राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण

 

“राजा शिवाजी” चित्रपटातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य आणि प्रेरणादायी चित्रण

राजा शिवाजी – चित्रपट समीक्षण

भारतभूमीचे आराध्य दैवत, वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट पाहणे म्हणजे त्यांच्या अद्वितीय पराक्रम, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेला अर्पण केलेली एक भावपूर्ण आदरांजली होय. आज पर्यन्त अनेक चित्रपट निर्मात्यानी असा प्रयत्न केला आहे. यासाठी विविध ऐतिहासिक दस्त ऐवज वापरुन आपल्या राजांचा इतिहास मोठ्या पडद्यावर चितारला आहे. १ मे रोजी रितेश देशमुख लिखित दिग्दर्शित “राजा शिवाजी” चित्रपट प्रदर्शित झाला. तसा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहायचा होता पण संध्याकाळचे तिकीट मिळालं, पण ठरविल्या प्रमाणे फर्स्ट डे पाहिला. तसा हा चित्रपट तयार होण्यास दहा वर्षाचा काळ लागला, आणि मराठी चित्रपट सृष्टीतील बिग बजेट चित्रपट ! मेगा स्टार कास्ट, भव्य सेट आणि सोबतीला कॉम्प्युटर ग्राफिक्स ! तंत्रज्ञान फार पुढे गेलं आहे, क्रोमा ग्रीनचा वापर केला की संगणकावर सारं कसं सहज साध्य होतं. चित्रपटात महाराजांचे विविध पैलू समोर येतात, महाराजांना पडद्यावर साकारण्याचे धनुष्य पेलण्याचा रितेशने प्रामाणिक प्रयत्न केला आहे. रितेश आणि त्याचे वडील यांच्यातील नाते संपूर्ण महाराष्ट्रास परिचयाचे आहे. त्याचे या नात्यावरील रिल्स देखील व्हायरल झालेली आहेत. हा चित्रपट पाहताना वडील आणि मुलगा यांच्यातील हळव्या नात्यावर रितेशने प्रकाश टाकला आहे. राजांच्या मोहिमेत शहाजी राजे कसे सामील होत असतं, त्यांचे कसे लक्ष राजांच्या मोहिमा, आदिलशाही, निजामशाही यांचे सोबतचे पत्र व्यवहार, याचे उत्तम सादरीकरण त्याने केले आहे.

सोबतच मोठ्या भावा सोबत असलेला स्नेह बंध छान सादर केला आहे. महाराजांच्या अनेक चित्रपटातून हा धागा मीसिंग राहिलेला आहे, पण रितेश आणि टीम ने हा भावनात्मक बंध प्रथमच पडद्यावर सादर केला त्या बद्दल त्यांचे विशेष धन्यवाद. मदमस्त पाटलाचा चौरंग केलेला कथे मध्ये आपण वाचला आहे पण प्रथमच मोठ्या पडद्यावर हे पाहण्यास मिळतं. “जावळीचे मोरे”, असे अनेक वेळा म्हंटले जाते, ते असे का? याचे उत्तर देखील चित्रपटात दाखविण्यात आलेले आहे. चित्रपटात दोन सीन असे आहेत की ज्या साठी मला वाटतं तेलुगू सिनेमा दिग्दर्शक राजामौलीचे धन्यवाद द्यावेत. असो तसे हे दोन्ही सीन कमाल झाले आहेत , स्पेशल थॅंक्स टु AI & कॉम्प्युटर ग्राफिक्स. मॅा साहेब जिजाऊ यांच्या भूमिकेत भाग्यश्री च्या वाट्याला फारसे प्रसंग नाहीत पण जे आहेत त्याचे कलाकार म्हणून सोने केले असे मी म्हणेन. आज पर्यन्त प्रदर्शित चित्रपटात आई साहेबांची भूमिका दमदार दाखविण्यात आली, पण तेवढी सशक्त भूमिका या चित्रपटात दिसली नाही.                 

थोडक्यात महत्वाचे:

🔸शिवाजी महाराजांचे काही माहिती नसलेले पैलू- जसे की आजवर महाराजांना युद्ध लढताना फारसं दाखवलं गेलं नव्हतं, यामध्ये तुम्ही महाराज युद्ध लढताना पहाल, या मध्ये आपल्या राजाला झालेल्या जखमा आणि त्यावर प्रेमाची फुंकर घालणाऱ्या सई बाई राणी सरकार.  

🔸संभाजी शहाजीराजे भोसले (महाराजांचे मोठे भाऊ) विषयी फारसे साहित्य वाचनात नाही त्यांच्या विषयी माहिती समजते

🔸 अभ्यास करून चित्रपट बनवला आहे असे दिसते.

🔸 रितेशचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो

🔸 जेनेलियाने विशेष करून दोन ठिकाणी डोळ्यातून पती विषयी कौतुक दाखवले आहे ते उत्तम

🔸 बॉलिवूड सिनेमॅटिक लिबर्टी नेहमीप्रमाणे दिसून येते. टिपिकल बॉलीवूड स्टाईल जाणवते.

🔸 जिवा महाल आणि महाराज एकाच फ्रेम मध्ये घेण्याची फारशी गरज नव्हती पण सलमान खान त्या भूमिकेत असल्याने तशी सूट दिली असावी.

🔸 नथ, कर्णफुले घालण्यासाठी नाक / कान टोचायची गरज वाटली नाही. (आधुनिकता)

🔸 सई बाई राणीसाहेब साकारताना थोडे साधे पणा (मान्य त्या राणी सरकार आहेत), त्या काळातील पद्धती प्रमाणे जसे की बोटाची नखे..  आताच्या फॅशन प्रमाणे दाखवायची गरज नव्हती. नखं कापण्यास हरकत नव्हती.

🔸 वाघ नखांचा वापर अफजल खान वधात आवर्जून केला आहे असे असताना तो वापर उशिरा केला असे दिसते.

🔸 शिव जन्म होतानाचा सीन अप्रतिम झाला आहे.

🔸 सामूहिक सुंता कशी रोखली हे धाडसाने दाखवले आहे. हा अनपेक्षित सीन म्हणावा लागेल.

🔸 जे सरदार महाराजांना सोडून गेले त्यांची नावे पहिल्यांदाच चित्रपटात वापरली गेली. फार मोठे धाडस म्हणावे लागेल. 

🔸 चित्रपटाच्या क्रेडिट्स मध्ये कलाकारांची नावे अधिक ठळक पणे  दाखविली आहेत. सगळ्यांना योग्य मान देण्यात आला आहे.

🔸 अजय - अतुल यांचं संगीत नेहमीप्रमाणे वाटलं, फारसं काही नाविण्य नाही त्यात पण राजा शिवाजी अँथम छान झालं आहे. अगदी “गुजबंप” वालं

🔸 संजय दत्त, विद्या बालन उत्तम. फक्त अफजल खान साकारताना संजू बाबाने स्वत:ची चालण्याची स्टाइल बदलणे गरजेचे होते. फरदीन खान का आहे ? असा प्रश्न पडेल. पण ठिक.  

🔸 छोट्या छोट्या गोष्टी कडे थोडं अजून लक्ष दिलं असतं तर आणखी अप्रतिम कलाकृती झाली असती.

 

एकंदरीत महाराजांवर नितांत श्रद्धा असणाऱ्या प्रत्येकाने रितेशचा प्रामाणिक प्रयत्न पाहिलाच पाहिजे.

 

छत्रपती शिवाजी महाराज की जय !

 

अमित बाळकृष्ण कामतकर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स