फॉलोअर

व्यवसायाची निवड आणि आवड

 

व्यवसायाची निवड आणि आवड या दोन्ही गोष्टी एकास एक संगती या प्रमाणे आहेत. व्यवसायाची आवड असल्यास निवड योग्य होवू शकते आणि व्यवसायाची निवड योग्य असल्यास त्यात आवड निर्माण होणे हे क्रमप्राप्त होते. बऱ्याच वेळा व्यवसाय हा ना-इलाज म्हणून स्विकारणारी काही मंडळी असतात, अशा परिस्थितीत व्यावसायिकता येणे खूप कठीण असतं, अर्थात हे विविध उदाहरणाने सिद्ध करता येऊ शकते, आज तो विषय नाही म्हणून मी त्यावर प्रकाश नाही टाकत. पण व्यवसाय करणाऱ्या मंडळींनी हे लक्षात घेतलं पाहिजे की “व्यावसायिकतेचा पोशाख” हा घालावाच लागेल. व्यवसायाची निवड करीत असताना सामाजिक गरज (मागणी) या विषयाकडे पाहणे मला जास्त योग्य वाटते, समाजास काय हवं आहे, कशाची मागणी होत आहे ते सहज उपलब्ध करता येऊ शकतं का? त्यावर व्यवसाय करता येऊ शकेल का? त्यातून नवोन्मेश साध्य करता आला तर म्हणतात ना सोन्याहून पिवळं !! अगदी तसच काही.....

व्यवसायास करिअर म्हणून निवडताना मला आवडत, मला जमतं आणि समाजास त्याची गरज (मागणी) आहे हि त्रिसूत्री लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याची काळजी घेतली तर निवड कधीच चुकणार नाही आणि तुमचं व्यवसायात यशस्वी होणं पक्क म्हणून समजायला अजिबात हरकत नाही अस मी ठामपणे म्हणेन. तुमची आवड ठरली ती समाजास पूरक आहे आणि व्यवसाय सुरु करायचा आहे तर, व्यवसायाची कल्पना , त्याबाबतीत तुमचे ज्ञान, त्यास आवश्यक असणारी बाजार पेठ, व्यवसाय सुरु करण्यास आवश्यक भांडवल, भांडवलाची उपलब्धता कशी करता येऊ शकेल याचा अभ्यास, स्पर्धा, व्यवसायाचे ठिकाण आणि आवश्यक कर्मचारी वर्ग, कौशल्य असणारे की अ-कौशल की दोन्ही प्रकारचे या सर्वांचा अभ्यास असावा. व्यवसाय निवडताना आणखी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक वाटते, जसे की व्यवसायाचे स्वरूप, त्याची व्याप्ती (सुरुवातीस परिसीमा ठरवून घ्या यासाठी आपली क्षमता ओळखा), व्यावसायिक जोखीम (रिस्क) किती आणि कशा प्रकारे असू शकते याची माहिती अथवा पूर्ण अभ्यास करणं महत्वाच आहे. 

आर्थिक पाठबळासाठी अधिकृत आर्थिक व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांकडे (बँका कडे) अनेक पर्याय उपलब्ध आहेत ते तपासून पहा. ग्राहक वर्ग ओळखा त्यास आकर्षित करण्यासाठी योग्य ती पावलं उचलायची तयारी ठेवा. आजच्या धका- धकीच्या जीवनात सर्वांची बोटं स्मार्ट फोनवर रुळू लागली आहेत, तुमचे सोशल नेटवर्क आणि सोशल मीडिया याचे सामर्थ्य ओळखा, त्याचा योग्य वापर करा. तुमच्या ओळखीच्या लोकांशी तुमच्या कल्पनेची चर्चा करा, आणि त्यांना उत्पादन कसे हवे आहे ते जाणून घ्या. सगळं एका क्लिक वर उपलब्ध होतं असताना नव्या तंत्रज्ञानाचा स्विकार करणं अपरिहार्य आहे, त्यात कोणतीही कुसूर करू नका. झोकून देऊन काम करणं कशाच्या आधारावर शक्य आहे तर ती म्हणजे “ऊर्जा” काम करण्याची ऊर्जा !  एखादी कल्पना सत्यात उतरविणे म्हणजे “प्रयत्नांची पराकाष्टा” या एका वाक्यात सगळं काही आलं पण फक्त सांगून स्टार्टअप सुरू झाले आणि यशस्वी झाले असे होणे शक्य नाही, त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न करणं ध्येयाप्रती अग्रेसर राहणं सोडून चालणार नाही, या मुळे यश मिळण्यास विलंब होईल आणि तुमचा स्वत:चा इंटरेस्ट संपून जाईल. प्रत्येकवेळी एखाद्या विषयाची प्रेरणा खूप महत्वाची असते असे मी मानतो. ही संस्थापक व्यक्ती कडे जेवढी हवी तेवढीच त्याच्या टीम कडेही हवी. लक्षात घ्या, स्वप्न, कल्पना आणि सत्य यात फरक हा राहणारचं पण तुमचे स्वप्न, तुमची कल्पना या विषयी तुमच्या टीम सोबत चर्चा होऊन त्यांना तुमचे “व्हिजन” देणे खूप महत्वाचं!! हे तुमच्या टीमला जोडून ठेवण्यात मदतगार सिद्ध होते यामुळे टीम त्यांची प्रतिभा, उत्साह यांचे योगदान देण्यासाठी प्रेरित होतात. सोबतच उद्देशा प्रती एकनिष्ठता, प्रतिबद्धता जास्त निर्माण होते. ही एक ऊर्जा आहे जी तुमचं स्टार्टअप सुरू ठेवते. 

व्यवसाय निवडीस शुभेच्छा!!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर 
YouTube: @amitkamatkar


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

मेल मर्ज काय आहे ?