फॉलोअर

ब्रॅंडींग लीडरशिप

 


नेतृत्व गुण हा उपजत असणारा गुण म्हणून आपण पाहतो, ऐकतो, बऱ्याच वेळा आपण सहज म्हणून जातो की लहानपणा पासूनच त्याच्यात / तिच्यात नेतृत्वाची चुणूक आहे. पण आता असे नाही, नोकरी करीत असताना अथवा स्वत:चा व्यवसाय करीत असताना तुम्हाला नेतृत्व हे करावे लागेल आणि त्याच्या अनुषंगाने आवश्यक गुण आत्मसात करावे लागतील, शिकावे लागतील. आज समाजात उत्तम नेतृत्व करणाऱ्या मंडळींची वानवा दिसते. पण नोकरी करीत असताना बढती मिळते (प्रमोशन मिळते), स्वत;चा व्यवसाय सुरू केला असेल तर आशा ठिकाणी  गुणांचा कस लागतो असे माझे मत आहे. विविध टप्प्यावर तुमची निर्णय घेण्याची क्षमता, नैतिकता, प्रामाणिकपणा, सर्व समावेशक विचार, आत्मविश्वास, सहानुभूति, अनुकंपा/ कणव, सचोटी , शिकण्याची इच्छा ही गुण वैशिष्ट्य खूप महत्वाची वाटतात मला. यशस्वी नेतृत्व करण्याची क्षमता ही अनेक वेळा नेत्याच्या धोरणात्मक निर्णय घेणे , अभिप्राय ऐकणे, संघास प्रेरित करणे आणि कार्यसंघात योगदान कशा प्रकारे देऊ करतात यावर अवलंबून असते. आज आपण देशाचा विचार करीत असू तर फक्त "नेतृत्व" असे राहिले नाही, त्यास मी नेतृत्व 2.0 म्हणेन कारण आता ती फक्त लीडरशिप नाही राहीली ती आता एक ब्रॅन्डीग लीडरशिप  झाली आहे ! थोडं आश्चर्य वाटणं साहजिक आहे पण लीडरशिप आणि  ब्रॅंड या दोन्ही गोष्टी समजून घेतल्या तर लक्षात येईल की ब्रॅन्डीग लीडरशिप म्हणजे नक्की काय ?

लीडरशिप चे महत्व : कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे आणि दिशा देणे या मध्ये नेतृत्वाची मध्यवर्ती भूमिका असते. एका यशस्वी नेतृत्वावर बरेच काही अवलंबून असतं. संस्था असेल अथवा परीघ वाढविला तर देश असेल त्यात ध्येय धोरणं, दूरदृष्टि, आणि उद्दिष्टे या विषयी तुमच्या टीम मधील प्रत्येक सदस्यां सोबत संवाद असणे आणि एकत्रित येऊन मार्गक्रमण करणे अभिप्रेत असते. संकट काळात यां क्षमता महत्वाच्या असतात. कोणत्याही संस्थेच्या उत्कर्षा मध्ये सक्षम नेतृत्व मोठी भूमिका बजावतं. नेतृत्वामुळे स्पर्धेच्या युगात नविण्य आणणे आणि गरजेनुसार बदल करणे क्रमप्राप्त असतं , जे सर्वोत्कृष्ट नेतृत्व असतं ते दिशा बदलणे, नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि नावीन्यपूर्ण विचार करणाऱ्या , मांडणाऱ्या मंडळींना सोबत घेवून अग्रेसर राहतात. व्यवसाय, राजकारण, धर्म आणि सामाजिक समुदाय आधारित संस्थासह समाजाच्या बहुतेक सगळ्या ठिकाणी नेतृत्व आढळतं आणि ते आवश्यक देखील असतं. कोणत्याही नेतृत्वा कडे योग्य पण कधी कधी कठोर निर्णय घेणारे लोक म्हणून पाहिलं जातं. त्यांच्याकडे एक विशिष्ट नजर असते ज्या आधारे ही मंडळी विविध साध्य होणारी उद्दिष्टे स्थापित करतात आणि त्यांच्या फॉलोवर्सना ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ज्ञान आणि साधने प्रदान करतात.

आता जाणून घेऊया ब्रॅंड विषयी –

ब्रॅंड म्हणजे नक्की काय ?

          ब्रॅंड ही कंपनीची ओळख असते जी ती एक सारखी / समान उत्पादने किंवा सेवा विकणाऱ्या स्पर्धका पेक्षा तुम्हास वेगळी बनवते. टार्गेट कस्टमरच्या मनात तुमच्या उत्पादन किंवा सेवा विषयी जागा मिळविणे, प्रस्थापित करणे आणि व्यवसाय करण्यासाठी त्यांच्या पसंतीचा पर्याय बनणे हे ब्रॅन्डीगचे ध्येय असते.

ब्रॅन्डीग म्हणजे काय?

