फॉलोअर

माऊली

 


पंढरीचा पांडुरंग, विठ्ठल भाविकांचे श्रद्धास्थान, संतांचे प्रेरणास्थान, भक्ती भावनेचा अतूट धागा विठ्ठला भोवती गुंफला गेला आहे, “श्री विठ्ठल महाराष्ट्राचे परमदैवत आहे.” वर्षातून चार वेळा अवघ्या महाराष्ट्रातूनच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून वारकरी वारी करतात आणि पंढरपुरी पांडुरंगाचे दर्शन घेतात, डोळाभेटच म्हणायची ती ! दर्शन होताच जन्म धन्य झाल्याचे समाधान मिळते. हे समाधान खूप मोठं असतं ते फक्त अनुभवता येतं आणि शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. वारकरी विठ्ठल दर्शनाच्या ओढीने पंढरपूर कडे निघतात प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या परीने विठ्ठलाचे स्मरण करीत असतो, भक्तीत तल्लीन असतो, वारी अनुभवता आली पाहिजे, वारीची शिस्त, वारीत केली जाणारी सेवा आणि दिंडीत दिसणारी, अनुभवास येणारी माणुसकी ! या दिंडीत सहभागी सगळे वारकरी सारखेच भासतात कारण प्रत्येकाचा भाव एकच असतो “विठ्ठल”, त्याच्याशी ते सगळे एकरूप झालेले असतात. शेकडो वर्षापासून संतांच्या आणि सत्पुरुषांच्या पालख्या पंढरीस येतात. या पालख्यामध्ये दिंड्या सहभागी असतात, वारी एक साधना असून दिंडी हे साधन आहे असं मानणारा हा संप्रदाय, भागवत संप्रदाय !! संतांच्या दृष्टीने पंढरपूर वैकुंठाहूनी श्रेष्ठ, “तुका म्हणे पेठ | भूमिवरी वैकुंठ ||” पंढरपुरच्या ओढीने संतांच्या पालख्या, दिंड्या मार्गक्रमण करीत असतात त्यामागे हेच कारण असावे, पंढरीच्या रूपाने वैकुंठच भेटत असल्याने संतांना इतर कुठे जायची आवश्यकताच भासत नाही. वारकरी संप्रदायाने विठ्ठल भक्तीस सर्वस्व मानले आहे, म्हणूनच पंढरपूर संतांचे माहेरघर आणि विठ्ठल हि संतांची माऊली आहे. 

वारकरी भेटल्यावर एकमेकांचा चरणस्पर्श करताना आपण पाहतो, यामागे त्यांची एक धारणा दिसून येते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायामध्ये “भक्तियोग” सांगितलेला आहे, त्याचप्रमाणे दहाव्या अध्यायात देखील त्यांनी भक्तियोगाचे लक्षण सांगितले आहे ते म्हणतात,

जें जें भेटे भूत | तें तें मानिजे भगवंत |

हा भक्तियोगु निश्चित | जाण माझा ||”

(ज्ञानेश्वरी अध्याय १० ओवी-११८)

जो जो प्राणी भेटेल तो परमात्मा आहे असे समजावे हा माझा भक्तियोग आहे, असे निश्चित समज असे संत ज्ञानेश्वरांनी म्हंटले आहे. त्याचे पालनच वारकरी करताना आपल्याला दिसतात. वारी मध्ये रिंगण ला अनन्यसाधारण असे महत्व आहे. रिंगण हि पवित्र आणि श्रध्येय संकल्पना आहे. वारकरी एकमेकांचे हात धरून गोल करतात, हे देखील एकदम शिस्तबद्ध असतं, अगदी पाहण्यासारखं, या गोलाकार रिंगणातील रिकाम्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा अश्व (घोडा) धावतो, यास आदराने “माउलींचा अश्व” म्हणतात. या अश्वावर स्वत: ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारकरी संप्रदायात धारणा आहे. माउलींची पालखी जेंव्हा मार्गस्थ असते त्यावेळी पावसाचे आगमन होते, बऱ्याच वेळा जिथे रिंगण असते तिथे पावसाने चिखल होतो, या चिखलात रिंगण होणे अवघड असते पण यात कधीही खंड पडत नाही. या चिखलात देखील वारकऱ्यांच्या भक्तीने रिंगणास जागा मिळते आणि रिंगण पूर्ण होते. आश्चर्यकारक वाटतं पण या गोष्टी अनुभवणेच योग्य !! या चिखलात वारकरी विठ्ठल नामात मग्न होवून नाचू लागतात आणि पाहता पाहता रिंगण करणे हेतू जागा तयार होते. हे सगळ म्हणजे भक्ती आणि इच्छाशक्तीचा संगमच पहायला मिळणे असेच म्हणावे लागेल.

माऊलींनी हरिपाठात सांगितले आहे…...

"ज्ञानदॆवा गॊडी संगती सज्जनीं ।

हरि दिसॆ जनीं वनी आत्मतत्त्वीं || "

श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधुसंतांच्या संगतीत असण्यांत गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्त्वरूप हरि दिसत आहे.

 

जय हरी विठ्ठल !

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

यु-ट्यूब: AMIT KAMATKAR

#AmitKamatkar

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?