आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके – गीतकार समीर
बहुत खुबसुरुत गजल लिख रहा हुं, तुम्हे देखकर आजकल लिख रहा हुं|| गीतकार समीर अनजान (शीतला पांडे) यांना आपण “समीर” म्हणून ओळखतो. गीतकार अनजान यांचे चिरंजीव, एवढीच ओळख घेवून चित्रपट सृष्टीत आलेले बँक अधिकारी समीर यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख तयार केली. किंबहुना ते त्यात यशस्वी झाले असे म्हणाल्यास आतिशयोक्ती होणार नाही. सर्वात जास्त गाणे लिहिण्याचे गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड्स समीर यांच्या नावे आहे. १७ फेब्रुवारी २०१६ रोजी त्यांना गौरविण्यात आले. सुरुवातीच्या काळात गाणी वडिलांकडून लिहून घेतली जातात असा आरोप त्यांच्यावर व्हायचा पण जेंव्हा संगीतकारा समोर बसून गाणी लिहली तेंव्हा सर्वाना पटलं कि “बॉलीवूड ला एक नवा गीतकार समीर” मिळाला. मनाला सोन्याची (सोना कितना सोना है) उपमा देणारा हा गीतकार म्हणजे अगदी सहज यमक जोडणारा जादुगार म्हणावा, १९८३ मध्ये गीतकार म्हणून नवी सुरुवात करणारे समीर यांनी लवकरच आशिकी या चित्रपटासाठी फिल्म-फेअर पुरस्कारावर स्वत:चे नाव कोरले. समीर यांनी त्यांचे वडील गीतकार अनजान ,मजरूह सुलतानपुरी आणि उस्ताद आनंद बक्षी यांना गुरु स्थानी मानले. तुम दिल कि धडकन में अस म्हणत समीर खरोखरी आपल्या सर्वांच्या मनात विराजमान आहेत. नदीम-श्रवण, आनंद-मिलिंद, या नव्वद च्या दशकातील अग्रगण्य संगीतकारांबरोबर दिलेली गाणी म्हणजे त्याकाळी युवा पिढीचे भावविश्व समृद्ध करणारी गाणीच म्हणावी लागतील.हा काळ ज्यांनी अनुभवला आहे ते नक्कीच माझ्या या मतास दुजोरा देतील.
एका मुलाखतीत समीर म्हणाले होते गीतकारा कडील ९०% गीते वापरलीच जात नाहीत. दिग्दर्शक सिच्युएशन सांगतो, कथा सांगतो आणि त्याप्रमाणे गीत लिहावे लागते आणि ते काम त्यांनी अगदी चोख बजावले म्हणूनच ते यशस्वी होवू शकले. संगीतकाराने तयार केलेल्या धूने वर बोल देण्यामध्येही समीर यांचा हातखंडा आहे. त्यांचा असा ठाम विश्वास आहे कि प्रत्येक गाण्याच्या मागे एक गोष्ट असते आणि त्यावरूनच गाणं लिहिलं जातं. नदीम-श्रवण यांची जोडी आणि समीर हे एक वेगळच समीकरण हिंदी चित्रपट सृष्टीत खूप गाजलं, साजन चित्रपटातील सगळीच गाणी अप्रतिम होती. नाही का? चित्रपटाचे पूर्ण शुटींग झालं पण समीर यांना वाटायचं कि या चित्रपटाचे शीर्षक गीत असावं म्हणून त्यांनी शीर्षक गीत लिहिलं, “देखा है साजन कि आंखो में”, हे गीत नदीम-श्रवण यांना देखील आवडलं, आणि काय आश्चर्य शुटींग च सगळं शेड्युल संपलेले असताना देखील फक्त या गाण्याच्या रेकॉर्डिंग साठी माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी सात तासांचे पुनर्योगदान दिले आणि हे गाणं शूट केले.
समीर म्हणतात तसचं असतं अगदी प्रत्येक गाणं लिहायच्या प्रोसेस मध्ये आणि ते शूट होवून पडद्यावर येई पर्यंत त्याच्या प्रवासात एक कथाच तयार होते. “नजर के सामने” अस म्हणत १९९० साली प्रकाशझोतात आलेला हा गीतकार त्यांच्या २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या मरुधर एक्स्प्रेस मध्ये “बलमा ऐसा न निकले” म्हणतं रसिक श्रोत्यांना भुरळ घालतोच आहे. यांना शब्दांचा जादुगारच म्हणावा लागेल कारण चित्रपट सृष्टीत ३६ वर्ष सेवा देत राहणं हि एक उत्तम कामगिरीच ! आपण यांच मोजमाप यशात आणि अपयशात करतो पण रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणे आणि आजही समीर यांची गाणी तेवढ्याच आवडीने ऐकली जाणे यात त्यांच यशच सामावलं आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. समीर यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा !!
महत्वाचे: तुम्हास आवडणारे समीर यांनी लिहिलेले गीत कमेंट करावं.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा