5G तंत्रज्ञान: इंटरनेटच्या पुढच्या क्रांतीची संपूर्ण मार्गदर्शिका

 5G तंत्रज्ञान: इंटरनेटच्या पुढील क्रांतीचे संपूर्ण विश्लेषण

5G म्हणजे पाचव्या पिढीचे मोबाइल नेटवर्क तंत्रज्ञान जे 4G पेक्षा 10 ते 100 पट अधिक वेग, 1 मिलीसेकंदापर्यंत कमी लेटन्सी आणि मोठ्या प्रमाणात डिव्हाइस-कनेक्टिव्हिटी प्रदान करते. हे IoT, AI, स्वयंचलित वाहने, स्मार्ट शहरे आणि क्लाऊड-आधारित सेवांना गती देणारे भविष्याचे नेटवर्क आहे.

आजच्या जमान्यात संपर्कात राहण्याचा खात्रीशीर मार्ग अर्थात इंटरनेट, कनेक्टीव्हिटी हा काही नवीन विषय नाही, 1969 मध्ये इंटरनेटला सुरुवात झाली हे आपण जाणतोच, नेटवर्क मध्ये संगणक जोडणे आणि मेसेज पाठविणे हा मुख्य उद्देश घेऊन झालेली सुरुवात आज विविध कारणांसाठी याचा वापर होताना आपण पहात आहोत. मुख्यत्वे करमणूक त्यानंतर सर्च करणे, इ-कॉमर्स , शिक्षण, संवाद, आदी कारणांसाठी इंटरनेट वापरलं जातं. तंत्रज्ञान जसं प्रगत होत गेलं तशा त्याच्या पिढ्या देखील प्रगत होत गेल्या जसे की 1980 मध्ये 1G, 1990-2G, 2000-3G, 2010-4G आणि आता 5G, खरंच डायल अप इंटरनेट सुविधे मध्ये एक मेसेज रिसीव करण्यास ४५ सेकंद लागायचे हा वेळ कमी होत 4G मध्ये 0.32 सेकंद एवढा कमी झाला आणि आता उपलब्ध होत असलेल्या 5G मध्ये हाच वेळ अवघा 1 मिलि सेकंद एवढा कमी होणार आहे.

5G तंत्रज्ञान दर्शवणारे नेटवर्क ग्राफिक, ज्यात स्मार्ट शहरे, IoT उपकरणे आणि उच्च-गती वायरलेस कनेक्टिव्हिटी दाखवलेली आहे.
हे सारं अद्भुत आहे, ज्यांनी डायल अप कनेक्शन वापरलं त्यांना मी सांगत आहे हे नक्की उमगलं असणार. २००१ / २००२ मध्ये डायल अप कनेक्शन वापरित असताना 56 Kbps इतका स्पीड मिळाला तर खूप आनंद व्हायचा आता 5G मुळे हा स्पीड 20 Gbps इतका मिळणार आहे. म्हणून मी यास अद्भुत म्हणतो आहे. तंत्रज्ञानाचा आविष्कार दुसरं काही नाही.

5G काय आहे?

          5G हे पाचव्या पिढीचे मोबाइल नेटवर्क आहे. 1G, 2G, 3G आणि 4G नंतर हे एक नवीन जागतिक वायरलेस मानक आहे. 5G हे नवीन प्रकारचे नेटवर्क आहे ज्या माध्यमातून मशीन्स, ऑब्जेक्टस, डिव्हाईसेस आणि आभासी पद्धतीने आपल्या प्रत्येकास जोडण्यास सक्षम असणारे नेटवर्क डिझाईन करण्यात आलेले आहे. 5G हे वायरलेस तंत्रज्ञान उच्च-मल्टी-Gbps पीक डेटा गती (डिव्हाईससाठी सर्वात वेगवान डेटा हस्तांतरण दर), अल्ट्रा-लो लेटन्सी (लेटन्सी म्हणजे नेटवर्क मध्ये एका बिंदु पासून दुसऱ्या बिंदुवर जाण्यासाठी लागणार वेळ, हा वेळ 5G मध्ये खूप कमी आहे ज्यामुळे विलंबाचा अनुभव वापरकर्त्यास येणार नाही), अधिक विश्वासार्हता, प्रचंड नेटवर्क क्षमता, वाढीव उपलब्धता आणि अधिक वापरकर्त्यांना समान वापरकर्ता अनुभव प्रदान करण्यासाठी आहे. नवीन उद्योग यां नेटवर्क द्वारे जोडले जातील यात शंकाच नाही. 5G ची रचना केवळ 4G LTE च्या तुलनेत जलद, उत्तम मोबाइल ब्रॉडबॅन्ड सेवा प्रदान करण्यासाठी नाही तर मिशन-क्रिटीकल कम्युनिकेशन्स आणि मोठ्या IoT (इंटरनेट ऑफ थिंग्ज) ला जोडण्यासारख्या नवीन सेवा क्षेत्रांमध्ये विस्तार करण्यासाठी केला जाऊ शकेल. 5G जवळपास प्रत्येक उद्योगावर परिणाम करेल जसे की सुरक्षित वाहतूक, दूरस्थ आरोग्यसेवा, अचूक शेती, डिजिटल लॉजिस्टीक आणखी बरेच काही..

