फॉलोअर

कुछ तो लोग कहेंगे – उस्ताद आनंद बक्षी

गीतकार आनंद बक्षी यांना उस्ताद म्हणणं अगदी योग्य वाटतं मला, कारण जीवनाशी संबंधित अनेक मूल्यं, वास्तव त्यांनी शब्दांच्या जादूने पडद्यावर मांडली. समकालीन गीतकार ज्यामध्ये कवी असणारे मजरूह, कैफी आझमी यांच्या विषयी त्यांनी एका मुलाखतीत मत व्यक्त केले होते ते त्यांच्या कामावरील निष्ठा दाखवते, ते म्हणाले होते, “कवी हा स्वत:च्या कल्पनेतून लिहितो, मी कथा, पात्र आणि परिस्थितीतून प्रेरित होऊन लिहितो.” कामाप्रती असणारं समर्पणच दिसतं यातून, म्हणूनच चार दशकं रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे, ५५० चित्रपट आणि ४००० गीतांद्वारे चित्रपट सृष्टीत योगदान देणारे आनंद बक्षी हे विरळच !! २१ जुलै १९३० रोजी अखंड हिंदुस्थानच्या रावलपिंडी (आता पाकिस्तान मध्ये) येथे त्यांचा जन्म झाला, परंतु फाळणी नंतर हिंदू शरणार्थी म्हणून हिंदुस्थानात आले. आनंदजी यांचे वडील रावलपिंडी येथे एका बँकेत व्यवस्थापक पदावर कार्यरत होते, घरात सर्वजण त्यांना नंदू म्हणून हाक मारत असतं, त्यांना आनंद प्रकाश म्हणून ओळखलं जात असे पण त्यांचे मित्र-परिवार त्यांना आनंद बक्षी म्हणून संबोधत असत. फाळणी नंतर बक्षी कुटुंब दिल्ली येथे आले आणि तिथेच स्थायिक झाले. लहानपणा पासून आनंद यांना फिल्मी दुनियेचं आकर्षण होतं, पार्श्वगायक म्हणून करिअर करण्याचं स्वप्न उराशी बांधून दिवस जात होते, किशोरावस्थेत हे आकर्षण एवढं वाढलं कि त्यांनी घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि थेट मायानगरी मुंबई गाठली, पण ब्रेक मिळणं एवढं सोपं कुठे असतं? त्यांच्या पदरी निराशाच पडली त्यावेळी त्यांनी ठरवलं कि सेनेत भरती व्हायचं, आणि त्याप्रमाणे सुरुवातीस रॉयल नेव्ही मध्ये आणि नंतर सेनेत टेलिफोन ऑपरेटर पदावर ते कार्यरत झाले. सेनेत १९४७ ते १९५६ पर्यंत सेवा देखील बजावली, त्यांच्या लक्षात आले कि या पदावर काम करण्यात त्यांचे मन रमेना त्यांनी पुन्हा मुंबई गाठायची ठरविली आणि पुनश्च श्रीगणेशा केला. यावेळी आनंद जी यांची भेट त्यावेळेचे प्रसिद्ध अभिनेते भगवान दादा यांच्याशी झाली आणि दादांनी बक्षी साहेबांना “भला आदमी” या चित्रपटासाठी गीतकार म्हणून संधी दिली, ते साल होतं १९५८ ! या नंतर नशिबाचा फेरा काही बदलला नाही, या चित्रपटामुळे संधी मिळाली पण नाव काही झालं नाही, असा हा संघर्ष सात वर्षे सुरु होता, या संघर्षा नंतर १९६५ साली प्रख्यात संगीत निर्देशक कल्याणजी-आनंदजी यांनी “जब जब फुल खिले” या चित्रपटासाठी बक्षी साहेबांना संधी दिली आणि सुरु झाली बॉलीवूड मधील त्यांची खरी इनिंग !! 


या इंनिंग मध्ये गम्मतशीर गोष्ट अशी आहे, भलेही हिंदी चित्रपट सृष्टीत संधी (बिग ब्रेक) कल्याणजी-आनंदजी यांनी दिली (या नंतर जवळपास बत्तीस चित्रपटात एकत्र काम केले) तरी एल.पी. (लक्ष्मीकांत प्यारेलाल) यांच्या सोबत सर्वात जास्त म्हणजे तीनशे हून अधिक चित्रपटात गीतकार म्हणून काम केले आहे. १९६७ सालाने आनंदजीना यशाच्या शिखरावर नेले, चित्रपट होता “मिलन”, या चित्रपटातील सर्वच गाणी अफलातून होती, “सावन का महिना”, “युग युग से हम मित मिलन के”, “राम करे ऐसा हो जाये”, सगळीच गीतं एका-पेक्षा एक, मिलन च संगीत एल.पीं.च होतं. हिंदी चित्रपट सृष्टीत राजेश खन्ना (काकाजी) आणि किशोर कुमार एक अजब रसायन होतं, जेंव्हा किशोर दा आवाज द्यायचे आणि स्क्रीन वर काकाजी लिप सिंग करायचे तेंव्हा वाटायचं स्वत: काकाजीच गात आहेत, दोघांना “आराधना” ने सुपरस्टार केले, पण या मध्ये बक्षी साहेबांचा रोल हि तेवढाच महत्वाचा होता कारण गीतं लिहिली होती-आनंद बक्षी यांनी, “आराधना” च संगीत एस.डी.बर्मन यांच होतं आणि पंचम यांनी त्यांना सहायक संगीतकार म्हणून काम केले होते, “आराधना” तील गीतांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं, या चित्रपटानंतर पंचम आणि बक्षी साहेबांनी अनेक चित्रपटात काम केले, किंबहुना आनंद बक्षी हे पंचमदांची प्रथम पसंती असतं, अनेक चित्रपटापैकी  “अमर प्रेम” च नाव आघाडीवर घ्यावं लागेल. “चिंगारी कोई भडके”, “कूछ तो लोग कहेंगे”, हि गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत, आणि याचं गारुड अद्यापही रसिक श्रोत्यांवर कायम आहे. चित्रपटाची गरज शब्दांनी भागविणारा, जीवनाचं सत्य मांडणारा गीतकार म्हणजे आनंद बक्षी !! गाण लिहून झालं कि गीतकाराच काम संपत नाही असे बक्षी साहेब मानत आणि त्यानुसार गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळी देखील ते स्वत: हजर रहात असतं. हिंदी चित्रपट सृष्टीत साहीर लुधयान्वी यांच्या नंतर बक्षी साहेबच असे करायचे.

पार्श्वगायनाची संधी आनंदजी यांना १९७० साली मिळाली, आणि त्यांचं गायक होण्याचं स्वप्न देखील पूर्ण झालं, “चरस” या चित्रपटात “आजा तेरी याद आई” सोबतच “मोम कि गुडिया” मधील “बागो में बहार आई”  या गीता मध्ये आनंद जी यांनी स्वरसाज चढविला आहे. ऑल टाईम हिट “शोले” या चित्रपटात देखील त्यांनी एक कव्वाली गायली आहे, पण ती पडद्यावर आली नाही. या गीतकाराच एक वैशिष्ट्य मला असं दिसतं कि वयाच्या चाळीशीत यांनी आयुष्यावर गाणं लिहिलं, ज्यामध्ये आयुष्याचा फलसफा गीताच्या तीन कडव्यात सांगणारं “जिंदगी के सफर में गुजर जातें है जो मकाम” हे गीत, आणि वयाच्या पासष्ठीत “मेहंदी लगा के रखना”, हि दोन्ही गीतं त्या त्या काळात अप्रतिम आणि आजही श्रवणीय आहेत !!     
चार दशकं रसिक श्रोत्यांना भावनिक साद घालणारे उस्ताद आनंद बक्षी त्यांनीच रचलेल्या गीता प्रमाणे- सुबहो आती है, रात जाती है यूँ ही, वक़्त चलता ही रहता है रुकता नहीं, एक पल में ये आगे निकल जाता है, अगदी तसचं चाहत्यांचा हात सोडून ३० मार्च २००२ रोजी बक्षी साहेब पुढे निघून गेले.


या भावविभोर गीतकारास सलाम !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?