फॉलोअर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स

 



आपणा सर्वांचे अखंड प्रेरणास्त्रोत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा साजरा करीत असताना आपण महाराजांकडून विविध कौशल्य शिकून त्यानुसार राष्ट्र उभारणीत योगदान देण्यास पुढे यावे. जयंती साजरी करताना आपण त्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असे मला वाटते. महाराजांकडे पहावं आणि शिकावं, स्वराज्य निर्माण करण्याचा संकल्प महाराजांनी असंख्य मावळ्यांच्या साथीने सिद्धीस नेला पण हे करीत असताना जी जीवनावश्यक कौशल्य महाराजांनी आपणास दिली त्याच अनुसरणं करावं. श्री समर्थ रामदासस्वामींनी महाराजां विषयी भावना व्यक्त करताना अगदी मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या आहेत- निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू | अखंड स्थितीचा निर्धारु | श्रीमंतयोगी.

संस्कृतीचा आदर करा:

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली संस्कृती जतन करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मराठी आणि संस्कृत या भाषांना राजभाषेचा दर्जा दिला. आपली संस्कृती टिकविण्यासाठी स्थानिक भाषेचे महत्व महाराजांनी अधोरेखित केले आहे. सोबतच समाजातील प्रत्येक घटकांशी संवाद सुलभ होण्यास यामुळे मदत मिळाली.      

नाविण्यपूर्ण, सर्जनशील बना आणि आव्हानांवर मात करण्यासाठी मोकळ्या मनाने विचार करा –

          राजेंना भारतीय नौदलाचे जनक म्हणून ओळखले जाते, त्यांनीच प्रथम नौदलाचे महत्व जाणले. विशेषत: कोकणातील प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे शत्रूच्या बलाढ्य सैन्याशी लढणे फार कठीण होते, राजेंनी धोक्याचे संधीत रूपांतर केले – नौदल स्थापन केले आणि किनारपट्टीवर किल्ले बांधले ज्यामुळे मुघलांच्या सैन्यावर विजय मिळविण्यास मदत झाली. व्यापक दृष्टी, संतुलित मानसिकता असलेली बुद्धी, नेहमीच नाविण्यपूर्ण, सर्जनशील रहाणं अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक आहे हे आपण ध्यानात घ्यावं.

आत्मविश्वास, धैर्य महत्वाचं – स्वत:वर विश्वास ठेवा

             राजे आणि युवराज ज्यावेळी आग्र्यास नजरकैदेत होते तेंव्हा राजेंना मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या कमकुवत करून ठार करण्याचा औरंगजेबाचा मनसुबा होता. संभाव्य धोका राजे जाणून होते पण त्यांनी त्या कठीण परिस्थितीत स्वत:वर विश्वास ठेवला. या कृती मधून राजेंनी आपल्याला समतोल दृष्टिकोन ठेवण्याचा मार्ग दाखविला. संकटांना तोंड देताना शांतता राखली पाहिजे. अडचणीत येण्यापेक्षा, परिस्थितीची काळजी करण्यापेक्षा योग्य वेळेची वाट पाहणे राजेंनी स्विकारले आणि तेथून योग्य नियोजन करून राजे सुखरूप रायगडावर पोहोचले. संयम, धाडस, आत्मविश्वास, संकटाविरुद्ध रणनीती, ध्येयाभिमुख दृष्टिकोन, समाज आणि राष्ट्राप्रती प्रेम आणि वचनबद्धता असेल तर जीवनात बदल घडू शकतो आणि अशा व्यक्तींची काळजी घेण्यास  परमेश्वर देखील धावतो.

सावध आणि जागरूक रहा- ज्ञान आणि कौशल्यां सह टीम विकसित करा-

          प्रतापगड किल्ल्याची लढाई हा एक महत्वपूर्ण विजय होता, अफजलखानाच्या कटाला राजे आणि सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. महाराजांनी आपल्या सतर्कतेने, बुद्धिमत्तेने, प्रभावी नेतृत्वाने आणि गनिमी कावाने कार्यक्रमाची आणखी केली. नेतृत्वाचा प्रमुख गुण म्हणजे योग्य व्यक्तीला योग्य वेळी योग्य कामासाठी नियुक्त करणे. सैन्यात भरती होणेआधी राजे स्वत: कौशल्यं पारखत आणि यातूनच जिवा महालाला राजेंनी सोबत घेतलं, महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला त्यावेळी सय्यद बंडाने राजेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तेंव्हा जिवा महालाने दान पट्ट्याने चोख प्रतिकार केला यात बंडा मारला गेला.

          छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करीत असताना ही मूल्ये तरुणांनी आणि भावी पिढीने आत्मसात करण्याची हीच योग्य वेळ आहे.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

 सोलापूर  

            

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?