Comparison between 4G & 5G

5G मुळे जीवनात होणारे बदल

          5G  ची रचना आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी बनविण्यात आलेली आहे. ज्यामध्ये जलद डाउनलोड स्पीड, कमी विलंब आणि अब्जावधी उपकरणांसाठी अधिक क्षमता आणि कनेक्टीव्हिटी प्रदान करणे आणि विशेषत: आभासी वास्तविकता (virtual reality), IoT, आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) समाविष्ट आहेत. एक उदाहरण – तुम्ही क्लाऊड सेवांचा उत्तम वापर करू शकाल, मल्टीप्लेयर क्लाऊड गेमिंग, औगमेंटेड रिअलिटी (एखाद्या मॉल मध्ये जाऊन जशी खरेदी करता येते तशीच ऑनलाइन राहून तशाच वातावरणात खरेदी करता येऊ शकेल.) च्या माध्यमातून खरेदी, रियल टाइम व्हिडिओ भाषांतर.  

5G पर्यावरणास कशी मदत करू शकेल?

          5G ची गती , क्षमता आणि कनेक्टीव्हिटी पर्यावरणाचे संरक्षण आणि जतन करण्याच्या अनेक संधी प्रदान करेल. IoT सह 5G तंत्रज्ञान ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यास, हरितगृह वायु उत्सर्जन कमी करण्यास आणि अक्षय उर्जेचा अधिक वापर करण्यास सक्षम असेल. 5G मुळे हवामान, शेती, कीटक, उद्योग, कचरा कमी करणे आणि बरेच काही या विषयी आपले ज्ञान वाढविण्यास मदतगार सिद्ध होईल त्यामुळे मानवाची निर्णय घेण्याची क्षमता सुधारण्यास मदत होईल. युनायटेड नेशन्सच्या मते २०५० पर्यन्त ६८% लोकसंख्या शहरांमध्ये राहणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, शासन स्मार्ट शहरे तयार करण्यासाठी 5G तंत्रज्ञानाचा वापर करू शकतात. ज्यामुळे सेन्सर्स, कॅमेरा, स्मार्ट फोन जोडले जातील ज्या माध्यमातून शहरांच व्यवस्थापन अधिक कार्यक्षम आणि सक्षम होण्यास मदत मिळेल.

उर्जेचा वापर आणि उत्सर्जन कमी करणे: आंतरराष्ट्रीय मानांक नुसार 5G ला 4G च्या तुलनेत कमी ऊर्जेची आवश्यकता आहे, याचा अर्थ अधिक डेटा प्रसारित करताना कमी ऊर्जा वापरली जाईल. उदा. 4G मध्ये 300 हाय डेफीनेशन चित्रपट डाउनलोड करण्यासाठी एक किलोवॅट / तास वीज लागते ; 5G चा वापर करीत असताना एक किलोवॅट/ तासात 5000 अल्ट्रा हाय डेफीनेशन चित्रपट डाउनलोड करू शकतात.

पाणी आणि अन्नाचा अपव्यय कमी करणे: विविध पाण्याच्या वापराच्या ठिकाणी सेन्सर्स लावल्यामुळे पाणी गळती, जल प्रदूषण या विषयी माहिती मिळेल. सेन्सर्स मुळे शेतीच्या पाण्याचा वापरही नियंत्रित करता येऊ शकेल, स्मार्ट कृषि सेन्सर्स मोठी भूमिका बजावू शकतील. एखादे रोप कधी कोमेजू शकते याची माहिती हे सेन्सर्स देऊ शकतात ज्यामुळे योग्य वेळी पिकांची कापणी करण्यात मदतगार सिद्ध होतील. एक स्वयंचलित आणि पारदर्शक प्रणाली हे सुनिश्चित करू शकते की योग्य घटक, योग्य वेळी वितरित केले जातात आणि योग्यरित्या पॅकेज केले जातात यामुळे अन्नाचा अपव्यय कमी करण्यात , अन्न सुरक्षितता वाढविण्यात, अन्नाच्या टिकाऊपणाचे मूल्यांकन करण्यात आणि पुरवठा साखळीला आणि पुरवठा समस्यांना जलद प्रतिसाद देण्यास मदत होईल. 

5G चे पर्यावरणावर संभाव्य प्रभाव:

          5G हे तंत्रज्ञान नवीन असल्याने त्याचे पर्यावरणावर दीर्घकालीन परिणाम अद्याप माहिती नाहीत पण याच्या वापरामुळे नकारात्मक प्रभाव पडू शकतील.

