टी.आर.पी. साठी काही पण – आमचा मात्र निषेध !!
आजकाल विविध न्यूज वाहिन्यांचा
टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टी.आर.पी.) वर सगळा खेळ सुरु आहे. यात जो जास्त पॉईंट
घेतो तो टेलिव्हिजनचा बादशाह ! अर्थात न्यूज टेलिव्हिजनच्या जगात, पण हे साध्य
करण्यासाठी नैतिकता नावाचा प्रकार (त्यांच्या
लेखी) कुठे आहे हा अभ्यासाचा विषय होवून बसला आहे. मला तरी
वाटतं याविषयावर कुणी शोध निबंध देखील लिहू शकेल, पण हल्ली विविध प्रकारचे विशेष
शो चालविले जातात ज्यामध्ये चालू घडामोडी वर मान्यवर व्यक्तींचे मत त्यावर चर्चा
(नावालाच- खरं तर ती भांडणं वाटतात) पण अशा शोज ना भरपूर मागणी असल्याने विविध
न्यूज चॅनल्स ची यामध्ये स्पर्धा सुरु आहे अस दिसतं. हि स्पर्धा एवढी भयंकर आहे कि
त्यासाठी हि मंडळी काहीही करू शकतात याचा प्रत्यय वारंवार येतो. चॅनल्स च्या मालक
मंडळीना यात पैसा दिसत असतो आणि शो च्या सूत्रधारास स्वत:ची प्रसिद्धी दिसत असते,
या प्रसिद्धी पायी कोणत्याही विषयावर अकलेचे तारे तोडण्यास हि मंडळी तयार असतात
असचं चित्र बऱ्याचदा दिसतं. देशभक्ती आणि देशाची काळजी असेल तर ती फक्त या
मंडळींनाच !! दुसऱ्यांना उघडा डोळे म्हणत बऱ्याच विषयांवर सूत्रधार त्याचे ज्ञान
पाझळताना दिसतो. यात त्याचा आक्रस्ताळपणाच जास्त दिसून येतो. पण असे केल्याने टी.आर.पी.
वाढतो ना !!
एखाद्या विषयावर चर्चा करायची
म्हणजे त्याचे विविध पैलू समोर आणणे हा मुख्य मुद्दा असायला हवा पण तसे होताना
दिसत नाही, हि चर्चा पूर्वग्रह दुषित आणि निष्कर्षा पर्यंत पोहोचलेली असल्याचे
दिसते, फक्त नावाला दर्शकांना म्हणायचे कि आता तुम्ही ठरवा ? पण गळी काय उतरवायचे
आहे ते अगदी सगळं ठरवून गळी उतरवलं जातं (तसा प्रयत्न तर १०० टक्के केला जातो).
कधी कधी तर या चर्चा आपण का पाहत आहोत हेच कळत नाही, फक्त यांचा TRP वाढावा म्हणून
कि यातून काही बोध, नवीन माहिती मिळणार आहे म्हणून....सगळं अगदी निराशाजनक !! निर्भीड
पत्रकारिता म्हणजे काय तर अशा शोज मध्ये टीआरपी कसा वाढेल या हेतूने आमंत्रित सदस्यास
(जो योग्य दिशेने व्यक्त होत आहे, मुद्देसूद, पुराव्यानिशी बोलत आहे असा) बोलू न
देणे असा अर्थ घ्यावा काय ? असा सवाल पडतो, अद्याप त्याचं उत्तर नाही मिळालं पण
प्रश्न पडतो !!
कधी कधी यातच टीआरपी वाढतो आणि
चॅनलचा मालक खुश होतो !! पण हे करीत असताना सद्सद्-विवेकबुद्धी गहाण ठेवावी लागते
हे किती लज्जास्पद आहे. विषय कोणता निवडावा काय बोलावे यास अभिव्यक्ती स्वातंत्र्य
आहे, ते संविधानाने आपल्याला दिलेले आहे पण याचा अर्थ असा नाही कि यांनी काहीही बोलावे
आणि ते दर्शकांनी पहावे, कौतुक करावे, जे योग्य त्यास प्रेक्षक वर्ग नक्कीच योग्य
म्हणेल पण जे अयोग्य ते अयोग्यच, ज्याची निंदा करायची त्याची निंदा निषेध हा
होणारचं. चॅनलचा टीआरपी वाढविणे हेतू प्रखर राष्ट्रभक्त वंदनीय स्वातंत्र्यवीर
सावरकर यांच्या विषयी केलेली चर्चा आणि त्यास दिलेले शीर्षक नक्कीच निषेधार्य आहेत,
अ’प्रसन्न’ करणारे आहेत, सावरकरांच्या विचाराप्रती ‘नम्रता’ नसणारे कृत्य करताना
यांना “लाज कशी वाटतं नाही?” आपण सूर्यावर चिखलफेक करीत आहोत एवढं साध यांना कळत
नाही. राष्ट्राभिमान, देशभक्ती काय असते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हि मंडळी त्यांचा निवडा करण्यास निघाली ! वा रे पठ्ठे !
तीव्र निषेध !!!
वस्तुत: इतर अनेक मुद्दे, विषय
आहेत ज्यावर चर्चा होवू शकते, मत व्यक्त केली जाऊ शकतात, जी अनेक वर्ष अनुत्तरीत
आहेत जसे कि लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कि खून ?, आणी-बाणी आवश्यक होती का?,
केजीबी या रशियन गुप्तचर संस्थेचे अधिकृत असणारे त्याकाळचे मंत्री/ खासदार, (या
विषयांमुळे टीआरपी देखील सांभाळला जाऊ शकला असता असे वाटते), राफेल नक्की काय आहे?-
त्याचे फायदे तोटे, भारताचे आजचे जगातील स्थान (चर्चे साठी मागील पाच वर्षात),
आजची परिस्थती, डिजिटल योजना त्याची अंमलबजावणी कि बोजवारा असे एक ना अनेक विषय या
सोबत युवकांसाठी कौशल्य विकासास चालना कशी देता येवू
शकेल? यात सरकारची भूमिका काय असावी ? खासगी संस्थांची भूमिका यावर व्यापक चर्चा, कमीतकमी
गुंतवणूकीत सुरु करण्यासारखे उद्योग यावर तज्ञांचे मार्गदर्शन अनेक विषय आहेत पण उघडा
डोळे वाल्यांनी जे केले त्याचा निषेध !! पण लोकही चांगलच बघतील हे मात्र नक्की !!
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा