फॉलोअर

ओ मेरे दिल के चैन : मजरूह सुल्तानपुरी

हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी गीतकार अस म्हणालो तर वावग होणार नाही, असे ‘असरार उल हसन खान’ म्हणजेच आपल्या सर्वांचे मजरूह ! एक गीतकार, उर्दू कवी म्हणून ते सर्वांच्या परिचयाचे आहेत. जवळपास सहा दशक हिंदी चित्रपट सृष्टीत योगदान देणारे मजरूह विरळच वाटतात मला, नौशाद साहेबांपासून ते पार अलिकडील अनु मलिक, जतीन-ललित, ए.आर.रेहमान या संगीतकारांसोबत देखील मजरूह यांनी गाणी दिली आहेत. १ ऑक्टोबर १९१९ मध्ये उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे मजरूह यांचा जन्म झाला, म्हणूनच त्यांनी सुल्तानपुरी हे आडनाव लावलं. त्यांचे वडील पोलीस दलात हवालदार या पदावर कार्यरत होते. वडिलांची खूप इच्छा होती कि त्यांनी युनानी शिकावं आणि हकीम व्हावं तसा प्रयत्न देखील त्यांनी केला पण त्यांचा ओढा हा कविता लिहिण्याकडे होता आणि त्यांची हीच आवड त्यांना स्वप्न-नगरी मुंबई कडे घेवून आली. दरम्यानच्या काळात विविध संमेलनात सहभाग नोंदवीत घरखर्च पार पाडला जायचा. मजरूह साहेब जिगर मुरादाबादी यांना गुरु स्थानी मानत. त्यांच्याकडून शायरीचे धडे घेतले. १९४५ मध्ये एका कवी संमेलनामध्ये चित्रपट निर्माता ए.के.कारदार यांची नजर मजरूह यांच्यावर पडली त्यांची शायरी त्यांना खूप आवडली त्यांनी लागलीच मजरूह साहेबांना  त्यांच्या एका चित्रपटासाठी गीते लिहण्याची संधी दिली आणि अशा प्रकारे मजरूह यांचा हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश झाला. १९४६ साली प्रदर्शित झालेला “शाहजहां” हा चित्रपट, ज्याद्वारे एका सुरील्या, अर्थपूर्ण, भावविश्वाचे वर्णन करणाऱ्या प्रवासाची सुरुवात झाली. एक गीतकार असून देखील “सुरील्या” म्हणण्याचे एक खास कारण आहे ते असं मजरूह साहेब संगीतकाराच्या सुरेल स्वरमालेवर अर्थात ट्यून वर देखील त्यांच्या बोलांचा शृंगार द्यायचे आणि गीत अजरामर व्हायचं, अशी अनेक गाणी आहेत. मेरी भिगी भिगी सी , हे त्यापैकीच एक गीत.
          मजरूह साहेब फक्त चित्रपटसृष्टी पुरती गाणी लिहित नसतं तर खासगी पुस्तकांसाठी, काही चळवळीसाठी देखील गाणी लिहिली जायची. साधारण १९४९ चा काळ असेल या दरम्यान आखिल भारतीय प्रगतशील लेखक संघ, ज्या मध्ये फाळणीपूर्व काही कवी/गीतकार मंडळी होती, त्यांच्या एका आंदोलना दरम्यान मजरूह साहेबांनी “अमन का झंडा,किसने कहा लेहराने ना पाये”, असे एक गीत लिहिले ज्यामध्ये पंडित नेहरु यांची तुलना हिटलर सोबत केली असा ठपका ठेवून तत्कालीन सरकारने मजरूह यांना तुरुंगात टाकले. हि कैद पूर्ण दोन वर्षे त्यांनी भोगली या दरम्यान सरकारने त्यांच्या कवितेबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितले असताना देखील मजरूह यांनी नकार दिला आणि झालेली शिक्षा पूर्ण केली. हि कैद त्यांना त्यावेळेचे आघाडीचे कलाकार बलराज साहनी यांच्या सोबत झाली होती. या कैदे दरम्यान देखील ते चळवळीसाठी आणि चित्रपट सृष्टीसाठी गीते लिहितं असतं. “एक दिन बिक जायेगा माटी के मोल” हे गीत तुरुंगात असतानाच लिहिले गेले नंतर राज कपूर यांनी ते त्यांच्या धरम-करम या चित्रपटासाठी वापरलं.

