फॉलोअर

ये जो पब्लिक है, यह सब जानती है


कोणत्याही प्रकारच्या राजकारणावर मत व्यक्त करण्या एवढा माझा अभ्यास नाही, पण ज्या प्रकारची परिस्थिती सध्या भारतीय राजकारणात दिसत आहेत, घडतं आहेत त्यावर व्यक्त व्हावे या उद्देशाने हा लेख प्रपंच ! ! २०१४ च्या लोकसभेत भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षांना मताधिक्य मिळाले आणि भाजपा चे सरकार सत्तेत आले. देशास मा.नरेंद्र मोदींच्या रूपाने चतुरस्त्र व्यक्तिमत्व असणारे पंतप्रधान मिळाले. त्यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कालखंडात केलेल्या कामाच्या जोरावर जनतेने पुन्हा २०१९ मध्ये प्रचंड बहुमताने भाजपास निवडून दिले आणि पुन्हा सत्ता भाजपाचीच आली, भारताच्या इतिहासात अनेक वर्षानंतर एकाच पक्षास बहुमत मिळाले होते. मला आठवते २१ जून १९९१ मध्ये जेंव्हा मा.पी.व्ही.नरसिंहराव पंतप्रधान झाले होते त्यावेळी एका जाहीर सभेत त्यांनी एक विधान केले होते, कि या देशास फक्त कॉंग्रेसच स्थिर सरकार देवू शकते आणि लोकसभेचा कार्यकाळ पुर्ण करू शकते”, पण जनतेने ज्याप्रमाणे २०१४ आणि २०१९ मध्ये कल दिला ते पाहता जनताच खरी राजा, “ये जो पब्लिक है, यह सब जानती है”, उस्ताद आनंद बक्षी यांच्या गीताप्रमाणे मा.नरसिंहराव यांचा दावा पुरता मोडीत काढला असेच म्हणावे लागेल.
               सत्ता पुन्हा येण्यामध्ये अनेक बाबी असू शकतात, नव्हे आहेत, ज्यामध्ये सामान्य कार्यकर्त्याचे अथक प्रयत्न, जनसंपर्क, झालेली कामे (जी जनते पर्यंत पोहोचली असेच म्हणावे लागेल), नेत्यांची पक्षाप्रती निष्ठा, पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यावर असणारे पक्षाचे संस्कार, पक्षाची कार्यप्रणाली, पक्षातील मान्यवर ज्येष्ठ नेत्यांचे पक्षाप्रती, देशाप्रती योगदान आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेची इच्छा अशी अनेक कारणे सांगता येवू शकतील. यातील काही बाबी खूप आदर्शवत आहेत पण त्याही जनतेस कुणा ना कुणा नेत्यांमध्ये सापडल्या असतील म्हणून उल्लेख केला. सामान्य जनतेची कामे केल्याशिवाय जनता कोणालाच (काही अपवाद वगळता) थारा देत नाही, डोक्यावर घेत नाही  हे प्रत्येक पक्षाने ध्यानात घेण्याची वेळ आली आहे असे वाटते. काल दि.०८ सप्टेंबर रोजी साजरा झालेल्या आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसा दिवशी जाहीर झाल्या प्रमाणे भारतात साक्षरतेचे प्रमाण ७०% एवढे आहे, हा आकडा बदलत जाणार तसे मतदार त्यांच्या अधिकाराप्रती जागृत होत आहेत आणि होतील असेच म्हणावे लागेल. आता हेच पहा ना, आय.टी. (माहिती तंत्रज्ञान) ची वाट सगळेच धरत आहेत, अगदी हातातील स्मार्ट फोन ते कॉम्प्युटर पर्यंत सगळेच युजर होत आहेत.  भारतात ८७% मोबाईल युजर आहेत, हा आकडाच मुळी एवढा मोठा आहे कि यावर बरीच गणितं अवलंबून आहेत असे मला वाटते. स्मार्ट फोनचा वापर करण्याची घरातून मिळणारी तालीम खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर वाढवीत आहे. ज्यांना हे कळाले ते या लाटेवर स्वार झाले आणि मार्गक्रमण करू लागले पण ज्यांना अद्याप हे झेपलेलेच नाही त्यांची मात्र दाणादाण होताना दिसत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या समुद्रात अशा अनेक बदलाचे संकेत देणाऱ्या लाटा रोज येतात पण जो यावर स्वार होतो तोच होणाऱ्या बदलात योगदान देवू शकतो, हा साधा आणि आवश्यक नियम पाळला कि खूप गोष्टी सहज, साध्य होतात असा अनुभव आहे.
          आज भाजपा आणि मित्र पक्ष यांची सत्ता आहे, यामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावर जनता खुश आहे असं दिसतं पण एक गोष्ट मान्य करावी लागेल कि मोठे निर्णय घेण्यासाठी आवश्यक संख्याबळ त्यांच्या जवळ आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे निर्णय घेण्याची धमक देखील नेत्यांमध्ये आहे. भारताच्या राजकीय इतिहासात संख्याबळाचे गणित आपण सर्वानीच पाहिले आहे, इथे एक मताने सत्ता पालट देखील पाहिला आहे आणि त्याचवेळी भारतरत्न मा.स्व.अटलबिहारी वाजपेयी यांची भविष्यवाणी देखील सत्यात आलेली अनुभवली आहे, अनुभवत आहोत.
          सगळा सत्तेचा खेळ असं आपण नेहमी म्हणतो, त्यात काही वावगं नाही पण ज्याप्रकारे मोठ-मोठी नेते मंडळी सत्ता चक्रात (खुर्ची / सत्ता प्रिय मंडळी) अडकलेली दिसत आहेत, ते पाहून खेद वाटतो. ज्या उमेदीने कार्यकर्ते आपल्या नेत्याचा झेंडा हातात घेतात आणि खिंड (प्रभाग) लढवतात हे खूपच कौतुकास्पद असतं सगळं पण आजकाल एक नवीन बाब समोर येते आहे, ही कार्यकर्ते मंडळीच आपल्या नेत्याला सांगतात म्हणे “झेंडा बदल करायला” ! असं वाचनात आहे म्हणून लिहिण्याचे धाडस!! एकीकडे ही मंडळी आहेत जी सत्तेत येणे हेतू पक्षांतर करीत आहेत आणि एकीकडे असाही सामान्य कार्यकर्ता आणि प्रस्थापित नेते मंडळी आहेत जे निष्ठेने सेवा बजावीत आहेत. ज्या प्रभागातून जो उमेदवार (मग भलेही तो उपरा का असेना) विजयी होवू शकतो त्यास तिकीट मिळते असे ऐकून आहे, पण जनता जनार्दन हे सर्व जाणते हे विसरता कामा नये. विविध नेत्यांचे (अर्थातच विरोधक) पक्षांतर ज्याप्रकारे सुरु आहे ते पाहिल्यावर असं म्हणता येवू शकतं कि “सत्ता, द गेम ऑफ पॉवर”, इथे पॉवर हा शब्दप्रयोग आहे कृपया ध्यानात घ्यावे.
          म्हणूनच .....
ये जो पब्लिक है सब जानती है
ये जो पब्लिक है..
अजी अंदर क्या है, अजी बाहर क्या है
ये सब कुछ पहचानती है.
योग्य वेळी ज्याचे त्याला स्थान दाखविण्याचे तंत्र या सामान्य जनतेने कडे आहे यांची जाण मान्यवर नेते मंडळींनी ठेवावी एवढीच माफक अपेक्षा !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?