          ब्रॅन्डीग म्हणजे तुमच्या टार्गेट कस्टमर आणि सामान्य लोकांच्या मनात तुमच्या व्यवसायांसाठी एक वेगळी ओळख निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. ब्रॅन्डीगमध्ये कंपनीचे नाव, लोगो (बोधचिन्ह), विजुवल आयडेंटिटी डिझाईन, ध्येय, मूल्ये यांचा समावेश होतो. तुमचा ब्रॅंड हा तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता , विशिष्टता, तुम्ही देत असलेल्या ग्राहक सेवेचा अनुभव आणि अगदी तुमच्या प्रॉडक्टच्या किमती ठरविण्याच्या धोरणावर निर्धारित केला जातो.    

नेतृत्व आणि वैयक्तिक ब्रॅन्डीग-

          सत्यता - एखाद्या लीडरच्या वागण्या बोलण्या मध्ये कशी आहे ? ती दिसून येते का? तो लीडर परिवर्तनशील आहे का? हीच कारणे त्या लीडर चे वैयक्तिक ब्रॅंड म्हणून सर्वश्रुत होण्यास मदतगार सिद्ध होते. या मध्ये नेतृत्व शैली खूप महत्वाची मानली जाते. कारण त्यामुळेच त्यांच्या फॉलोअर्स (अनुयायीं) वर किती प्रमाणात परिणामकारक छाप सोडली जाते हे पाहिले जाते. कंपनीत अथवा सामान्य जनतेस दिलेली उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नेते मंडळी योजना आणि रणनीती कशा लागू करतात हे नेतृत्व शैली निर्धारित करते. कोणत्याही लीडर ने स्विकारलेली नेतृत्वशैली हि सहसा त्यांचे व्यक्तिमत्व, जीवन, अनुभव, भावनिक बुद्धिमत्तेची पातळी, कौटुंबिक प्रेरणा आणि विचार करण्याची पद्धत यांचा आरसा असू शकते.

          “शेरील सॅंडबर्ग” या एक लिडर आहेत त्यांनी त्यांच्या नेतृत्वास आकार देण्यासाठी त्यांच्या वैयक्तिक कथा आणि विश्वासाचा कसा फायदा घेतला हे विचार करण्याची गरज मला वाटते. आता तुम्ही म्हणाल या मान्यवर कोण आहेत? तर शेरील सॅंडबर्ग या 2008-2022 दरम्यान फेसबुकच्या चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदावर सेवा बजावली आहे. काही लोकांचे म्हणणे आहे की त्या एक परिवर्तनवादी लीडर म्हणून नावारुपास आल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे सहकारी लोकांकडून अपेक्षा ठेवून त्या साध्य कशा करायच्या आणि त्यासाठी प्रोत्साहित करायचं , सोबतच चांगले काम केले म्हणून कौतुक करायचं या साऱ्या बाबी त्यांना उत्तम प्रकारे जमतात. एखाद्या व्यक्तीचे चांगले गुण ओळखण्यात आणि त्यांना सुधारण्यासाठी प्रवृत्त करण्यात त्या तज्ञ आहेत. सहकारी मंडळींना जीवनात पुढे जाण्यापासून रोखणाऱ्या गुणांवर मात करण्यासाठी प्रोत्साहित कसे करावे हे त्यांना माहिती आहे. सॅंडबर्ग यांची आणखी एक खुबी म्हणजे त्यांच्या सोबत काम करणाऱ्या व्यवस्थापक आणि कर्मचारी मंडळींना अनेकदा असे आढळून आले आहे की ही मंडळी त्यांच्याकडे असणाऱ्या महिती आणि ज्ञाना पेक्षा अधिक सक्षम आहेत.

          भारतात सार्वत्रिक निवडणुकांचा काळ सुरू आहे, या मध्ये तुम्ही पाहिलं असाव की भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी हे देखील “मोदी की गॅरंटी” या बोधवाक्याचा वापर करीत आहेत. अर्थातच यास मी ब्रॅन्डीग लीडरशिप असेच म्हणेन. वैयक्तिक ब्रॅन्डीगचे फायदे मिळतात जसे की ट्रेंड सेट करण्यास, धोरणात्मक निर्णयावर प्रभाव टाकण्यास मदतगार सिद्ध होण्यास आणि आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या कनेक्टेड जगात नेत्यांचा आवाज जागतिक व्यासपीठावर आपली छाप पाडू शकतो. वैयक्तिक ब्रॅन्डीगचा प्रवास आव्हानात्मक आणि फायद्याचा ठरू शकतो. त्यासाठी स्वत:बद्दलचे सखोल आकलन, सत्येची बांधिलकी आणि संवादासाठी धोरणात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. एखाद्याचे अद्वितीय गुण आणि सामर्थ्य समजून घेणे आणि ते आत्मसात केल्याने आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो प्रभावी नेतृत्वासाठी आवश्यक असतो. जगभरातील प्रभावशाली नेतृत्व करणाऱ्या मंडळींच्या यशाचे हेच तर गमक नसेल ?

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?