ब्रेकिंग न्यूज
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (TRP) या साठीच आपण टेलिव्हिजन समोर असतो असचं म्हणावं लागेल. कारण प्रत्येक गोष्टीत याच टी.आर.पी. साठी सगळा खेळ सुरु असतो. यात जो जास्त पॉईंट घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार (त्यांच्या लेखी) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. सगळ्यात जास्त जाहिराती कुणी दाखवीत असतील तर ते इलेक्ट्रॉनिक मीडिया अर्थात चॅनल्स, तुम्ही पहा एखादी ब्रेकिंग न्यूज आली रे आली (आजकाल अनेक ब्रेकिंग न्यूज येतात- अगदी एकामागोमाग एक) कि हा खेळ सुरु होतो. मग एक बातमी आणि लगेच ब्रेक अस काहीतरी समीकरण असतं या मंडळींचं ! नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महाराष्ट्राने कौल दिला त्याप्रमाणे सरकार स्थापन व्हायला हवं होतं आत्तापर्यंत पण नाही होवू शकलं, कारणं अनेक असतील पण या न्यूज चॅनल्स नी पार खेळ खंडोबा केला या बातमीचा , अस नाही का वाटतं तुम्हाला ?, पत्रकारिता हा लोकशाहीतील चौथा स्तंभ असे म्हणतात पण “सर्वप्रथम आम्हीच” या स्पर्धेत विश्वासार्हता हरवत चालली आहे, हे मात्र नक्की. या स्पर्धेत जर एखादी बातमी फ्लॅश झालीच आणि काही कालावधीनंतर ती चुकीची निघाली तर कोणत्याही प्रकारची दिलगिरी व्यक्त केली जात नाही, (हि संस्कृतीही लोप पावत चालली आहे असे वाटते, मला आठवतं एका मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या निधनाची माहिती ब्रेकिंग म्हणून देण्यात आली, ती चुकीची आहे असे कळताच त्या बद्दल दिलीगिरी व्यक्त करण्यात आली होती, हे सगळ राष्ट्रीय चॅनल वर घडलं होतं) उलट काहीतरी नवीन ब्रेकिंग आहे यावर फोकस केला जातो. चॅनलवाल्यांना टीआरपी मुळे माहिती आहे कि प्रेक्षक काय पाहत आहेत, त्यांना काय हवयं. ब्रेकिंग म्हणून प्रेक्षकांच्या माथी मारल्या जाणाऱ्या न्यूज किती खऱ्या आहेत हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. अमुक एखादी प्रतिष्ठित व्यक्ती हि सकाळी घरातून निघाली पासून ते रात्री घरी पोहोचे पर्यंतच प्रवास ब्रेकिंग मध्ये येवू शकतो. या प्रवासात त्यांचे बाईटस् मिळविण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे प्रतिनिधी या सर्वांच्या प्रयत्नांचे करावे तेवढे कौतुक कमीच, नाही का? बातमी काय आहे एवढचं दाखविणं अथवा सांगण अपेक्षित असताना त्याचे निष्कर्ष हि काढले जातात, आणि पुन्हा एका प्रश्न चिन्हासह ब्रेकिंग म्हणून समोर येतात. अपवाद काही चॅनल्स आहे याचे समाधान मानावे लागते.
बातमी कव्हर करण्यासाठी प्रतिनिधी विविध ठिकाणी तैनात असतात, त्याची वेगळी जाहिरात, त्याचा वेगळा सोपस्कार अगदी बारकाईने पार पाडला जातो. प्रेक्षकहो पहा तुमच्यासाठी केवढी मोठी फौज तैनात आहे असे चित्र उभे केले जाते. शेवटी मार्केटिंगचा जमाना आहे !! प्रॉडक्ट विकायचे म्हणजे त्याचे सादरीकरण तर करावेच लागणार. हि प्रतिनिधी मंडळी बाईट मिळविण्यासाठी खटाटोप करताना आजकाल नेत्यांची फार अडचण होताना दिसते, मायक्रोफोन पार नेत्याच्या तोंडात धरतात कि काय असं वाटतं, बरं हे करताना थोडहि तारतम्य पाळल जात नाही असं दिसतं, असचं भोंगळवाणं चित्र एखादा नेता अथवा मंत्री प्रतिनिधींना संबोधत असतो तेंव्हा दिसतं, उपस्थित प्रतिनिधींचा गोंधळ पाहून खेद वाटतो, एकमेकावर ओरडण्या पासून ते पार कडेलोट करण्यापर्यंत सर्वकाही सुरु असतं फक्त आणि फक्त माय-बाप प्रेक्षकासाठी. हा गोंधळ का चालू असतो याचा थोडा अभ्यास केला तर कळेल, अर्थात याच उत्तरही एकच, “सर्वप्रथम” बातमी दाखविण्याची धडपड, अगोदरचा काळ आठवावा तेंव्हा कुठे होत्या ब्रेकिंग न्यूज हे स्तोम अलिकडील काही वर्षातच खूप वाढलं आहे. वर्तमान पत्र वार्तांकन करायचीच (भलेही दुसरे दिवशी का असेना) कि त्यांच्याकडे कुठे ब्रेकिंग न्यूज वगैरे असतं, पण लाईव्ह असण्यामध्ये आणि वार्तांकन करण्यामध्ये जी मजा आहे ती काही औरच म्हणावी लागेल. आपल्याला हि आता ब्रेकिंग न्यूज ची सवय झालीय आपणही वाट पहात टेलिव्हिजन सेट समोर बसूनच असतो, नाही का? याचा फायदा टीआरपी वाढण्यास होतो हे नक्की !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा