भारत विरुद्ध इंडिया : शिक्षण, एआय आणि हरवलेली दिशा
शहर आणि गांव / खेड
यांच्यातील संस्कृती, रूढी, परंपरा यामध्ये एक मोठी दरी दिसतेच पण सर्वात महत्वाचं
म्हणजे शिक्षण ! यात देखील एक मोठी दरी पहायला मिळते. भारत आणि इंडिया यातील दरी
सतत वाढणारी राहील असे चित्र आजतरी दिसतं आहे. डिजिटल क्रांती भारतात (गावात) आली
नाही असे नाही पण अद्याप भारत इंडियाशी जोडलेला नाही हे त्रिवार सत्य आहे. आता हेच पहा, शिक्षणांवर सर्वांचाच सारखाच
अधिकार आहे, पण या भावी पिढीस आपण शिक्षित करीत आहोत की साक्षर ? की दोन्हीही
नाही. शिक्षण क्षेत्रात वावरत असताना अशी अनेक उदाहरणं मी देऊ शकतो की जिथे
मुलांना धड वाचताही येत नाही. लिहिणं तर खूप दूरची गोष्ट ! तुम्ही म्हणाल, काहीतरी
सांगताय पण ही वस्तुस्थिती आहे. हे विद्यार्थी इयत्ता दहावी उत्तीर्ण असणारे आहेत
हे नमूद करणे अनिवार्य आहे. ही मित्र मंडळी उत्तीर्ण कशी झाली? हा संशोधनाचा विषय
होऊ शकतो. कितीही कॉपी मुक्त अभियान चालविले तरी नैतिकता कशाशी खातात हे जो
पर्यन्त समजणार, शिकणार नाही तो पर्यन्त काहीही फरक पडणार नाही. असे विद्यार्थी
त्यांचं शालेय शिक्षण संपवून जेंव्हा बाहेर पडतात तेंव्हा या स्पर्धेच्या युगात ही
मित्र मंडळी कशी तग धरू शकतात आणि काय करतात ? त्यांचं सो कॉल्ड करियर काय आकार
घेतं ? हे सारे अनुत्तरतीत प्रश्न आहेत किमान माझ्यासाठी तरी. तुमच्याकडे याची
उत्तरं असल्यास जरूर कमेन्ट करावीत.
सध्या जो तो एआय विषयी बोलतो आहे, त्याचा वापर आपल्या नकळत आपण फार
पूर्वीपासून करतो आहोत फक्त सध्या जोरात ट्रेंडींग आहे. भारत आणि इंडियातील
विद्यार्थी मंडळी नक्कीच ए आय चा वापर करतील पण तांत्रिक दृष्ट्या सक्षम होऊ शकतील
का? त्यासाठी आवश्यक कौशल्यं कुठून आणि कुणाकडून शिकायची ? २०२५ मध्ये आवश्यक कौशल्यं
जसे की विश्लेषणात्मक विचारसरणी, कुतूहल, (curiosity),
प्रभावी नेतृत्व गुण, तांत्रिक साक्षरता इ. पण आपण जर २०३० म्हणजे पुढील पाच
वर्षांचा विचार करीत असू तर या कोर स्किल्स सोबत आणखी कौशल्य शिकण्याची नितांत गरज
आहे, जसे की क्रिएटिव थिंकिंग, सायबर सेक्युरिटी, ए आय आणि बिग डेटा, हे सारं येथे
नमूद करण्याचे कारण म्हणजे गावाकडे असणाऱ्या आणि सोबतच टीएर ३ शहरा मध्ये असणाऱ्या
सरकारी शाळां मध्ये शिक्षण घेणारा विद्यार्थी यांची विशेष काळजी वाटते. तेथील
गुरुजी तंत्रस्नेही आहेत का? असल्यास शाळांत सर्व समावेशक सेवा उपलब्ध आहेत का?
याची उत्तरं नकारार्थीच मिळतात. विविध सेशन मार्गदर्शनाच्या निमित्ताने मी काही शाळांना भेटी दिल्या आहेत तेथील
व्यवस्था पाहता येणाऱ्या पाच वर्षात होणाऱ्या बदलां पुढे येथील विद्यार्थ्याचा
निभाव कसा लागेल या विचाराने मनात प्रश्नांच काहूर माजलं आहे. खरं तर म्हणूनच हा
लेख प्रपंच !! ज्या पद्धतीने ए आय तंत्रज्ञान एखाद्या विषयाची माहिती उपलब्ध करून
देतं आणि सोबतच समजावून देखील सांगतं मग शिक्षकांची गरज राहील का? असा प्रश्न पडणं
साहजिक आहे पण मी याचे उत्तर माझ्या पूर्वी लिहीलेल्या लेखात दिल आहे, शिक्षकांचे
महत्व विषद करणारा लेख जरूर वाचावा. लेखाची लिंक - https://amitkamatkar.blogspot.com/2025/01/willAIreplaceteachers.html . शासन
स्तरावर होणारे निर्णय, त्याची अंमलबजावणी करणे यातच शासकीय कर्मचारी धन्यता मानताना
दिसतात, एखादं दूसरा अपवाद असतोच पण खूप काम असतं, मुलांना शिकवायचं की कागदं
रंगवायची असे प्रश्न शाळा भेटीत शिक्षक सर्रास विचारतात. अनेक शाळांत असे साधारण
चित्र आहे. काही ठिकाणी तर महिन्या काठी पगाराची खात्री करण्यासाठी काम होते. मग
तंत्रज्ञानात होणारे बदल गांव / शिक्षक पातळीवर कधी
स्वीकारले जातील आणि तेथील मंडळी कधी साक्षर होतील हे देखील अनुत्तरित प्रश्न
आहेत.
बदलत जाणारं तंत्रज्ञान आणि त्याचा वापर जसे विद्यार्थी करतात तोच ते वापरण्याचा तांत्रिक आणि योग्य वापर असा समज प्रचिलीत होणं धोकादायक वाटतं मला, कारण घरातील छोटे दोस्त याचा वापर करतात आणि मोठ्यांना बजावून सांगतात इंटरनेटवर असेच सांगितले आहे. घरातील आजी/आजोबा यांचा अनुभव त्यांचे ज्ञान एका दमात शून्य होऊन जातं. असे किस्से घरा घरात घडण्यास सुरुवात होऊ लागली आहे. मुळात घरात आजी/आजोबांची जागाच या छोट्याशा मोबाइल नामक वस्तूने घेतली आहे. मेट्रो सिटीज मध्ये याचा शिरकाव चांगला झाला आहे. हे सारं भीतीदायक आहे. वेळीच सावध होणं आवश्यक ! पालक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे याचे भान लवकर आले तर उत्तम नाहीतर आपल्या सवयी प्रमाणे आपण दुसऱ्याकडे बोट करतोच ! ए आय वापरताना मदतनीस म्हणून वापर ठिक आहे पण पूर्ण विचार स्वातंत्र्य हरवून याचा वापर करणं धोकादायक वाटतं मला. फॅक्ट चेक, नंबर्स, एखाद्या घडलेल्या गोष्टीचा इम्पॅक्ट या विषयीचा सविस्तर रीपोर्ट यासाठी ए आय चा वापर नक्की करा.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
भाग पहिला वाचण्यासाठी: https://amitkamatkar.blogspot.com/2025/06/transition.html
फोटो: ChatGpt

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा