फॉलोअर

दुसरं महायुद्ध, “चले जाव” आणि स्वातंत्र्य


 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना , अनेक विचार मनात घोळत राहतात, आपल्याला खरे स्वातंत्र्य मिळाले का? आपण त्याचा योग्य वापर करीत आहोत का? खरी लोकशाही रुजविण्यात आपण भारतीय नागरिक म्हणून यशस्वी झालेलो आहोत काय? नैतिक मूल्य जोपासली जातात का? संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येकवेळी सांगितले जातात पण कर्तव्यांची जाणीव झालेली आहे का? नसेल झालेली तर ती कधी होणार? अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत पण याची उत्तरं एक भारतीय म्हणून आपल्यालाच शोधावी लागतील, “मी भला आणि माझं घरं भलं” असे म्हणून चालणार नाही, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो पर्यायाने देशाप्रती आपले कर्तव्य आहे ही भावना रुजवायची जास्त गरज वाटते मला. देशाचे रक्षण करणारे शूरवीर सैनिक कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी खंबीर आहेत, देशावर होणारा कोणत्याही प्रकारचा आघात ते परतवून लावू शकतात. पण देशांतर्गत उद्भविणाऱ्या संकटांना एक भारतीय म्हणून आपल्यालाच सामोरे जावे लागेल. २१ व्या शतकात डिजिटल युद्धास आपण नकळत सामोरे जात आहोत, वेळीच जागे होणे क्रमप्राप्त आहे. या युद्धात देशाची संपत्ती असलेल्या युवक वर्गास लक्ष्य केलं जात आहे. विविध ऑनलाइन गेम्सच्या आहारी मुलं जात आहेत, यातून त्यांचे आर्थिक, शारीरिक नुकसान होतं आहे परिणामी देशाचे नुकसान होतं आहे.

वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना स्वातंत्र्यवीरांनी केलेले बलिदान हे सर्वोच्च मानले पाहिजे यात कुणाचेही दुमत नसावे, त्यांच्या बलिदानाचे स्मरण फक्त स्वातंत्र्य दिनी अथवा प्रजासत्ताक दिनीच व्हावे असे न होता निशीदिन व्हावे, अर्थात हे कुणासही सांगणे न लगे !! एक महत्वाची घडामोड १९३९ ते १९४५ यां दरम्यान जगात घडली , ती होती दुसरं महायुद्ध !! हे युद्ध १९३९ ते १९४५ दरम्यान लढलं गेलं आणि यांमध्ये ब्रिटनचे खूप नुकसान झाले होते. किंबहुना हे युद्ध ब्रिटनला खूप महागात पडलं होतं, १९४५ मध्ये ब्रिटन देश थकून गेला होता, उद्ध्वस्त झाला होता, हवाई बॉम्ब स्फोटांमुळे अनेक ब्रिटिश शहरे उद्ध्वस्त झाली होती आणि देशाच्या पुनर्बांधणीसाठी वस्तु आणि कामगारांची मोठी कमतरता होती. ब्रिटनला यापुढे जागतिक साम्राज्य टिकविणे परवडेल का? याचा विचार तेथील सरकारला करणे गरजेचे होते. हे सारं भारतीयां पासून लपून राहिलेलं नव्हतं त्यामुळे भारतात ब्रिटीशांना अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात दमछाक होत होती.  स्वातंत्र्याची मागणी करणारे अनेक गट देशात कार्यरत होते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांच्या भाषणात याचा उल्लेख केला आहे, त्यांच्या एका विधानाचा ब्रिटन पार्लमेंट मध्ये उल्लेख करण्यात आला होता ज्यास नंतर मौलाना आझाद, जे तेंव्हाचे कॉँग्रेस अध्यक्ष होते त्यांनी सरदार पटेलांच्या विधानाची पुनरुक्ती केली “ब्रिटनने सत्ता त्याग करावा आणि सत्ता हिन्दी लोकांपैकी कोणाच्याही स्वाधीन करावी, अगदी मुस्लिम लीगच्या हवाली केली तरी चालेल, त्यानंतर काय करायचे ते आम्ही आपापसात ठरवू”, हे सारं भाषण आजही आपल्याला वाचण्यास उपलब्ध आहे, भाषणात सरदार म्हणतात- ब्रिटन आम्हाला युद्ध संपल्यावर स्वातंत्र्य देणार आहे म्हणे !! पण युद्धाच्या अंतसमयी आम्हाला स्वातंत्र्याची देणगी देण्यास आपण जागेवर असू, अशी ब्रिटनला खात्री आहे का? याच भाषणात शेवटी सरदार म्हणतात, “स्वातंत्र्याची सर दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला येणे शक्य नाही”             

 ब्रिटीशांना “चले जाव” हा निर्वाणीचा इशारा देण्याचा निर्णय १४ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यावर अखेरचे शिक्कामोर्तब ८ ऑगस्ट च्या संध्याकाळी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावरील जाहीर भेत झाले. ब्रिटीशांना अखेरचा इशारा देणारे आंदोलन व त्यासाठी नेमके शब्द काय असावेत याबाबत गांधीजीनी अनेकांशी चर्चा केली होती. त्यापैकी काहींनी “गेट आउट” हा शब्द प्रयोग सुचविला पण भारतीय संस्कृती प्रमाणे म्हणा अथवा त्यात नम्रता नाही (उद्धट वाटतो) म्हणून तो नाकारण्यात आला, सरदार वल्लभभाई पटेल यांनी “रिट्रीट इंडिया” किंवा “विथड्रॉ इंडिया” असे दोन पर्याय दिले होते परंतु सर्वसामान्य भारतीयांचा विचार करून हे शब्द नाकारण्यात आले. त्याच दरम्यान युसुफ मेहेरअली यांनी “क्विट इंडिया” हा शब्द प्रयोग सुचवला आणि गांधीजीनी तो तत्काळ मान्य केला, इतिहासकार याचं कारण असं सांगतात कि त्या शब्दप्रयोगात कणखरपणा आहे, उद्धट पणा नाही , शिवाय “भारत छोडो”, “चले जाव” ही त्याची रुपांतरे जनमानसात पकड घेणारे आहेत. हे युसुफ मेहेरअली कोण तर कॉंग्रेसमधील समाजवादी विचारांच्या प्रमुख नेत्यामध्ये त्यांचा समावेश होतो, आणि “चले जाव” चे आंदोलन पुकारले गेले तेंव्हा मुंबई शहराचे महापौर होते. “चले जाव” चळवळीचे स्मरण आपण सगळेच करतो पण एखादी चळवळ उभारताना त्यामागची पूर्व तयारी आणि कार्यकारणभाव देखील कसा महत्वाचा असतो हे आपल्याला यातून समजते.

चले जाव” ची गरज आजही आहे असे आपल्याला वाटते का? तुम्ही कोणत्या गोष्टीस “भारत छोडो” म्हणालं, कमेंट करा......

जय हिंद !!

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, सल्लागार, लेखक, सॉफ्ट स्किल ट्रेनर, व्याख्याता

YouTube: Amit Kamatkar

 

संदर्भ: “चले जाव” चळवळीच्या सभेत दि.०८ ऑगस्ट १९४२ च्या ऐतिहासिक सभेत मौलाना अबुल कलाम आझाद, सरदार वल्लभभाई पटेल यांची भाषणे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?