ads

फॉलोअर

आज वाचा

प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी

 


मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे, भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती, तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल, गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची, अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात, तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले, हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात, तर ते थेट आपल्या जगण्याशी, आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख, त्याचे यश-अपयश, त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी, वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की, ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो, पराकोटीचे दुःख असो, जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही.

'माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी, दुखी या जगतात आहे,' या जाणिवेतून एक वैश्विक आणि भावनिक नाते तयार होते. ही जाणीव एकटेपणाची भावना दूर सारते. आपल्या अंतर्मनातील गुंतावळ, आपले प्रश्न, आपल्या आकांक्षा यांना जेव्हा पुस्तकाच्या पानांतून वाचा मिळते, तेव्हा मन मोकळे होते आणि एक प्रकारची आश्वस्तता लाभते. अशाप्रकारे, पुस्तके ही केवळ ज्ञानवर्धनाची साधने नसतात, तर ती आत्म-संवादाची, भावनात्मक मुक्तीची आणि मानवी एकसंधतेची सशक्त माध्यमे ठरतात. महाविद्यालयीन काळात मला नाही आठवत की फार काही वाचलं असेल, पण एक गोष्ट कटाक्षाने केली ती म्हणजे बाबांनी लिहिलेल्या काही कथा वाचल्या, वाचन करताना जाणवलं, की अरे!, हे तर आपल्याला बाबांनी सांगितलेल्या गोष्टी सारखीच आहे. नव्हे तीच कथा - गप्पा मारताना ,कधी फावल्या वेळेत- किस्सा सांगताना त्या कथेतील पात्रांचा तर कधी त्यातील प्रसंगाचा आधार घेऊन कथन केली होती. साधारण २००५ साल असाव, मला एक भन्नाट कल्पना डोक्यात आली, मग काय लागलीच ती कागदावर उतरविण्यास सुरूवात केली आणि पाहता पाहता एक छोटी कथा लिहून तयार झाली. माझ्या समीक्षकांना अर्थात बाबांना ती वाचण्यास दिली त्यावर “छान” असा शेरा प्राप्त झाला काही पॉईंट्स वर चर्चा झाली, त्यात काही पॉईंट्स नव्याने बाबांनी सुचविले देखील तसे बदल मी त्यात केले आणि नंतर लिखाणाचा प्रवासही थांबला. २०११ साली बाबा अनंताच्या प्रवासास गेले आणि त्यानंतर मी अंतरीचे भावविश्व शब्दांच्या रूपाने लेखाद्वारे साकारत लिहिता झालो ते आजपावेतो हा प्रवास सुरू आहे.

लेखनाच्या मुळाशी 'दुःखाची किनार' असावी लागते, ही कल्पना केवळ एक भावनिक पैलू नसून, अनेक महान साहित्यकृतींच्या निर्मितीमागील एक महत्त्वपूर्ण प्रेरणास्रोत आहे. "साहित्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारी 'दुःखाची किनार' ही केवळ एक भावनिक अवस्था नसून, ती लेखकाची आयुष्यभराची पुंजी असते, त्याच भांडवल असतं. अनुभवजन्य दुःखाचा (स्वत: भोगलेला) किंवा सहानुभूतीजन्य दुःखाचा (पाहिलेला, समजून घेतलेला) हा गडद अनुभव लेखकाच्या संवेदनक्षमतेस एक विशिष्ट तीव्रता (Intensity) प्रदान करतो. दुःखाच्या या अंशाचे 'शेअरिंग' (अभिव्यक्ती) करणे, हे केवळ मन हलके करण्यासाठी नसते; तर ते दुःखाचे रूपांतरण (Transformation) असते. लेखनातून दुःख जेव्हा व्यक्त होते, तेव्हा ते व्यक्तिगत रहात नाही, तर ते सार्वत्रिक मानवी अनुभवाचे प्रतीक बनते. या प्रक्रियेतूनच लेखकाला आणि वाचकालाही एक प्रकारचे उदात्तीकरण आणि वेगळेच मानसिक सामर्थ्य प्राप्त होते.

या 'दू:खाच्या किनारी' आधारावरच लेखक जीवनातील गुंतागुंत, मानवी स्वभावाचे चढ-उतार आणि अस्तित्वाचा अर्थ अधिक प्रगल्भतेने टिपू शकतो. 'दुःखाची किनार जेवढी मोठी, तेवढी प्रगल्भता' हे विधान साहित्याच्या संदर्भात 'आशीर्वाद' या शब्दाऐवजी 'वरदान' ठरते. कारण यातून लेखकाला केवळ अनुभव मिळत नाही, तर जीवनाचे मूलभूत सत्य अधिक सखोलपणे जाणून घेण्याची दृष्टी  प्राप्त होते. अनेक दिग्गज लेखकांची 'प्रगल्भता' ही त्यांच्या सहनशीलतेच्या आणि संवेदनशीलतेच्या मिलाफातून सिद्ध झालेली असते, जी त्यांच्या लेखनाला एक चिरंजीवीत्व प्राप्त करून देते." १९६०-७० साल असाव या काळात बाबांनी हातात लेखणी घेतली आणि अशाच प्रकारे आयुष्यात येणारे अनुभव , अर्थात भांडवलाच्या आधारावर लिहिण्यास प्रारंभ केला. त्याकाळी सुचेल तसे लिहिणे, मग त्यात कच्च लिखाण मग ते फेअर करणे असे सोपस्कार लिखाणावर केले जात असतं, त्यानुसार माझी माई आत्या बाबांना या कामात मदत करीत असे. लहानपणीच बाबांची आई देवाघरी गेल्याने आईचं प्रेम मिळालच नाही आमच्याशी गप्पा मारताना एखाद्या क्षणी भूतकाळातील स्मृतींचा गडद कवडसा त्यांच्या मनावर पडायचा आणि 'आईच्या आठवणींचा गहिवर' त्यांना निःशब्द करून जायचा. अश्रूंच्या रूपाने, न मिळालेल्या मातृप्रेमाची 'अव्यक्त वेदना' त्यांच्या डोळ्यांतून सांडायची. त्यांना आईच नसणं सारखं सलायचं, खूपच हळवा कोपरा होता हा बाबांचा. शिवाय लहान वयात एक पाय पोलिओ मुळे निकामी झालेला ज्यामुळे आयुष्यभर आपण इतरां सारखे चालू शकणार नाही हे शल्य ! उरी बाळगून केलेला प्रवास, घरची बेताची परिस्थिती आणि आयुष्याच्या वाटेवर येणारे चांगले, वाईट अनुभव, एका लेखकास एवढं भांडवल पुरेसं होईल, नाही का? यातूनच विविध कथांचा जन्म झाला आणि विविध मासिकातून, दिवाळी अंकातून कथा प्रसिद्ध झाल्या. ज्या कथा प्रसिद्ध झाल्या त्यातून त्या काळात काही मनी ऑर्डर्स मिळाल्या त्यात समाधान मानून बाबा लिहीत राहिले. बाबा, नेहमी म्हणायचे, समाधान मानण्यात आहे, मानायला शिका, किंतु-परंतु मध्ये अडकू नका. खूप मोठी शिकवणं आहे ही आम्हाला मिळाली.

हा सारा लेख प्रपंच नुकत्याच बाबांच्या नावे पार पडलेल्या स्मृती पुरस्कारामुळे, अर्थात भावनांचा कल्लोळ , त्यास लेखणी मिळाली की सारं कसं पटापट कागदावर उतरतं, हा स्मृती पुरस्कार प्रथम २०१४ मध्ये प्रदान करण्यास सुरुवात केली. साहित्य क्षेत्रात जी मंडळी सातत्याने, समर्पित भावनेने योगदान देत आहेत त्यांचा सन्मान करावा. ज्या मंडळीनी महाराष्ट्राच्या दिवाळी अंक परंपरेस संजीवनी देण्याचे कार्य केले, प्रसंगी स्वत:च्या खिशास टाच लावून दिवाळी अंक काढला, अनेक नवोदित लेखकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले अशा मंडळींचा सन्मान म्हणजे “स्व. बाळकृष्ण रंगनाथ कामतकर स्मृती पुरस्कार”,  हे सार मांडताना यात एक स्वार्थ नक्कीच आहे, तो कबूल करणं मला योग्य वाटतं. व्यक्त होताना “बाबा” म्हणून हृदयातून साद  घालता येते, प्रतिसाद नाही येत पण हाक मारतोय एवढचं समाधान !

 

© अमित बाळकृष्ण कामतकर


#Amitkamatkar


टिप्पण्या

  1. खूप सुंदर मनापासून लिहिले आहे...अशी माणसे जगण्यासाठी बळ देत असतात..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?