अधिक ऊर्जा वापर आणि उत्सर्जन: सध्या माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान हे जागतिक वीज वापराच्या सुमारे ४ टक्के आणि जागतिक कार्बन उत्सर्जनाच्या १.४ टक्के जबाबदार आहे. पण एरिक्सनच्या अहवालानुसार २०२५ च्या अखेरीस 5G चे २.६ अब्ज ग्राहक असतील, तो पर्यन्त जागतिक मोबाइल सबस्क्रिप्शन ५.८ अब्ज पोहोचण्याची अपेक्षा आहे. २०३० पर्यन्त जगभरातील IoT उपकरणांची संख्या १२५ अब्ज असू शकते, त्यावेळी माहिती तंत्रज्ञान सर्व जागतिक विजेच्या वापराच्या एक पंचमांश असेल आणि उत्सर्जन १४ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

जीवन चक्रावर परिणाम: 5G चा पूर्ण लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नवीन 5G  मोबाइल फोन खरेदी करावे लागतील. एका स्वीडिश अभ्यासानुसार एक स्मार्ट फोन त्याच्या संपूर्ण जीवनकाळात ४५ किलो कार्बनडाय ऑक्साइड (CO2) तयार करतो, त्यातील बहुतेक हे इंटेग्रेटेड सर्किटस उत्पादन करताना, कच्चा माल प्रोसेसिंग, फोन शेलचे उत्पादन, असेंबली आणि वितरण, अॅक्ससरीज आणि मोबाइल नेटवर्क समाविष्ट केल्यास एकूण जीवन चक्रात याचा प्रभाव ६८ किलो कार्बनडाय ऑक्साइड (CO2) एवढा नोंदविण्यात आला आहे.

ई-वेस्ट: जगभरातील ग्राहक 5G  फोनकडे नक्कीच आकर्षित होतील, ते त्याची खरेदीही करतील यात दू-मत असण्याचे कारण नाही, अनेक जून फोन टाकून देणे , IoT डिव्हाईसेसची खरेदी, ज्याचा पुनवापर शक्य आहे तो करता येईल पण शक्य नसल्यास ते टाकून दिले जातील यामुळे मोठ्या प्रमाणात ई-कचरा निर्माण होईल जी आधिच एक मोठी जागतिक समस्या आहे.

रेडीएशन: 5G  च्या पूर्ण उपाययोजनांचा ईको-सिस्टमवर विस्कळीत परिणाम होऊ शकतो, पंजाब विद्यापीठाच्या एका अभ्यासात टॉवरच्या किरणोत्सर्गाच्या संपर्कात पाच ते ३० मिनिटे आलेल्या चिमण्यांच्या अंडीवर विकृत परिणाम दिसून आले आहेत. वायरलेस फ्रिकवेनसी देखील पक्षांच्या नेव्हीगेशनल सिस्टिम मध्ये हस्तक्षेप करीत असल्याचे आढळून आले आहे याच्यामुळे स्थलांतरावर परिणाम पहायला मिळतो आहे. 5G  साठी २०२५ पर्यन्त ७०.२ दशलक्ष लहान सेल टॉवर्स उभे केले जाऊ शकतील, सर्वव्यापी mmWave रेडीएशनचा पक्षी, मधमाशा आणि इतर प्रजातीवर काय परिणाम होऊ शकतो हे माहिती नाही यासाठी वाट पहावी लागेल. 5G इलेक्ट्रोमॅगनेटिक रेडीएशन ऊर्जा निर्माण करून कार्य करते. हे मागील वायरलेस नेटवर्क पेक्षा जास्त फ्रिकवेनसी वापरते, ज्यामुळे इलेक्ट्रोमॅगनेटिक फील्ड (EMF) नावाचे क्षेत्र तयार करते. परिणामी 5Gचा आरोग्यावर कसा परिणाम होतो याची चिंता आहे परंतु सध्या 5Gशी संबंधित कोणतेही ज्ञात आरोग्य धोके नाहीत.

          5G पर्यावरणासाठी वरदान ठरेल की नाही माहिती नाही पण सामान्य व्यक्तीच्या जीवनात आमूलाग्र बदल येतील,  अर्थात जे इंटरनेटचा योग्य वापर करतील त्यांनाच, या तंत्रज्ञानामुळे मिळणारा स्पीड हा कुतूहलाचा विषय नक्कीच आहे आणि अनुभवण्यात खरीच एक वेगळी मजा आहे. 5G चे स्वागत करण्यास तूर्तास हरकत नसावी पण तुमच्याकडील जुना फोन टाकून देताना ई-वेस्ट विषयी जागरूकता पाळायचा सल्ला मी नक्की देईन.

 "5G तुम्हाला कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा बदल घडवून आणेल असं वाटतं?” — कमेंट करा


अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर | सल्लागार | लेखक | सॉफ्ट स्किल ट्रेनर | व्याख्याता


तंत्रज्ञान विषयक लेख: तंत्रज्ञानाची कमाल – टेक २


Comparison Table source: Difference between 4G and 5G network architecture | TELCOMA Global

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?