ए भाई जरा देख के !!
वाहतुकीचे
नियम हे पाळण्यासाठी असतात हेच मुळी आपल्याला रुचत नाही. काय होतं? हा जो फाजील
आत्मविश्वास आहे तो बऱ्याच वेळा घातक ठरतो. मग अनुज्ञाप्ती (लायसन्स) नसतानाही
वाहन चालविणाऱ्या छोटे सरकार ते घरातील कर्तबगार व्यक्ती अशा अनेकांमध्ये असाच आविर्भाव
पहायला मिळतो. थांबा असा सिग्नल लागलेला असताना देखील जायची प्रचंड घाई असणारे असोत
कि सिग्नल सुटायच्या आधीच वाहन दामटणारी प्रचंड व्यस्त (बरोबर ओळखलतं, मोबाईल वर
व्यस्त असणारी) मंडळी असोत या सगळ्यांसाठी श्री.यमराज विश्रांती घेत असतात
त्यामुळेच आत्मविश्वासाचे रुपांतर फाजील आत्मविश्वासात होते. हे सगळं खूप भयंकर
आहे असं नाही का वाटतं? आपण किती जरी व्यवस्थित वाहन चालवीत असलो तरी समोरून
येणारे वाहन चालविणारा कसा वाहन चालवितो यावर देखील बरेच अवलंबून असते म्हणूनच
सर्वांनीच नियमांची पायमल्ली थांबवावी.
सोलापूर जिल्ह्याशी
जोडले जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन रुपडं घेवून सेवेत तयार होत आहेत, हे आपण
जाणतोच, त्याचप्रमाणे हे महामार्ग विविध आव्हानं देखील सोबत आणत आहेत कि काय? अस
वाटतं. तस पाहिलं तर अपघातांची मालिका कमी होण्यास मदत नक्की होणार आहे पण...... हा
“पण” खूप काही सांगतो, गाडी चालक आणि पादचारी यांच्यात एक वेगळच नातं असतं. आता
तुम्ही म्हणाल नातं कसलं ? तर एक-दुजे के लिये असं नातं !! कारण राष्ट्रीय
महामार्गावरून वाहन चालविताना डिव्हाडर च्या झाडीमधून डोकावणारे आणि तेवढ्याच घाई
घाईने रस्ता ओलांडणे हेतू पळणारे तुम्ही देखील पाहिले असतील, हो ना? यामध्ये
महामार्गाच्या बाजूस असणाऱ्या शाळेत शिकणारी गावातील लहान मुले देखील असतात. या
मंडळींना डिव्हाडर जिथे ब्रेक (खास रस्ता ओलांडता यावा म्हणून) केलेला आहे, तिथे यासाठी
व्यवस्था केलेली आहे याचे भानच नसते ,चार पावले जास्त चालून रस्ता ओलांडण्या ऐवजी स्वत:चा
जीव मुठीत ठेवायला हि मंडळी का बरं तयार होत असतील? हा एक अनुत्तरीत प्रश्न आहे.
हि मंडळी
भलेही त्या भागात रहात असतील पण तेथील (मार्ग) रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग आहे याचे
भान बहुधा या मंडळीना नसावे, किंवा मार्ग, महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग या
शब्दांचा आणि त्यांचा दूरवर संबंध येत नसावा, कि हम करे सो कायदा, यहाँ हमारा राज
चलता है !! वगैरे वगैरे , काही मंडळी तर दिमाखात रस्ता ओलांडताना दिसतात (हि मंडळी
रस्ता क्रॉस करतात म्हणजे अगदी रेड-कार्पेट वरून निघाल्या सारखी रस्त्यावरून (राष्ट्रीय
महामार्ग) निघतात) चार चाकी चालकाने समजून उमजून वाहनावर नियंत्रण ठेवणे या
परिस्थितीत इष्ट मानावे लागते. इथे जर वाहन चालकाने थोडी जरी मनमानी केली तर आपत्ती
ओढावून घेतलीच म्हणून समजा !! कारण वाहनाचा वेग कसा, त्यावर त्यास नियंत्रण
ठेवायला जमतं, नाही जमत अशा बऱ्याच बाबी यामध्ये येतील पण या सर्व बाबींमध्ये
एखाद्याचा जीव जाऊ शकतो हे नक्की !
राष्ट्रीय
महामार्गावर सर्व्हिस, स्लिप रोड नावाचा प्रकार पहायला मिळतो, याचे प्रयोजन यशस्वी
होते कि होत नाही, यावर कुणाचा अंकुश नसतोच, का खास खर्ची घालण्याकरिता केलेला हा प्रकार
असतो कि काय ? असे विचार मनात डोकावतात, पण याबाबत असणाऱ्या अज्ञानामुळेच या
रस्त्याचा योग्य वापर होत नाही. स्लिप रोड हा एक
छोटा रस्ता आहे जो महामार्गाच्या विभागात प्रवेश करण्यासाठी किंवा बाहेर
पडण्यासाठी प्रदान केला जातो,तर सर्व्हिस लेन हा एक रस्ता आहे जो
मुख्य (व्यस्त) रस्त्याला
समांतर जातो, मुख्यत:
स्थानिक रहदारीसाठी प्रवेश प्रदान करतो आणि त्याद्वारे मुख्य रस्त्यावरील रहदारीत
द्रुतगतीने जाण्यात कमीतकमी हस्तक्षेप करणे सुलभ होते. याची जाणीव स्थानिक मंडळीना नसतेच ते सरळ महामार्गावर
त्यांचे वाहन दामटत असतात असे वारंवार निदर्शनास येते. तसेच मोठी वाहने देखील महामार्गावर
कडेलाच उभी केलेली असतात. यामुळे अपघातांना निमंत्रण मिळते एवढं मात्र नक्की !!
हा लेख
प्रपंच का आणि कशासाठी ? तर वाहन चालकांनी त्या सोबतच पादचाऱ्यांनी नियमांचे भान
राखावे, नियम पाळावेत, जेवढे जास्त काटेकोर पणे नियम पाळले जातील तेवढ्या दुर्घटना
कमी होतील हा आशावाद !!
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
YouTube Channel: www.youtube.com/c/amitkamatkar
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा