फॉलोअर

बदलाचे साक्षीदार व्हा, पुढाकार घ्या

गणेशोत्सव म्हणजे सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपणारी परंपरा, अर्थात आपण सगळेच हि परंपरा जपत असतो अस म्हणाल्यास वावगं होणार नाही. दरवर्षी श्री गणेशाच्या आगमनाची तयारी आणि विसर्जनाची देखील तेवढीच तयारी प्रत्येक जण यथासांग ज्याच्या त्याच्या परीने करीत असतो. हे करीत असताना विविध रूढी, परंपरा यांचा मान राखणं हि तेवढच महत्वाच असतं आणि हे संभाळणे कोणासही सांगणे न लगे ! बाप्पा येणारं म्हंटल कि घरात केलेली सजावट, रोषणाई ने घर तर फुलून जातच पण सार्वजनिक गणेशोत्सवात केलेल्या रोषणाई ने आसमंत खुलून जातो. हे दहा दिवस म्हणजे आनंद उत्सवाचे असतात, गणेशास काय हवयं, काय नकोय याकडे सगळेच लक्ष ठेवून असतात. दहा दिवसांचा पाहुणा म्हणून कि काय, त्याच्यावर असणारी श्रद्धा म्हणा नाहीतर त्याच्यावरील प्रेम म्हणा किंवा आपल्या हक्काचा , जवळचा भासणारा ईश्वर म्हणा या सगळ्यामुळे खूप काळजी घेतली जाते. परमतत्व ओंकाराचे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो, तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपण सर्वजण दरवर्षी गणरायाच्या आगमनाची वाट पहात असतो.

वाट पाहणे आणि वाट लावणे यात अंतर आहे हो ना? आता तुम्ही म्हणाल असं काय मध्येच? अहो पण ज्याची एवढी वाट पहायची त्याला निरोप देताना कुणाचीच, अपवाद वगळता (श्रीगणेशाची देखील बर का !), कसल्याच प्रकारची काळजी घ्यायची नाही आपल्याच विश्वात अगदी बेफान होऊन रंगून जायचं हे आपल्याला शोभणारं आहे का? हे तपासून पहायची वेळ आली आहे. कारण आपण सगळे सुशिक्षित !!! (खरचं आहोत का?) गणेश मूर्ती घरी आणून दहा दिवस विधिवत पूजा करून त्याचा आशीर्वाद घ्यायचा (श्रद्धा आणि भक्तीचा विषय) आणि त्यास विसर्जना दिवशी विसर्जन स्थळी “फेकून” यायचे ? हे म्हणजे “गरज सरो आणि वैद्य मरो” ह्या म्हणी सारखं वाटतं मला. काल यावर्षीच बाप्पांच (मूर्तीचं) विसर्जन झालं तिथे काही सुशिक्षित मंडळी प्रथा जपणे हेतू तलावात बाप्पाचे विसर्जन करण्यास आली होती, पण जो भक्ती भाव दिसायला हवा तो मात्र मिसिंग होता, त्यांच्या हातात असणारी बाप्पाची मूर्ती आहे हेच विसरून दूरवर पाण्यात फेकायची आहे आणि त्याची खास स्पर्धा भरविण्यात आली आहे असा काहीसा तो देखावा होता. पाहताक्षणी योग्य वाटले नाही म्हणून काही मंडळीशी बोलायचे धाडस केले तर त्यांनी याविषयी मलाच उपदेश करण्यास सुरुवात केली. मी त्यांना एवढचं म्हणालो, “मूर्ती फेकू नका”, काय चुकीचे बोललो? पाण्यात (खरेतर वाहत्या पाण्यात सोडायला हवे, पण आपण रहात असलेल्या शहर रुपी जंगलात हे शक्य नाही) अलगद सोडा, पण हे या मंडळींना मान्य होईना, यात एखाद-दुसऱ्या मंडळींनी यावर कृती केली आणि बाप्पास अलगद पाण्यात सोडले. हि सुशिक्षित म्हणवून घेणारी मंडळी शिक्षित आहेत म्हणूनच अशी आहेत काय? असा प्रश्न मला पडतं आहे. बाप्पाच्या मूर्ती बाबत असा अनुभव आला आणि निर्माल्या बाबत हि असाच अनुभव यावा, हे मात्र आता क्लेशदायक वाटू लागलं. काल विसर्जन स्थळी महापालिकेने आणि काही स्वयंसेवी संस्थांनी निर्माल्य विसर्जनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती पण ...... हा “पण” इथेही आला बर का !!! काही सुशिक्षित (?) मंडळीना हे माहिती करूनच घ्यायचं नव्हतं बहुतेक कि या स्वतंत्र व्यवस्था असणाऱ्या ठिकाणी निर्माल्य जमा करायचे आहे. हि मंडळी आपली प्लास्टिक पिशवीत भरून आणलेलं निर्माल्य रस्त्याच्या कडेला ठेवून पळ काढत होती तर कुणी थेट तलावात प्लास्टिक पिशवीसह फेकून देत होती. अरे ! काय चाललय ? मोठ मोठ्या कंपन्यांचे, शासनाचे करोडो रुपये वाया जाताना पाहून मला खूप वाईट वाटले. (याचे दुष्परिणाम काय होतील या विचाराने तर थरकाप उडतो) आपण चुकीचं वागतं आहोत एवढही या मंडळींना समजत, उमजत  नाही. म्हणजे हि मंडळी टेलिव्हिजन पाहत नाहीत, रेडीओ ऐकत नाहीत, वर्तमान पत्र वाचत नाहीत, यांचा आणि जगाचा काडीमात्र संबंध नाही...असाच अर्थ काढावा असं वाटतं होतं. मी सगळ्यांना वैयक्तिक जावून सांगू शकत नव्हतो याचा खेद वाटतो आहे म्हणूनच आज या लेख प्रपंचातून (हा लेख तुमच्या पर्यंत आल्यास आणि तो तुम्ही वाचल्यास या आवाहनास प्रतिसाद द्यावा) हात जोडून विनंती कि “बदलाचे साक्षीदार व्हा, पुढाकार घ्या”.
पुढील गणेशोत्सवात एक संकल्प राबविण्याचा मानस मी कालच केला, या काळात जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तेवढ्या लोकांपर्यंत पोहोचून जागृती करायची, आणि बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा, बाप्पाला हेच अपेक्षित आहे.
तुम्ही देखील माझ्या सोबत येवू शकता त्यासाठी सोबत दिलेला फॉर्म भरावा माझ्या संस्थेचे प्रतिनिधी पुढील वर्षी तुम्हांस संपर्क साधतील आणि आपण सगळे मिळून एक वाटचाल करूया  “नवा बदल घडविण्याच्या दिशेने,” सहकार्य अपेक्षित !!

फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक ला फॉलो करावे.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
यु ट्यूब चॅनल: www.youtube.com/c/amitkamatkar


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?