पहिली शस्त्रक्रिया : भीती, धाडस आणि शरीराशी झालेला नवा संवाद

 

पहिली शस्त्रक्रिया अनुभवताना ऑपरेशन थिएटरबाहेर उभा असलेला रुग्ण, भीती आणि धाडस यांचा अंतर्मुख क्षण

हृदयाची वाढणारी धडधड, काळजी आणि पुढे काय आणि कसे होणार? हा अनुत्तरित प्रश्न ! अर्थात उत्तर लागलीच मिळणारच होतं पण मिळेपर्यंत सोबत करणारी एक अनामिक भिती ! हो भीतीच, कारण आयुष्यात प्रथमच एखाद्या ऑपरेशनला सामोरे जात होतो. हॉस्पिटल मध्ये सोबत करणे ठिक असतं,पण ऑपरेटीव प्रोसीजर स्वत:च पाहणे आणि त्यात सामील होणे हे प्रथमच ! त्यामुळे नाही म्हंटल तरी टेंशन आलेलच होतं. त्यामुळे कदाचित ब्लड प्रेशर देखील थोडं वाढलं. ऑपरेशन हा शब्दच मुळी धाडस दर्शवितो, मग ते सैन्य दलात असेल, अथवा हॉस्पिटल ! फार काही नाही पण “धाडस” या शब्दाचा मला चांगला समजलेला अर्थ असा की भिती असतानाही धोक्याचा सामना करण्याची मानसिक ताकद. डॉक्टरांवर विश्वास ठेवला की फार काही धाडस करण्याची गरज नसते पण मनुष्य प्राणी सहजा सहजी असे काही करत नाही, तसा तुम्हालाही अनुभव असावाच !

          सुरुवातीलाच हे क्लिअर करतो की फार काही “सीरियस” असे घडले नाही, फक्त मी हे प्रथमच फेस केलं म्हणून त्याचं अप्रूप ! बाकी अशा अनेक शस्त्रक्रिया रोज केल्या जातात आणि रुग्ण हसत हसतं घरी देखील जातात. मी देखील त्यांच्या पैकीच एक ! आजकाल सोशल मिडियाच्या जमान्यात कशाचेही अप्रूप वाटतं, आता हेच पहा ना, माझी पहिली शस्त्रक्रिया ! हा काही लेखनाचा विषय असेल माझ्या मनी कधीच आले नव्हते पण आज मी त्याच विषयावर  लिहितो आहे. असो, तर मानवी शरीर फॉरेन पार्ट अॅक्सेप्ट कशी करते त्यावर त्याचां त्रास अवलंबून असावा, कशी गंमत आहे पहा, सारं काही व्यवस्थित सुरू असे पर्यन्त ठिक पण त्यात काही खंड पडला तर त्याची किंमत समजते तसाच काहीसा प्रकार म्हणायचा. शरीरात काल एका फॉरेन मटेरियलची एंट्री झालेली आहे, शरीर त्याच्याशी अॅडजस्ट होत आहे असे सध्यातरी चित्र आहे.

          डॉक्टरांचे ऐकल्यास अजून दोन-तीन दिवस तरी शरीराला पूर्णपणे स्थिर व्हायला वेळ लागेल, हे स्वाभाविकच आहे. डोळ्याचे ऑपरेशन म्हणजे केवळ एका अवयवावर केलेली प्रक्रिया नाही; तो संपूर्ण शरीराशी, मनाशी आणि संवेदनांशी संवाद साधणारा अनुभव असतो. त्यामुळे थोडाफार त्रास, अस्वस्थता किंवा वेगळेपणाची जाणीव होणं हे शरीराचं नैसर्गिक रिफ्लेक्शन आहे. शरीराला झालेला हस्तक्षेप ते स्वीकारत असतं, त्याची जुळवाजुळव चालू असते, आणि त्यातूनच बरे होण्याची प्रक्रिया आकार घेत असते. या काळात संयम ठेवणं, काळजी घेणं आणि वेळेला वेळ देणं फार महत्त्वाचं ठरतं. प्रत्येक वेदना ही त्रासदायक असली, तरी ती शरीराच्या बरे होण्याच्या प्रवासातील एक टप्पा असते. थोड्या दिवसांचा हा काळ जाईल. हा देखील एक अनुभव मला वाटतं आवश्यकच म्हणावा लागेल.

 

अमित बाळकृष्ण कामतकर 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

तुम्ही शिक्षित की साक्षर ?