फॉलोअर

सावधान – हि तर धोक्याची घंटा



सुजाण पालकत्व- टेक २
साहिल चे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण सोलापुरात झाल , नुकतीच बारावी झाली आता पुढील शिक्षण कुठे घ्यायचे या विषयी घरात खल सुरु झाला, आणि शेवटी ठरलं "विद्येच्या माहेर घरी" म्हणजे पुण्यात शिक्षण पूर्ण करायचं त्याप्रमाणे साहिल ला पुणे येथे शिक्षणास ठेवले. साहिल ने मन लावून अभ्यास केला परंतु पदवी शिक्षण होई पर्यन्त त्याचे प्रयत्न कमी पडले, आणि YD हा नविन शिक्का त्याच्या बायोडेटा वर पडला. YD (ईयर डाऊन अस काहीतरी मुल म्हणतात) असताना गावी परत आला, स्वगृही दिवस मजेत जात होते, त्यास भविष्याची फारशी चिंता नव्हती, आई आणि वडील दोघेही उच्च पदस्थ अधिकारी, घरात कोणत्याच गोष्टी ची कमतरता नव्हती. सगळं अगदी भरभरुन !! साहिल ने त्याचे पदवी (आजकाल पदवी म्हणालं कि इंजीनिअरिंग च बर का !) शिक्षण पूर्ण केले आणि पुण्यातच एका कंपनीत नोकरीस लागला.
सगळ कसं अगदी मनासारखं ! आई-बापास अजुन काय हवं ? आपलं लेकरु आयुष्यात सेटल होत आहे हे पाहुन साहिल चे आई  वडील आनंदुन जायचे, पण काही दिवसातच साहिल ची कुरकुर सुरु झाली, साहेब असेच आहेत, ते सारखं असंच करतात, तसंच करतात, ऑफिस मधील मित्र सहकार्य करीत नाहीत अशा एक ना अनेक अडचणी साहिल सांगू लागला. यावर ते दोघे अनुत्तरिच असायचे, साहिल ची समजूत काढून त्यास कामावर रुजू होण्यास सांगत आणि साहिल ही रुजू व्हायचा पण परत पहिले पाढे पंचावन्न !! 
आता साहिल कामावर रुजू होताना होणारा उशीर आणि प्रचंड रहदारी विषयी अडचणी सांगू लागला, भयंकर ट्रॅफिक आणि लागणारा वेळ यावर खंत व्यक्त करू लागला, आता मात्र साहिल च्या आई वडिलांना काय उत्तर द्यावे हे सुचेना, त्यातच साहिल सोलापुरी घरी परत येतो म्हणू लागला त्यास परवानगी देण्या वाचून कोणताही पर्याय त्यांच्या कड़े राहिला नव्हता. त्यातच साहिल ची आई म्हणाली, " असू दे, येवू दे त्याला सोलापुरला, आपलं लेकरु आपल्या कड़े परत येते आहे, याहून चांगली गोष्ट ती कोणती?" यावर साहिल च्या वडिलांनी मूक संमती दिली आणि साहिल सोलापुरी परत आला. यामध्ये मुलाचे मानसिक संतुलन बिघडू नये हा देखील विषय महत्वाचा आहेच त्याआधारे देखील काहीजण निर्णय घेतात.
मला हि एक धोक्याची घंटा वाटते, कारण सगळं शिक्षण पुण्यात करून पुण्यातच नोकरी पत्करणारे/ स्विकारणारे  अनेक आहेत पण स्वगृही परतणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे, हि चिंतेची बाब आहे कारण पुणे येथे मिळणारा पगार आणि सोलापुरात मिळणारा पगार हा सारखाच असू शकत नाही, कामाचे स्वरूप देखील वेगळे असू शकते नव्हे असतेच मग तिथे मिळविलेला अनुभव इथे कामी येतो का? तर याचे उत्तर नकारार्थीच मिळू शकतं. हि मुल आय.टी. कंपनीत नोकरीस लागतात आणि त्या प्रकारची नोकरी सोलापुरात लागेल असे नाही, मग मिळेल ती नोकरी (शिक्षण एक-नोकरी वेगळीच) करणं कितपत संयुक्तिक होवू शकतं? आणि हे अभिरुचीशी जोडता येवू शकतं का? तर याचही उत्तर नकारार्थीच मिळतं.
मग विद्यार्थ्याने आयुष्यातील महत्वाची वर्ष ‘वायाच’ घातली असं म्हणावे लागेल. म्हणून वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे असे सुचवावे वाटते. आजकाल विविध विषयांवर समुपदेशन करणारी अनुभवी मंडळी आहेत त्यांच्याशी या विषयी चर्चा करावी त्यांचे मत घ्यावे मुलांना समजून सांगावे, पण याच वेळी पालकांची “माया” आडवी येते आणि हि मंडळी सगळ्याच गोष्टींचा पुनश्च श्रीगणेशा करतात. जर करिअर साठी, शिक्षणासाठी सोलापूर सोडायचं ठरवलं तर (अर्थात इथेच राहून काही करता येवू शकतं का हे पाहणे मला महत्वाचं वाटतं पण....) विद्यार्थ्याने आणि पालकांनी (अर्थात पाल्याच्या) अभिरुची बद्दल जागरूक होणं आवश्यक आहे असं वाटतं. कारण आयुष्यातील महत्वाची वर्ष कारणं सांगत घालवायची हे योग्य वाटतं नाही.
          या विषयात पालकांची भूमिका महत्वाची वाटते म्हणून पालकांनी थोडसं जागरूक व्हावं, अर्थात जागरूक म्हणजे फक्त पैसे मोजावेत असे नाही तर मुलांशी संवाद साधण्यात आपण कुठे कमी पडत नाहीत ना याचा विचार आणि त्या अनुषंगाने कृती व्हायला हवी. मुलं जिथे घाबरतात, काम करण्यास नको म्हणतात तेथील परिस्थिती ची माहिती घ्यावी, त्याचे मानसिक संतुलन बिघडत असेल तर त्या मागची कारणे काय आहेत याचा शोध घेतला पाहिजे, त्यावर उपाय योजिले पाहिजेत आणि महत्वाचं म्हणजे पाल्यास आधार दिला पाहिजे. तसं पाहिलं तर हा खूप गुंतागुंतीचा विषय आहे, बऱ्याच बाबी, एकमेकावर अवलंबून असणारे धागे यामध्ये सापडतील, म्हणून थोडा विचार करा, आणि हि धोक्याची घंटा ओळखा !           

टीप : शहरांची नावे प्रातिनिधिक स्वरुपात वापरली आहेत.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?