छावा
आईचं प्रेम हे महत्वाचं असतच, ज्यास
ते मिळतं नाही त्यास त्याची किंमत जास्त समजते, असचं असतं. बालपणात तर सर्वात
जास्त जवळचं कुणी असेल ज्यास आपण प्रथम ओळखतो ती आईचं असते. आणि अशा वयात काळाने
जर कुणाची आई हिरावून नेली तर, हा विचार देखील करवत नाही. ज्यांना ह्या दू:खातून
जावं लागलं ती मंडळी नेहमी आईच्या प्रेमासाठी व्याकूळ राहिलेली दिसतात. जीवनात
घडणाऱ्या छोट्या – मोठ्या प्रसंगात आईची उणीव जाणवत राहते. अगदी हेच आपल्याला
लक्ष्मण उतेकर यांच्या “छावा” मध्ये पहायला मिळेल. जन्मापासूनच ज्याच्या वाट्याला
सोस आला असा हा सिंहाचा छावा आयुष्यात प्रत्येक आघाडीवर झुंझत राहिला, पण त्याने
कधीही हार मानली नाही. खरं तर तीन तासांच्या चित्रपटातून छत्रपती संभाजी
महाराजांना जाणून घेणं केवळ अशक्य पण
उतेकर यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. स्व. शिवाजी सावंत यांनी ८८६ पृष्ठ
संख्या असलेल्या कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज मांडण्याचा , समजावून
सांगण्याचा, रणधुरंधराची कथा आजही इतिहासाची साक्ष देते आहे. अवघं बत्तीस वर्षाचं
आयुष्य लाभलेला राजा पण एकाचवेळी अनेक आघाड्यांवर लढाई करणारा लढवय्या सेनानी
म्हणून ज्याची इतिहासाने नोंद घ्यावी, सतत नऊ वर्षे औरंगजेबला झुंझत ठेवणारा राजा
, मराठी बाणा जपणारा, धर्माभिमानी, कुटुंब वत्सल राजा, हिंदवी स्वराज्य वाढविणारा
आणि त्याचे रक्षण करणारा राजा चित्रपटाच्या कथेत बांधणं केवळ अशक्यच ! पण तसा
प्रयत्न होणार आहे म्हणून दोन वर्षापूर्वी सोशल मीडिया माध्यमातून समजलं आणि
चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पाहू लागलो. “छावा” १४ फेब्रुवारीला प्रदर्शित
होणार आणि आपण फर्स्ट डे- फर्स्ट शो पाहायचा असा निर्धार केला खरा पण प्रदर्शन
पूर्वच तिकीटं बुक झाली अशी बातमी आली, तरी म्हंटलं चित्रपटगृहात जावून तिकीटं
मिळतात का पाहू , आणि फर्स्ट शो नाही पण फर्स्ट डे -लास्ट शो ची तिकीटं मिळाली. मी
काही चित्रपट समीक्षक नाही, पण ज्या चित्रपटाने छत्रपती संभाजी राजांचा इतिहास
समोर ठेवला, फक्त तरुण पिढीलाच नाही तर
संपूर्ण जगास छत्रपती संभाजी राजांची महती दाखविली त्या विषयी व्यक्त व्हावं
म्हणून हा प्रपंच !
चित्रपट
उत्तम झाला आहे. विकी कौशल ने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका बजावली नाही तर तो
ती जगला आहे. छत्रपती संभाजी महाराज आपल्या समोर उभे करण्यात दिग्दर्शक आणि कलाकार
यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे हे जाणवतं, दिसतं. इतिहासातील अजरामर पात्र पडद्यावर
साकारताना उतेकरांनी घेतलेले श्रम दिसतात. अगदी महाराणी येसुबाई यांनी घातलेल्या
जोडवी पासून ते सौभाग्यचं कुंकू , दाग दागिने, लेहजा सारं काही काळानुरूप दाखविण्यात
यश मिळालं आहे. अर्थात स्व. शिवाजी सावंतांनी कादंबरीत देखील यास महत्व दिलेलं
आहे. राजांचं सिंहासनास मान देताना पादत्राणे न घालता उभं राहणं मनाला भावतं. एक
पत्नी म्हणून महाराणी येसुबाई पती प्रती प्रेम व्यक्त करणं साहजिक आहे. पण महाराज
जेंव्हा आईच्या आठवणीने व्याकूळ होतात असा एक सीन आहे, त्यावेळी महाराणी येसुबाई
म्हणतात पुढच्या जन्मी मला तुमची आई होण्यास आवडेल, आणि तुम्हास या जन्मीचे आईचं न
मिळालेलं प्रेम देण्यास आवडेल, प्रेमाची
एक वेगळीच व्याख्या !! छान झाला आहे तो सीन. छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या
“बुधभूषण” ग्रंथात लिहिल्या प्रमाणे महापूर मूलखाचे धनी असलेले, लोकाना
डोंगरासारखे उत्तुंग वाटणारे, पुराणातील पुरुष श्रेष्ठ शिवा सारखे राजे शिवाजी हे
पुत्र श्रेष्ठ झाले. अशा थोर पित्या विषयी असणारा आदर, ते आपल्या सोबत नाहीत ही
सतत होणारी जाणीव, व्याकुळता आणि अपरिहार्यता सारं काही विकी कौशल ने उत्तम रित्या
सादर केलं आहे. थोरल्या महाराजानंतर स्वार्थाने अंध झालेल्या आप्त-स्वकीयां सोबत लढताना,
मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्याची लढाई असेल अथवा चहू बाजूनी साम्राज्यावर होणारे
आक्रमण, यापैकी काहीच शंभू राजां समोर टिकावं धरू शकले नाही. हे सारं घडतं असताना
पडद्यावर सांकेतिक स्वरूपात ज्या पद्धतीने सादरीकरण केलं आहे त्यास तोड नाही. उतेकरांना
त्यासाठी १०० गुण द्यायला हवेत !! बॉलीवूड मधील अक्षय खन्ना एक उत्तम कलाकार आहे. औरंगजेब
ची भूमिका अक्षय ने उत्तम वठविली आहे. चेहऱ्यावरील हाव-भाव आणि बोलके डोळे या जोरावर
औरंगजेब रसिकां पर्यन्त पोहोचला आहे.
सिनेमॅटिक लिबर्टी अंतर्गत उतेकरांनी बूऱ्हाणपूर लूटीची घटना प्रथम- चित्रपटाच्या
सुरुवातीस आणि नंतर राज्याभिषेक दाखविला आहे, प्रत्यक्षात छत्रपती संभाजी राजांचा
राज्याभिषेक झाल्या नंतर पंधरा दिवसांनी राजांनी बूऱ्हाणपूर आणि औरंगाबाद वर हल्ला
करून मुघलांना हादरा दिला होता. असो , पण महत्वाचं असे की सौरभ गोस्वामी यांची उत्तम
सिनेमाटोग्राफी, साहस दृश्यांचं उत्तम चित्रीकरण, सोबतच उत्तम VFX !! एक छोटासा किस्सा आहे, लहानपणी संभाजी महाराजांचा सिंहाच्या जबड्यात
हात घालून लढतानाचा फोटो आमच्या सोलापुरात चौपाड येथील नवजवान तरुण मंडळाच्या फलका
मध्ये सर्व प्रथम मी पाहिला. त्याचं फार कुतूहल वाटायचं, राजे कसे लढले असतील? पण
या चित्रपटात VFX च्या मदतीने स्क्रीन वर हा क्षण (सिग्नेचर
पोज) अनुभवण्यास मिळाला. VFX आणि अॅनिमेशन करणाऱ्या तंत्रज्ञ
मंडळींचे या निमित्ताने आभार व्यक्त करावे वाटतात. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) युगात रायगड पाहायला मिळतो, ज्याचं उत्तम चित्रीकरण करण्यात यश आलं आहे.
राज्याभिषेकाची भव्यता, धाराऊ यांची स्वर्ण तुला हे सारं डोळ्याचे पारणे फेडतात. हा
क्षण मोठ्या स्क्रीन वरच अनुभवावा असा आहे.
पूर्वे
कडील मोझार्ट अशी ओळख असणारा संगीतकार ए आर रेहमान, यांच संगीत चित्रपटास आहे. “जाने तू”, हे अरिजित सिंग ने गायलेलं गाणं उत्तम श्रवणीय आहे पण ते सध्या चित्रपटात
सामील करण्यात आलेलं नाही. बाकी रेहमान यांच्या आजवर आलेल्या चित्रपटातील संगीत नेहमी
उजवं वाटाव असे होते पण या चित्रपटात तशी कोणतीच रेहमान यांची जादू पाहण्यास मिळाली
नाही. संगीत अगदीच सर्वसामान्य श्रेणीत वाटलं. काहीच नाविण्य नाही. दाक्षिणात्य चित्रपटात
जशी संगीत रचना असते अगदी त्याच धर्तीवर संगीत वाटलं. मान्य आहे की बायोपिक आहे आणि
तोही छत्रपती संभाजी महाराजांचा पण जादुई संगीताने आणखी चार चाँद लावले असते पण संगीतकार
यात कमी पडले.
चित्रपटात
छत्रपतींनी केलेल्या लढाया आणि त्यांच्या हळव्या स्वभावावर, आणि औरंग ने केलेल्या अमानुष
अत्याचारावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मला वाटतं छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयी
चित्रपटात आणखी काही गोष्टी दाखवायला हव्या होत्या जसे की कवी कलश आणि त्यांची मैत्री,
त्यांची भेट, चित्रपटाच्या शेवटी या दोघांत काव्य मैफल दाखविली आहे जी अर्थातच राजे
जिंकतात ,हे देखील छान जमलं आहे. धरणगांव लूट, जुवे बेट फतेह, कल्याण-भिवंडी लढाई,
रायगडावरील कठोर शासन (चित्रपटात राष्ट्रद्रोह करणाऱ्यांना हत्तीच्या पायी दिलेलं दाखविलं
आहे) या बाबी अंतर्भूत करण्यास हरकत नव्हती.
एकंदरीत
चित्रपट उत्तम झाला आहे, सर्वानी जरूर जरूर पहावा. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास
३३६ वर्ष झाली अद्यापही आपणास पूर्ण माहिती नाही, तो जाणून घेण्यास हा चित्रपट नक्कीच
खारीचा वाटा उचलतो आहे. राष्ट्र कार्यासाठी जीवनभर झगडणारे, राष्ट्रकार्यात मृत्यू
ही पत्करणारे धन्य ते शंभू राजे.
अमित बाळकृष्ण कामतकर
झक्कास 👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवा👍👍👍
हटवाधन्यवाद
हटवाअप्रतिम लेखन सर....
उत्तर द्याहटवामुद्देसूद लेखम, विषयाची मांडणी उत्तम
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअप्रतिम मांडणी, मुद्देसूद लेखन
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाउत्तम समिक्षण
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअतिशय उत्तम परिक्षण आणि समीक्षण केलेले आहे.अगदी आत्ताच जाऊन सिनेमा पहावा असे वाटते आहे.शब्द रचना ही फारचं छान
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान लेख👌👌
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाखूप छान सर, वाचननिष्ठ व्यक्ति हे सर्व लिहू शकतात हे या लेखातून कळत. पण काही चित्रपटातून जसे,हंबीरराव चित्रपटातून सुद्धा बऱ्हाणपूर युद्ध, राज्याभिषेक करून घेण्या आधी केलेल आहे. लेख खूप आवडला.
उत्तर द्याहटवा