फॉलोअर

एआय शिक्षकांची जागा घेईल ?

 


 “माणसाला अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे “हात” धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, हा संदेश कदाचित तुम्ही देखील वाचला असेल, आताच युग हे एआय (आर्टिफिश्यल इंटेलिजेंसच) युग, बऱ्याच गोष्टी एआय मुळे बदलत आहेत. पण खरच एआय शिक्षकांची जागा घेऊ शकेल? हा प्रश्न बरेच दिवस मनात घोळतो आहे, कारण पहा “जनरेटीव एआय” ने खूप कमाल केली आहे. एका कंपनीचे अथवा स्वत:चे प्रॉफिट लॉस शिट वाचण्याचे तंत्र प्रत्येकास आत्मसात असतेच असे नाही, आता जनरेटीव एआयला हा प्रश्न विचारला तर लागलीच पूर्ण प्रॉफिट लॉस शिट एआय समजावून सांगेल. तेही काही क्षणात आणि अगदी तुम्ही म्हणाल त्या भाषेत !! मग ही कमालच म्हणावी लागेल. अगदी ह्याच प्रकारे कायदेशीर, वैद्यकीय सल्ला देखील एआय देऊ करीत आहे. अर्थात त्याच्याकडील डेटाच्या आधारेच हे सारं सुरू आहे. माणसाने मशीन्सना पुरविलेल्या माहितीच्या आधारे अनेक अचंबित करणारे निकाल एआय देऊ करीत आहे. काही ठिकाणची जॉब्स जातील तर काही जॉब्स नव्याने तयार होतील. जॉबची नावे बदलतील या साऱ्याचे आपण साक्षीदार होणार आहोत हे नक्की !

आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इंटेरनेटच्या मायाजाळात माहिती सहज उपलब्ध होत आहे, ज्ञान नाही. तंत्रज्ञानाचा टच होतो पण “ह्युमन टच” तितकाच महत्वाचा आहे. भारतातील प्राचीन गुरुकुल शिक्षण पद्धती ज्ञानार्जन करण्याची पद्धत रूढ आहे. ती सर्वश्रुत आहे. गुरुकुला मध्ये विविध विषयांचा जसे की खगोलशास्त्र, तत्वज्ञान, गणित, विज्ञान, कायद्यांचा (धर्मशास्त्र) अभ्यास, अर्थशास्त्र, आयुर्वेद, धनुर्विद्या (संरक्षण अभ्यास ), वेद, वेदांग याची शिकवण देत असताना निती मूल्यांची शिकवण आवर्जून दिली जायची. विद्यार्थी गुरुकुल मध्ये प्रवेश घेतल्यापासूनच त्यास वर नमूद केलेल्या विषयां व्यतिरिक्त लाइफ स्किल्सची शिकवण दिली जात असे. विविध कृती मधून गुरु शिकवणं द्यायचे विद्यार्थी त्यांच्या सोबतच असत, त्यामुळे निरंतर शिक्षण प्रक्रिया सुरू रहात असे. विद्यार्थ्याना पडणारे प्रश्न हे फक्त अभ्यासक्रमातील असतील असे नव्हते, त्यामुळे गुरु “ज्ञानी” असणे क्रमप्राप्त होतं.  भारतात ब्रिटिश राजवट सुरू झाल्यानंतर या गुरुकुल प्रणालीमध्ये बदल झाला किंवा त्या ठरवून बंद करण्यात आल्या. अर्थात हा विषय वेगळा या विषयावर पुन्हा कधीतरी लिहिन. महाभारतातील एक प्रसंग आठवतो का पहा, द्रोणाचार्यांनी अर्जुनास पक्षाच्या डोळ्याचा वेध घेण्यास सांगितले, तो कसा घ्यायचा, त्यासाठी काय करायचं हे सर्वस्वी अर्जुनाने ठरवलं. अर्थात त्याच्याकडे ते कौशल्य होतं म्हणूनच द्रोणाचार्यांनी त्यास सांगितले. कोणतीही एस. ओ. पी. (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) देण्यात आली नव्हती हे विशेष !! काही ठिकाणी या एस. ओ. पी वरदान आहेत तर काही ठिकाणी यास ढाल म्हणून वापरले जाते. जेवढे सांगितले आहे तेवढेच काम उरकले जाते, अथवा ते काम माझे नाही म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामुळे परफॉर्मेंस कमी होऊ शकतो, नव्हे होतोच.        

माहितीचा खजिना जो इंटरनेट वर उपलब्ध आहे तो वापरण्यासाठी कुठल्याही विशेष प्रशिक्षणाची गरज आता राहीली नाही, पूर्वीही ती कधी खास आवश्यक नव्हतीच पण विद्यार्थी मंडळी सहज कोणतीही गोष्ट वाचून , प्रयत्न करून पाहू शकतील. हे प्रमाण कमी आहे. कारण आजही आपल्याकडे शिक्षकांस फिजिकली क्लासरूम मध्ये पाहण्याची आणि मगच शिकण्याची सवय विद्यार्थ्याना आहे. तीच शिकवण आता शिक्षकांच्या बदललेल्या रोल मध्ये देता येईल असे मला वाटते. शिक्षक नव्या भूमिकेत जातील हे नक्की, ती भूमिका असेल मार्गदर्शकाची, ज्यास इंग्रजी मध्ये “मेंटर” असे म्हणतात. मेंटर म्हणजे एक अनुभवी व्यक्ति जी मार्गदर्शन करण्यास सक्षम असेल आणि कौशल्य विकासास प्रोत्साहन देइल. ज्ञान हस्तांतरण आणि अध्यापन यातील फरक लक्षात घेण्याची गरज मला वाटते.

शिक्षण घेण्याच्या विविध शैली विद्यार्थी माहिती समजून घेण्यासाठी आणि लक्षात ठेवण्यासाठी वापरतात. विद्यार्थ्यांच्या विविध शैली समजून घेऊन त्यांच्या आवडीनुसार अभ्यासक्रम तयार केले जातात. शिकण्याच्या विविध शैली ज्यामध्ये विजुवल, ऑडिटोरी, रीड-राइट आणि कायनेस्थेटिक असे प्रकार येतात. यामध्ये प्रामुख्याने विजुवल- या प्रकारात विद्यार्थी या प्रकारच्या  नावाप्रमाणे विजुवल, हा प्रतिमांशी संबंधित आहे. जसे की अॅनिमेशन किंवा विडिओ, चित्रं, आकृत्या सोबतचे तक्ते असेलेले धडे, कलर कोडिंग / हायलाइट करणे इ. ऑडीटोरि या प्रकारात विद्यार्थी मिळणाऱ्या तोंडी सूचना आणि मार्गदर्शनावर अवलंबून असतात. शाळा वर्गात होणारे लेक्चर्स द्वारे मिळणारे ज्ञान या प्रकारातील मुलांना उत्तम प्रकारे समजते. रीड-राइट या प्रकारातील विद्यार्थी लिखित माहितीद्वारे शिकविल्यास उत्तम प्रकारे शिकतात. या प्रकारात नोट्स काढणे आणि अभ्यास करणे याला प्राधान्य देतात. कायनेस्थेटिक या प्रकारात एखादी गोष्ट स्वत: करण्याकडे, करून पाहण्याकडे कल असतो. शिक्षण प्रक्रियेचा भाग म्हणून कोडी सोडविणे, समस्या सोडविणे त्यातूनच नव कौशल्य शिकणे याकडे कल असतो. आपण हे ध्यानात घेतलं पाहिजे की एका व्यक्तीच्या अनेक शैली असू शकतात. त्यांना मल्टीमोडल लर्नर म्हणून ओळखले जाते. ही मंडळी माहिती ग्रहण करतात आणि एका पेक्षा जास्त शैलिंचा वापर करून शैक्षणिक प्रवासात अग्रेसर राहतात. थोडं सोप्या शब्दात –

शिकण्याचे मुळात तीन प्रकार.

1) पाहुन शिकणे

2) ऐकुन शिकणे

3) करुन पाहणे (स्वत:- स्वयं अध्ययन )

मुळातच शिकणे व शिकवणे हे अनेक मानवी इंद्रियांचा संगम आहे. ऐकण्यासाठी कानांचा, पाहण्यासाठी डोळ्यांचा , मनाचा व भावनेचा या गोष्टींचा शिकण्यात व शिकविण्यात उपयोग होतो.

फिजिकल टिंचिंग मध्ये भाव भावना व स्पदंनाचा समावेश होतो. आर्टिफिशीयल टिचिंग मध्ये विद्यार्थी भावनेने जोडला जाईल, असे नाही. स्क्रीन वरील टिचिंगला लिमिटेशन आहेत. हा प्रकार केवळ पाहुन शिकणाऱ्या विद्यार्थ्यां साठीच उपयोगाचा आहे. विद्यार्थी मानवी शिक्षकाकडे शिकायला विविध कारणांनी येतात, जरी एआय टूल्स उपलब्ध असतील आणि भविष्यात आणखी उपलब्ध होतील. काही महत्त्वाची कारणे अशी आहेत:

१. मनोवैज्ञानिक घटक: मानवी शिक्षक विद्यार्थ्यांसोबत एक भावनिक आणि मानसिक कनेक्शन निर्माण करू शकतात. शिक्षकांच्या उपस्थितीत विद्यार्थी अधिक आरामदायक आणि प्रेरित होतात, तसेच ते अधिक उत्तेजित होतात.

२. वैयक्तिक अभिप्रेरणा: एआय टूल्स सामान्यत: एकसारखे उत्तरं देतात (सध्या त्यांच्याकडील उपलब्ध डेटा प्रमाण यास कारणीभूत आहे. जो डेटा जसा वाढेल त्याप्रमाणे रिजल्ट्स मिळतील, पण त्यास कालावधी जावा लागेल), पण शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या गरजांनुसार मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देऊ शकतात.

३. स्पष्टता आणि संवाद: शिक्षक थेट संवाद साधू शकतात, शंका निरसन करू शकतात आणि जास्त स्पष्टतेने सांगू शकतात, जे एआय सिस्टमसाठी नेहमी शक्य नसते.

४. प्रभावी शिक्षण पद्धती: शिक्षक विविध शिकवणी पद्धतींचा वापर करू शकतात, विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार प्रायोगिक किंवा दृश्यात्मक साधनांचा वापर करू शकतात,

५. समाजशास्त्रीय आणि नैतिक आयाम: शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही तर जीवनातील महत्त्वाची मूल्ये, नैतिकता आणि समाजाशी जोडलेले विचार शिकवतात. एआय प्रणाली यामध्ये त्यांच्याकडील डेटा आधारेच ते देऊ करतील.

६. प्रेरणा आणि उदाहरण: शिक्षक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा स्त्रोत बनतात. शिक्षक हे जीवनातील अनुभवांच्या आधारे शिकवतात.

थोडक्यात एआय टूल्स शिकवणीत एक उपयोगी साधन असू शकतात, परंतु मानवी शिक्षक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय आणि शारीरिकदृष्ट्या अधिक प्रभावी अनुभव देऊ शकतात. विद्यार्थ्याना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करू शकतात.

वरील सर्व शिकण्याच्या शैली / पद्धती ध्यानात घेतल्यास एका वर्गात असे अनेक विद्यार्थी असणार आहेत. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी, त्या सगळ्याकडे एक शिक्षक ज्या पद्धतीने लक्ष ठेवून , समजावून सांगू शकतो तसे एखाद्या मशीनला जमेल एवढा आशावाद आज काय भविष्यात देखील निर्माण होणार नाही. वर्गातील विद्यार्थ्याना आणखी एक विषय शिक्षकांशी जोडून ठेवतो तो म्हणजे इमोशन्स (भावना), मुद्दाम इंग्रजी शब्द प्रयोग केला. ज्या कधीच एखाद्या मशीन मध्ये येणार नाहीत. शाबासकीची थाप मशीन नाही देऊ शकत. म्हणूनच या लेखाच्या सुरुवातीला “ह्यूमन टच” हा शब्द प्रयोग केला आहे. हे सारं जरी आजच्या शिक्षकांना समाधान देणारं असेल तरी एक आवाहन मी शिक्षकांना नक्की करेन, ते म्हणजे विद्यार्थ्यांकडून “Respect”-(आदर) कसा मिळवाल? विद्यार्थ्यांच्या मनात तुमचे अढळ स्थान निर्माण करण्यास प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, हे ध्यानात घ्यावं. शिकविण्याच्या कोणत्या आणि कशा प्रकारच्या युनिक प्रॅक्टीसेस तुम्ही अस्तित्वात आणि अंमलात आणणार आहात? ही खरी तुमची कसौटी असणार आहे. हे आव्हान तुम्हाला AI देऊ करणार आहे. विविध विषय अगदी चुटकी सरशी संगणकावर उपलब्ध असणार आहेत, आजही ते उपलब्ध आहेत एक शिक्षक ते शिकवेल कसे आणि तुमच्याकडे त्या व्यतिरिक्त अधिक माहिती आहे का? असल्यास त्याचे सादरीकरण तुम्ही एक शिक्षक म्हणून कसे कराल यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.                                

एका शिक्षकांस करावी लागणारी कामे लक्षात घेतली तर एआय त्यात मदत करू शकेल का? तर हो, नक्कीच ! एआय शिक्षकांवरील प्रशासकीय भार कमी करण्यास नक्कीच मतदगार सिद्ध होऊ शकेल. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग द्वारे येणाऱ्या काळात वर्गात घेतल्या जाणाऱ्या चाचण्यांमध्ये विद्यार्थ्यानी दिलेली लहान उत्तरे अथवा दीर्घ निबंध एआय टुल्स च्या सहाय्याने गुणांकन , प्रतवारी करणे कामी वापरात आणणे सहज साध्य होणार आहे. विद्यार्थ्यां सोबतच शिक्षकांच्या प्रगतीचा मागोवा घेणे हे मशीन लर्निंग टुल्स च्या सहाय्याने शक्य होणार आहे. विविध चाचण्या, माहितीच्या आधारे प्राप्त डेटाचा वापर करून विद्यार्थी कोणत्या क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतो याचा अचूक अंदाज शिक्षक घेऊ शकतील.

एआय शिक्षकांची जागा घेईल , एवढा मोठा आशावाद आज तरी आणि येणाऱ्या भविष्यात शक्य होईल असे मला वाटत नाही. पण एआय शिक्षकांना उत्तम मार्गदर्शक (मेंटर) होण्याची संधी देऊ करेल का? तर नक्कीच देऊ करेल. ही संधी शिक्षकांनी स्वीकारावी आणि त्याच सोन करावं. शिक्षण देणे व्यतिरिक्त असणारी कामे विविध एआय टुल्सचा वापर करून करावीत आणि जास्तीत जास्त फोकस ज्ञान दानाकडे कसा देता येईल हे पहावं. एआय चा शिक्षण देण्यात कसा वापर करता येऊ शकेल, जो तुम्हाला सहकारी ठरू शकेल यावर लक्ष द्यावं. या बदलाच्या लाटेवर स्वार व्हा आणि एआय काळात एक विद्यार्थी प्रिय शिक्षक होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील व्हा. यासाठी शिक्षकांना मनस्वी शुभेच्छा !

 

प्रस्तुत लेखावर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट कराव्यात. अथवा ई-मेल कराव्यात . माझा ई-मेल kamatkar.amit@gmail.com.

 

धन्यवाद !

 

अमित बाळकृष्ण कामतकर  

लेखक, ब्लॉगर, सल्लागार, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याखाता

संचालक – विद्या कॉम्प्युटर्स

संचालक- थिंकट्रान्स फाऊंडेशन, पुणे- सोलापूर चॅप्टर  

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......