीच दुनिया आहे आणि
तिथे घेऊन जाण्याची ताकद किशोर कडे आहे या विषयी सतत आश्वस्त करीत राहतो.
गीतकाराचे योगदान
अमूल्यच असतं कारण एखाद्या चालीवर योग्य चपखल शब्द गुंफण्याचे काम तो करतो, हेच
शब्द आपल्या रानरूपी जमिनीवर पेरण्याचे काम गायक करतो, त्यातूनच विचारांचं पीक
जन्मास येतं, नाही का? एखादं गीत आपल्याला एवढं रिलेट करतं की आपण त्याच विचारात
गढून जातो, आणि अशा वेळी किशोर सारखा जादुई आवाजाचा गायक जवळ येतो आणि आपुलकीने
पाठीवर हात फिरवत आपली चौकशी करतो, आपल्याशी संवाद साधतो, धीर देतो, जगण्याची
उर्मी देतो म्हणूनच तो अधिक जवळचा वाटतो. तुम्हालाही असा अनुभव आला असेल, हो ना?
आज कृत्रिम
बुद्धिमत्तेच्या युगात देखील किशोरच्या आवाजाची भुरळ अनेकांना पडलेली आपण पाहतो.
एखादं नव गाणं किशोर कसा म्हणेल अथवा त्याने कसे म्हंटले असते याचा अंदाज कृत्रिम
बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केल जातं आणि ते मूळ कलाकृती पेक्षा उजवं ठरतं ही पण
एक जादुच भासते आपल्याला, अर्थात किशोरच्या आवाजाचे अनेक सॅम्प्ल्स यामध्ये
वापरलेले असतात, त्यात अनेक प्रकारची विविधता असते, नव्या
दमाच्या गायकाने गायलेला रॉ वोकल ऑडिओ ए आय च्या वॉइस क्लोनिंग अथवा वॉइस कन्वर्शन
मॉडेल मध्ये फिड केला जातो त्याच्याकडील डेटा आधारे अद्वितीय स्वर, पोत, शैली या
साऱ्यांचा वापर करून कृत्रिम बुद्धीमत्तेचे मॉडेल नवा आवाज तयार करतं. असो, हा काही
आजचा विषय नाही पण आज ऑनलाइन मध्ये हा ट्रेंड पाहण्यास मिळतो आहे.
तुमच्याही आवडीचे किशोरचे
गीत आणि त्या गीता सोबत तुमची एखादी आठवण असल्यास जरूर कॉमेन्ट करा.
पल पल दिल के पास तुम रहते
हो
© अमित बाळकृष्ण कामतकर
फोटो: गुगल
Khup Chan Sir
उत्तर द्याहटवा