          ५४ वर्षाच्या मोठ्या कारकिर्दी मध्ये जवळपास ३५० चित्रपटांसाठी गीतलेखन (४००० पेक्षा जास्त गाणी) ज्यामध्ये शायरी, कव्वाली, गझल, मुजरा, लोकगीतं आणि टिपिकल बॉलीवूड मसाला गाणी अशी अष्टपैलू कामगिरी करणारे मजरूह यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचा वेगळाच ठसा उमटवला आहे. १९६५ मध्ये दोस्ती चित्रपटातील “चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे” या गीतासाठी पहिला फिल्म-फेअर पुरस्कार देण्यात आला. त्याचप्रमाणे १९९३ मध्ये दादा साहेब फाळके पुरस्काराने मजरूह साहेबांना  सन्मानित करण्यात आलं, एखाद्या गीतकाराला हा पुरस्कार पहिल्यांदाच देण्यात आला.
          पंचम दा आणि मजरूह साहेब एक वेगळच नातं, समीकरण होतं. चित्रपट सृष्टीत सर्वात यशस्वी जोडी म्हणजे हे दोघे. तसे पंचमदा यांनी आनंद बक्षी साहेबांसोबत देखील काम केले पण साधारण १९८० पर्यंत विविध चित्रपटात मजरूह यांच्या गाण्यांचा आस्वाद आपण घेतला आहे. १९६० साली पंचम दा सिनेसृष्टीस नवखे होते त्यावेळी गीतकार म्हणून मजरूह साहेबांना पसंती दिली आणि या दोघांनी जी जादू केली ती अद्यापही भुरळ घालते. १९६६ मध्ये तिसरी मंजिल या चित्रपटासाठी मजरूह यांनी सगळी गाणी लिहिली, या नंतर नासीर हुसैन यांच्या अनेक चित्रपटासाठी गीतकार म्हणून मजरूह यांनीच काम पाहिले ज्यामध्ये बहारों के सपने, प्यार का मौसम, कारवां, यांदो कि बारात, हम किसीसे कम नही  ई. चित्रपटांचा खास करून समावेश होतो. नासीर हुसैन यांचा आवडता गीतकार म्हणून सुरु झालेला हा सिलसिला कयामत से कयामत तक आणि त्यानंतर प्रदर्शित झालेला जो जीता वहि सिकंदर या चित्रपटा पर्यंत सुरु होता. या दोन्ही चित्रपटात संगीतकार वेगळे आहेत पण गीतकार म्हणून मजरूह साहेबांचा करिश्माच आपल्याला दिसतो. बहारों के सपने चित्रपटातील “क्या जानू सजन” हे गीत एक वैशिट्यपूर्ण असं गीत आहे, गायलं होतं लता दिदींनी, चित्रपट कृष्ण-धवल होता पण हे एकमेव गीत कलरफुल चित्रित करण्यात आलं होतं. हेच गीत पंचमदा श्रद्धांजली वाहण्यासाठी तयार करण्यात आलेला दिल-विल प्यार व्यार या चित्रपटात कविता कृष्णमुर्ती यांनी गायलं.
          १९६९ साली आलेला प्यार का मौसम मध्ये एकच गीत दोन नायकांवर चित्रित करण्यात आलं, ते गीत होतं “तुम बीन जाऊ कहां”, दोन्ही गीताचे बोल पूर्ण वेगळे, सादरीकरण वेगळे पण जादू एकचं, एक गीत शशी कपूर यांच्यावर चित्रित झाले जे रफी साहेबांनी गायले तर दुसरे भारत भूषण यांच्यावर चित्रित झाले जे यॉडलिंग सह किशोरदा नी गायले. असा योग अजूनही इतर चित्रपटात आला पण मला कुदरत चित्रपटातील “हमें तुमसें प्यार कितना” या गाण्याचं जास्त अप्रूप वाटतं. हे गीत बेगम परवीन सुल्तानाजी आणि किशोरदा यांनी गायलं, दोन्ही गीतं अत्यंत वेगळ्या पठडीतील, एकास पूर्ण शास्त्रीय बाज आणि एक पूर्ण किशोरदा फेम (फक्त आणि फक्त किशोरदा यांनीच म्हणावं असं), दोन्ही गीतं अजरामर! तेंव्हाच्या आणि आजच्या युवापिढीचे देखील  भावविश्व समृद्ध करणारी हि दोन्ही गीतं मजरूह साहेबांनी आपल्याला दिली.
          मजरूह साहेबांच्या शायरी मध्ये त्यांचा जीवन प्रवास सांगता येतो, “मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल  मगर लोग साथ आते गये और कारवां बनता गया" अगदी खरं आहे, असा हा गीतकार २५ में २००० साली वादियां मेरा दामन, रास्ते मेरी बाहें अस म्हणत अनंताच्या प्रवासास निघून गेला. आज या लेखाद्वारे मजरूह साहेबांना माझी शब्द सुमनांजली अर्पण करीत आहे.
   
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
YouTube: Amit Kamatkar

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?