प्रगल्भतेचे वरदान- समाधानाची लेखणी
 
  मानवी मनाचे अंतरंग हे अनाकलनीय आणि अथांग सागराप्रमाणे असते. या सागरात सतत विचारांचे , भावनांचे तरंग उमटत असतात. कधी आनंदाची भरती , तर कधी दुःखाची ओहोटी. या तरल , गुंतागुंतीच्या भाव-भावनांना मुक्त वावर देताना स्वतःला पाहण्याची , अनुभवण्याची आणि त्यातून एक प्रकारची आत्मिक शांतता मिळवण्याची किमया केवळ पुस्तकेच साधू शकतात. पुस्तके म्हणजे केवळ कागदावरचे शब्द नसतात , तर ते लेखकाच्या अंतरीचा प्रवास असतो. लेखक आपल्या लेखणीतून विविध सफरींचे दर्शन घडवतो. हे दाखले , हे अनुभव केवळ कथा किंवा वर्णन नसतात , तर ते थेट आपल्या जगण्याशी , आपल्या अस्तित्वाच्या धाग्यांशी जोडणारे आरसे असतात. लेखकाने प्रामाणिकपणे मांडलेले सुख-दुःख , त्याचे यश-अपयश , त्याचे चिंतन आणि त्याचे अनुभव वाचकाच्या हृदयाला स्पर्शून जातात. अशावेळी , वाचक एका अद्भुत समाधानाचा अनुभव घेतो. त्याला हे जाणवते की , ज्या तीव्र भावनांचा अनुभव तो घेत आहे – मग ते उत्कट प्रेम असो , पराकोटीचे दुःख असो , जीवनातील संघर्ष असो किंवा अगदी साधा आनंद असो – त्या अनुभवात तो एकटा नाही.   ' माझ्यासारखं अजूनही कुणी सुखी , दुखी या जगतात आहे ,' या जाणि...
 
 
 
 
 
