स्फूर्तीदायक “रायगड”
कर्तव्य, निष्ठा, समर्पण, स्फुरण, चेतना, स्थिरता,
दृढता, अखंडता, अभेद्य (आजही रायगडावर अस्तित्व टिकवून असणारे, इतिहासाची साक्ष
देणारे विविध भाग) अशी अनेक बिरुदं जो सार्थ ठरवितो तो “रायगड” “बा रायगड”,
छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगड (शिवतीर्थ
रायगड), छत्रपती संभाजी महाराजांचा रायगड, छत्रपती राजाराम
महाराज यांचा रायगड, महाराणी ताराराणी यांचा रायगड, असंख्य मावळ्यांचा रायगड, मराठ्यांचा
रायगड, सदैव अखंड प्रेरणा स्त्रोत ठरणारा रायगड, अशा या रायगडास जेंव्हा
छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलं तेंव्हा त्यांनी उद्गार काढले, “हा किल्ला बलाढ्य आहे, जणू काही एखाद्या
खडकाच्या डोंगरावरून छन्नी घेऊन काम केले आहे, अगदी उंच खडकावर गवतही उगवू शकत
नाही, सिंहासनासाठी हा एक दृष्टान्त आहे.” ते खरही आहे. रायगडाच्या मातीत अशी
काही ऊर्जा आहे की जी लाखों मावळे आजही घेण्यासाठी दुरून येतात. आम्हीही (मी आणि
माझी सौ) त्यापैकीच एक, मुलांना (आदित्य, आरोहि) जाज्वल्य इतिहास समजावा, आणि
त्यातून प्रेरणा घेऊन आयुष्यात कार्यरत रहावं, हाच रायगड
भेटीचा उद्देश. ११ व्या शतकात यादवकाल पासून २५ एप्रिल १८१८ ब्रिटिश रायगड ताब्यात
घेई पर्यन्त आणि भारतास स्वातंत्र्य मिळाल्यापासून आज पर्यन्त अनेक गोष्टींचा
साक्षीदार असणारा रायगड !! मागील काही
वर्ष “रायगडावर” जाण्याचा संकल्प करीत होतो पण तो पूर्णत्वास जात नव्हता, यावेळी
माझे स्नेही श्री अरविन्द म्हेत्रे (निसर्ग माझा सखा परिवार) यांनी ही संधी उपलब्ध
करून दिली आणि ती मी वेळ न दवडता लागलीच स्वीकारली आणि “रायगडावर” छत्रपतींचा
आशीर्वाद घेण्यास निघालो. ही मोहीम, मोहिमच म्हणावी लागेल कारण अनेक वर्ष ज्याच्या
प्रतीक्षेत होतो तो दिवस मी अनुभवणार होतो.
सोलापूर सोडलं आणि जस जसा “रायगड” जवळ करत गेलो तस तसे छत्रपतींच्या भेटीची उत्कंठा वाढतच होती, रायगडावर जाण्यास दोन पर्याय आहेत, रोप वे (स्व. व्ही. एम्. जोग यांच्या संकल्पनेतून प्रत्यक्षात उतरलेला “रोप वे” जो “श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ”- याची स्थापना लोकमान्य टिळकांनी 1895 मध्ये केली होती यांच्या मदतीने प्रत्यक्षात ०३ एप्रिल १९९६ रोजी सुरू झाला) आणि पायरी मार्ग, आम्ही पायरी मार्ग निवडला (खरतरं शारीरिक क्षमता सिद्ध करण्याची संधीच म्हणू आपण यांस). पण मनात ठाम निश्चय असल्याने हे साध्य करता आलं. रायगड चढण्यास सुरूवात करण्यापूर्वी पुरातत्व विभागाचा आणि सोबतच रायगड विकास प्राधिकरण (२०१७ साली युवराज छत्रपती संभाजीराजे , खासदार (राज्यसभा) यांच्या अध्यक्षतेखाली हे प्राधिकरण अस्तित्वात आले) यांचा फलक वाचण्यात आला, त्यानुसार गडावर जाणे हेतु मार्गिकेचे (चित दरवाजा पायरी मार्गाच्या प्रदर्शिनी भागाचे) काम प्रगतिपथावर आहे हे समजले. हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल, गड-किल्ले जतन करणे हेतु घेतलेली काळजी , असाच पुढाकार इतर ठिकाणीही घेण्यात यावा असं मनात वाटून गेलं. छत्रपतींच्या दर्शन ओढीने पायऱ्या चढण्यास सुरूवात केली, तशी माझा मुलगा आदित्यने एकूण पायऱ्या मोजण्यास सुरूवात केली.
रायगड पाहणे
आणि अनुभवणे हे करताना, आम्हाला सेनापती तान्हाजी मालुसरे यांचे तेरावे वंशज श्रीमती
शितलताई मालुसरे यांचे सानिध्य आणि मार्गदर्शन देखील मिळणार होते. ही एक विशेष आणि
अभिमानास्पद बाब आमच्यासाठी. एक-एक टप्प्यावर मिळणारी निसर्गाची अनुभूती आणि सोबतच
गड चढण्याची जिद्द या जोरावर आम्ही पुढे जात होतो. “अजून किती लांब आहे?”, हा
माझ्या छोट्या आरोहिचा प्रश्न या वेळेस मला ऐकायला मिळाला नाही. तिलाही ओढ होती
छत्रपतींच्या दर्शनाची आणि आज दर्शन होणार याचा आनंद, चेहऱ्यावर दिसत होता. विविध
मंडळी जी दर्शनाच्या ओढीने पुढे जात होती, ती सर्व मंडळी “शिव गजरात”, पुढे जात
होती त्यामुळे आसमंत दुमदुमून निघत होता आणि वेगळाच उत्साह पाहण्यास मिळत होता.
चित दरवाजाच्या उंबऱ्यावर नतमस्तक होत आम्ही गडात प्रवेश केला. तेथून पुढे हत्ती
तलाव आणि नंतर सिंहासनाधीश्वर महाराजांची मूर्ती नजरेस पडली, होळीचा माळ येथे ही
प्रसन्न मूर्ती पहावयास मिळते, महाराजांना मुजरा केला आणि धन्यवाद दिले, अनेक
गोष्टींसाठी धन्यवाद , जे शब्दांत व्यक्त होऊच शकत नाहीत, हां, पण त्याचं समाजऋण
फेडण्याची ताकद शिवविचार देतील, त्या शिव-विचारांवर चालण्याची ताकद अंगी येऊ दे
असा आशीर्वाद मागून गड भ्रमंती करण्यास आणि नव काही शिकण्यास मिळतं का ? याचा शोध
घेण्यास सुरूवात केली. समोरच बाजारपेठ आहे, ती पाहिली आणि मन सुन्न झालं आणि
ब्रिटिशां विषयी राग आणखी वाढला, कारण २५ एप्रिल ते ४ मे १८१८ दरम्यान ब्रिटिश
तोफखान्याने गडावरील बरीच ठिकाणांचं नुकसान केल होत. पण तरीही अद्यापही उभं असलेलं
जगदीश्वराचं मंदिर, महाराजांची समाधी , टक-मक
टोक, तोफखाना, राज सदर, राणी वसा , आदि अद्यापही शाबूत आहेत आणि साक्ष देत आहेत.
या नंतर
आम्ही “राज सदर” कडे गेलो तिथे स्वागतास उभा असलेला भारदस्त दरवाजा आणि सदरेवर
मधोमध सिंहासनाधीश्वर महाराजांची मूर्ती, हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती, थोरले
धनी, त्यांच्या नावाचा सुरू असलेला गजर, कुणी जय-जयकार करतं होतं कुणी छत्रपती,
राजे येतं आहेत सावध व्हा अशी हाक देत होतं, शिव-शंभूंचा गजर सगळच अद्भुत,
स्फूर्तीदायक आणि तितकच जोशपूर्ण. मी सदरेत महाराजांसमोर नतमस्तक होऊन कल्पना करीत
होतो, त्याकाळी सगळं कसे असेल? जेंव्हा राज्याभिषेक झाला तेंव्हा राजांच्या मनात
काय विचार असतील? पायरी चढताना राजांनं काय वाटलं असेल? अनेक प्रश्न मनात येतं
होते, तेवढ्यात शब्द कानी पडले, गडावरील मार्गदर्शक काही सांगत होते आणि यातील
काही प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून मिळाली. आणि मी आपसूकच म्हणालो, प्रभो
शिवाजी राजा !!
जगदीश्वराचं
मंदिर, प्रसन्न गाभारा, आणि अनेक गोष्टींचा साक्षीदार जगदीश्वर !!! नमन करून
महराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यास पुढे गेलो. राजे जगदीश्वराचं दर्शन घेऊन पुढे
जात असत, रायगड ज्यांनी राजांच्या मार्गदर्शनात बांधला ते हिरोजी इंदूलकर यांना
शतशत् नमन, “सेवेचे ठायी तत्पर- हिरोजी इंदुलकर” हा शिलालेख आजही खूप काही शिकवितो.
महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि गड उतार होण्यास आम्ही निघालो.
असंख्य आठवणी, अखंड
उर्जेचा स्त्रोत, प्रेरणा, घेऊन गड उतार होण्यास सुरूवात केली.
श्री समर्थ रामदास यांच्याच शब्दात – “निश्चयाचा
महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी || यशवंत किर्तीवंत,
सामर्थ्यवंत वरदवंत | पुण्यवंत नीतिवंत , जाणता राजा ||”
|| छत्रपती शिवाजी महाराज की जय ||
रायगडावर
खालील काही विशेष बाबी करता येण्यासारख्या वाटतात त्या याच लेखात सुचवित आहे. (रायगड
विकास प्राधिकरण आणि पुरातत्व विभाग यांचे माहितीकरिता)
v प्रत्येक
महत्वाच्या ठिकाणी QR कोड च्या माध्यमातून विजुयल
टुर (visual tour) देता येऊ शकते, त्या गोष्टीचे महत्व प्रत्येकास
स्मार्ट फोन वर पाहता येऊ शकेल.
v “राज
सदर”, राज्याभिषेक सोहळा अनुभव घेण्यासाठी देखील याचा वापर होऊ शकतो
v शॉर्ट
फिल्म्स च्या निर्मितीने गडावरील विशेष बाबी एकाच ठिकाणी गडावर दाखविता येऊ शकतील.
यासाठी एका छोटे खानी सभागृहाची निर्मिती करता येऊ शकेल.
v शौर्य,
साहस आणि निष्ठा यांचा एकत्रित प्रवास गडावर कसा होता हे देखील संग्रहित छायाचित्राच्या
सहाय्याने करता येऊ शकेल.
v बाजारपेठ
पुनर्जीवित करता येऊ शकते, तेथील स्थानिक मंडळींना प्राधान्य देऊन गडावरील बाजारपेठेत
विक्री करण्यास परवानगी दिल्यास गडावरील बाजारपेठ कशी होती याचा प्रत्यक्ष अनुभव भेटीस
आलेली मंडळी घेऊ शकतील, स्थानिक व्यापार वाढीस चालना मिळेल.
v पर्यटन
हा उद्देश नसून इतिहास नव्या पिढीस माहिती व्हावा , त्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन आयुष्य
घडवावं हा प्रामाणिक हेतु.
v गडावरील
पावित्र्य जपुनच या गोष्टी साध्य करता येऊ शकतात.
अमित
बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा