फॉलोअर

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

 

ब्रिटिश काळात राजकीय चळवळ जनसामान्यां पर्यन्त पोहोचावी यासाठी विविध मार्ग शोधण्याची निकड वाटू लागली असता टिळकांचे लक्ष गणपती बाप्पा कडे गेले आणि त्यांनी गणेश उत्सव सार्वजनिक रित्या साजरा करणेचे ठरविले आणि त्याकाळात पुण्यातील काही प्रतिष्ठित मंडळींच्या सहकार्याने उत्सवास सार्वजनिक स्वरूप प्राप्त झाले. यास ठोस अशी कारणं देखील होती, त्याकाळातील भाषा माध्यम इंग्रजी आणि त्याची व्याप्ती खूप कमी , सोबतच सामान्य माणसास ब्रिटिश जुलमी राजवटी विरोधात जन-जागृती करणे , त्यांच्या भाषेत त्यांना विषय समजावा त्यासाठी जमाव जमविणे खूप कठीण, कॉंग्रेस मध्ये मवाळ नेतृत्व ज्यांचा भर हा पत्रव्यवहार, निवेदनं देणं यावर असायचा परंतु टिळकांना हे मान्य नव्हतं त्यासाठी त्यांनी उत्सवास सार्वत्रिक स्वरूप देण्याचे निश्चित केले. पेशवे काळा पासून उत्सव साजरे केले जायचेच. पण ते सार्वजनिक नव्हते.  ही पार्श्वभूमी प्रथम मांडण्याचे कारण म्हणजे सार्वत्रिक उत्सवाची गरज आणि त्यामागची भूमिका- स्वातंत्र्यपूर्व काळात काय होती आणि आता काय आहे? थोडा विचार केल्यास स्वातंत्र्यानंतर या सार्वत्रिक उत्सवाची खरीच गरज आहे का? कोणत्या विषयावर लोकजागर व्हायला हवा आणि त्याप्रमाणे होतो आहे का? असे एक ना अनेक प्रश्न पडण्यास हरकत नाही. पण आपण दुर्लक्ष करण्यात धन्यता मानतो आणि काळ सोकावतो.

भारतीय मंडळी उत्सव प्रिय आहेत यात शंकाच नाही. धार्मिक उत्सवाचे सार्वत्रिकरण करणेस सुरुवात झालेला विषय, सध्या त्या त्या जाती मधील वंदनीय, पूजनीय व्यक्तींचे उत्सव साजरे करण्यापर्यन्त येऊन थांबला आहे. त्याचे प्रस्थ वाढते आहे. प्रत्येक समाजाने त्यांच्या समाजातील थोर व्यक्ति शोधून त्याच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरा करणेचा सपाटा लावला आहे. नक्कीच या थोर व्यक्तिं कडून आपण शिकावं का? तर त्याचे उत्तर होकारार्थीच असेल आणि असाव, त्यांचे विचार डोक्यात घेणं आणि त्याप्रमाणे मार्गक्रमण करणें यामध्ये साऱ्यांच हित दडले आहे पण हा साधा विचार आजही रुजत नाहीये हे खूप खेदाने नमूद करावं वाटतं. ब्रिटिश सरकारने १८५७ च्या बंडा नंतर वचन दिले होते की “भारतीय लोकांच्या धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही”, ते वचन स्वातंत्र्यानंतर आजही पाळले जाते हे केवढं मोठं विशेष !! सामान्य माणूस हे सारं फक्त लांबून पहात असतो. सारे  उत्सव, जयंती, पुण्यतिथी कर्ण कर्कश डॉल्बी मध्ये साजरी करण्यात काय साध्य होतं? हे एक ओपन सिक्रेट आहे. समाज माध्यम (प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक) देखील यास प्रसिद्धी देत राहतात, त्यामुळे यात काहीच गैर नाही असा समज प्रचलित होण्यास मदत मिळते. मिसरूड न फुटलेले पण भावी नेते म्हणून मिरविण्यास इच्छुक असणारी मंडळी भल्या मोठ्या फ्लेक्स वर प्रकट होतात आणि सामान्य माणूस नियमांची पायमल्ली उघड्या डोळ्यांनी पहात राहतो. नियम, शिस्त हे शब्द फक्त पुस्तकात वाचण्यास आणि शाळेत ऐकण्यास बरे वाटतात. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकरांनी भारतीय संविधानात प्रत्येक भारतीयाचे अधिकार आणि कर्तव्य दोन्ही विषयी अगदी स्पष्ट सांगितले आहे. पण आपण नेहमी अधिकारास झुकतं माप देत आलो आहोत. जरा कर्तव्या कडे लक्ष देऊया. आपले वरिष्ठ नेते मंडळी काय करतात त्याची कॉपी (पुनरावृत्ती) पुढची पिढी करते आणि तेच घडत आहे , बरं मोठाले फ्लेक्स लावून मिरवणुका काढून आपण काय सिद्ध करणार आहोत? तर काहीच नाही फक्त मिरवणूक केवढी मोठी आणि ती इतरांपेक्षा कशी जोरदार होती हे सिद्ध करायचं आणि मिरवायचं !! या लेखा सोबत श्री उन्मेष शहाणे, सोलापूर यांचे व्यंगचित्र बरेच काही सांगून जाते, भविष्यात असे प्रश्न लग्नाळू मुलांच्या पालकांनी नाही विचारले तर नवलच !! आजच जागे होणे काळाची गरज वाटते मला.  


उत्सव सार्वजनिक करण्यात एकत्र येणे, एकोपा वाढविणे, संदेश पोहोचविणे आणि एकजुटीने ब्रिटिश सरकार विरुद्ध लढा देणे असे उद्देश होते, तसे आता होताना दिसतं नाहीच उलट एकाच गल्लीत अनेक मंडळे असतात त्यातच त्यांची एकमेकाशी स्पर्धा असते, थोडसं थांबा आणि पहा आपण कुठे जात आहोत? काय करत आहोत? यामुळे कुणाचा फायदा होतो आहे? उत्सव, जयंती साजरी करणे म्हणजे एक मार्केटिंग इवेंट बनला आहे. याची कॉंट्रॅक्ट घेतली जातात आणि एखाद्या उमलत्या (?) नेतृत्वाचे (?) लॉंचिंग करायचं असल्यास तेही याच काळात केलं जातं. कुठलेही थोर नेते, मग ते समाजातील असतील अथवा राष्ट्रीय स्तरावरील असतील,  कुणालाच त्यांच्या विचारांचं  काहीच  पडलं नाहीये, फक्त जल्लोष करणं , गोंधळ घालणं हा व्यक्ति स्वातंत्र्याचा अधिकार समजला जातो त्यावर गंडातर येऊ द्यायचं नाही. पूर्ण उपभोग घ्यायचा, “अरे”स - “का रे?” करण्यास कुणी कमी पडतं नाहीत हे वेगळं सांगायची गरज वाटतं नाही. सोलापूर हे देखील असचं एक उत्सवप्रिय शहर. पोलिस मित्रांचा वर्षभरातील बहुतांश वेळ हा उत्सवा दरम्यान बंदोबस्त लावण्यात खर्ची होतो असे सर्वेक्षण सांगते.

सोलापुरात महानगरपालिकेने “नो डिजिटल झोन” जाहीर केलेले आहेत. पण याचं कोणतच सोयर-सूतक मान्यवर नेते मंडळींना दिसत नाही. आपण शहराचे विद्रूपिकरण करत आहोत. असा विचार देखील मनास शिवत नाही हे विशेष !!! फ्लेक्स महापालिकेचे शुल्क आणि परवानगी घेऊन लावले तर स्वागतच पण तसे होत नाही. जयंती आणि उत्सवाच्या निमित्ताने युवकांच्या हातास काम द्यावं , रोजगार, स्वयं-रोजगार मेळावे भरवावेत असे जर घडू लागले आणि त्या माध्यमातून युवक घडू लागला तर देश मजबूत होईल आणि अशा नेत्यास निवडून येण्यासाठी मिरवणुका काढायची गरज भासणार नाही.

जागो रे !!

 

टीप: हा लेख वाचताना वक्र दृष्टीच्या चष्म्याने वाचू नये. मला सर्व समाजातील सर्व मान्यवर, पूजनीय, वंदनीय व्यक्तिं विषयी नितांत आदर आहे, पण सामाजिक बदल घडावा , उत्सव साजरा करण्याचा नवा पायंडा पडावा हा शुद्ध हेतु या लेख लिहिताना आहे.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


व्यंगचित्र साभार: श्री उन्मेष शहाणे, सोलापूर

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?