फॉलोअर

तंत्रज्ञानाची कमाल – टेक २

तंत्रज्ञान जसं विकसित होतं आहे त्याप्रमाणे मानवजातीस याचा फायदाच होईल, अर्थात त्यासाठीच ते वापरलं गेलं पाहिजे. याच दरम्यान विविध संज्ञा पुढे येताना आपण पाहतो आहोत, जसं कि क्लाऊड कॉम्प्युटिंग, आय.ओ.टी.(इंटरनेट ऑफ थिंग्ज), आय.आय.ओ.टी. (इंडस्ट्रीयल इंटरनेट ऑफ थिंग्ज), ए.आय. (आर्टीफीशिएल इंटेलीजंस), या सर्व विषयांवर मी यापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते ब्लॉग व माझ्या फेसबुक वॉल वर प्रकाशित देखील केलं आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा कोणतेही क्षेत्र ! विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा मुळी हा डेटाच असणार आहे असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. हा डेटा युजर विविध कारणांनी शेयर करतो, आणि याचा वापर सॉफ्टवेअर विकासक विविध सोयी उपलब्ध करून देण्यासाठी करतात.

          लॉक डाऊन सुरु झालं आणि त्याचप्रमाणे स्मार्ट फोन आणि घरातील संगणकाचा वापर विविध कामांसाठी केला जाऊ लागला, वर्क फ्रॉम होम या संकल्पनेनुसार लोक काम करू लागले आणि सोबतच इंटरनेटचा वापर देखील वाढू लागला. दूरसंचार मंत्रालयाने एप्रिल महिन्यात दिलेल्या आकडेवारी नुसार लॉकडाऊन काळात इंटरनेटचा वापर हा मागील वर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत १३% ने वाढला आहे.    या लॉक डाऊन काळात इंटरनेट युजर्सनी सर्च इंजिनच्या सहाय्याने सर्च केलेले विविध विषय हा देखील एक प्रकारचा डेटा आहे ज्याचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. आजकाल ट्रेन्डीग आणि ट्रोलिंग हे शब्द कानावर पडत असतीलच, यात आज, आता काय  ट्रेन्डीग आहे आणि काही दिवसांपूर्वी काय होतं याचा उपयोग कंपन्या डिजिटल मार्केटिंग करताना उत्तम प्रकारे करू शकतात. कोणते कि-वर्ड्स (सर्च करण्यासाठी प्रविष्ट केलेली कोणतीही शोध संज्ञा) एखादा विषय सर्च करताना वापरले गेले हा सुद्धा डेटा या कामात मदतगार ठरू शकतो. खरी गम्मत काय आहे माहिती का? आपण जेंव्हा मागील दहा दिवसात अथवा मागील महिन्यात इंटरनेट युजर्सनी काय काय सर्च केलं आहे हे पाहतो, याचा उपयोग अभ्यासपूर्ण विश्लेषणा साठी केला जातो, खूप महत्वपूर्ण बाब आहे हि,  तंत्रज्ञान आता असं विकसित करण्यात आलं आहे कि याचा पूर्ण लेखा-जोखा आपल्याला मिळतो, लोकेशन सह बरं का !! एक महत्वाची बाब लक्षात घ्या कि तुमची वैयक्तिक स्वरुपाची माहिती कुठेही शेअर होत नाही, जो पर्यंत ती माहिती तुम्ही स्वत: शेअर करत नाही.

          लॉकडाऊन काळात ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांना स्मार्ट फोन चे महत्व आता समजावून सांगण्याची गरज राहिली नाही हे मे महिन्यातील ई-कॉमर्स कंपन्यांनी जाहीर केलेल्या आकडेवारी वरून अगदी सहज कळते. स्मार्ट फोन हे या ई-कॉमर्स कंपन्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक शोधली गेलेली  उत्पादन श्रेणी आहेत. इंटरनेट चा आणि स्मार्ट फोनचा वाढता वापर, अनेक प्रकारचा डेटा उपलब्ध करतील आणि सॉफ्टवेअर विकासक, डिजिटल मार्केटिंग तज्ञ याचा वापर उत्तम प्रकारे करतील असा विश्वास वाटतो. तुम्ही इंटरनेट वापरताना जागरूक रहा आणि डेटाचा वापर तुमच्या कामासाठी तुम्ही कसा करू शकाल याकडे जातीने लक्ष द्या.


अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, लेखक, व्याख्याता,सॉफ्ट स्कील ट्रेनर

सोलापूर

यु-ट्यूब: AMIT KAMATKAR

 

#Latest_Technology

#Data_Importance

#LockDown

#AmitKamatkar


सोबतचे चित्र: गुगल स्नेह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?