प्रवाशांच्या सेवेसाठी ?
बदल हि
काळाची गरज आहे, काळानुरूप स्थित्यंतर घडतं असतात असं म्हणतात, असं ऐकिवात आहे पण
काही गोष्टी त्यास अपवाद आहेत असचं म्हणावं लागेल. मी आता अपवाद गोष्टींची यादी
इथे देणार नाही पण एक अनुभव मात्र नक्की शेअर करणार आहे, ज्यात मला असं दिसून आलं
कि काळानुरूप त्यामध्ये बदल घडलाच नाही, किंबहुना या मंडळीना बदल स्वीकारायचाच
नाही ! स्वत:चे वाहन घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्य परिवहन ची सेवा फार कमी वेळा
घ्यावी लागली पण तरी साधारण २०१० पर्यंत राज्य परिवहन ची सेवा सातत्याने घेत आलो
आहे, म्हणजे साधारण १० वर्ष झाली या सेवेपासून दूर आहे, पण लक्ष आहे (हे महत्वाचे),
नुकतचं नाशिक इथे एका कार्यक्रमा निमित्त जाणे झाले आणि यावेळी खास आवर्जून राज्य
परिवहन ची सेवा घेण्याचे ठरविले आणि प्रवासाचा बेत आखला. रात्री प्रवास करायचा असल्यास
त्या सेवेस “रातराणी” ने प्रवास असे संबोधण्याचा राज्य परिवहनचा प्रघात आहे ! त्यानुसार
आरक्षित आसनावरून प्रवास नियोजित केला आणि प्रवासाचा क्षण आला, वेळे नुसार स्थानकावर
पोहोचलो आणि बस मध्ये प्रवेश करणार इतक्यात लक्ष गेले (खर तर लक्ष जायला नको होते
पण काय करणार स्वभाव ! आणि स्वभावास औषध नसते अस म्हणतात), बस मध्ये असणाऱ्या अस्वच्छतेकडे
!!!! हो हो अस्वच्छतेकडे, तक्रार करावी म्हणून वाहकास पाहिले पण साहेब काही सापडले
नाहीत (बहुधा रिपोर्टिंग ला गेले असावेत), नंतर तिकीट तपासण्यास आल्यावर विचारणा
केली तर नेहमीप्रमाणे थातूर-मातुर उत्तरं मिळाली. २००७ साली मी जेंव्हा नाशिक ला
इंस्टिट्युटच्या कामा निमित्त जायचो तेंव्हा देखील राज्य परिवहन ची बस अशीच असायची
आणि एका तपा नंतर हि तशाच स्वरुपात पहायला मिळाली. १९३२ मध्ये खासगी व्यावसायिकां
मार्फत सुरु झालेली प्रवासी वाहतूक सेवा बाह्य स्वरुपात बऱ्याच प्रमाणात बदललेली
असेल पण अंतर्गत स्वरुपात आणि सेवेशी संबंधीत सोई सुविधा या मध्ये अमुलाग्र बदल (काळानुरूप)
होणे अद्यापहि बाकी आहे.
हि प्रवास
सेवा रात्री ९ वाजता सुरु झाली आणि सकाळी साधारण ६ वा नाशिक येथे संपली, प्रवासा
दरम्यान (एशियाड बस मध्ये) सगळ्या खिडक्या बंद असल्यातरी वाजणाऱ्या बस ने आणि थंडीने
झोपू (प्रवासात, त्यातही रात्रीच्या...झोपायचं असतं?) काही दिले नाही. तुम्ही
देखील असा अनुभव घेतला असेल, पाहिलं तर सगळ्या खिडक्या बंद पण गार वारं मात्र
त्याच्या सोईने बस मध्ये येत होतं आणि स्वारस्य नसतानाही थंडीची मजा देत होतं. अखंड संगीत देणारे रॉडस्/
बार, खिडक्यांच्या काचांचा सुरमयी शंखनाद कानात अजूनही घुमतो आहे. फक्त एका
गोष्टीचे धन्यवाद द्यायला हवे कि वाहक आणि चालक यांनी त्यांची सेवा चोख बजावली. पण
परतीच्या प्रवासात अवघे १६३ किमी (नाशिक ते अहमदनगर) अंतर कापण्यास चार तास चाळीस
मिनिटांचा वेळ, हे काही पचनी पडले नाही, सेवेच्या प्रकारात लाल गाडी, एशियाड असे
प्रकार आहेत त्यापैकी मी एशियाड ने प्रवास करीत होतो तरीही एवढा वेळ का लागला याचं
गुपित मला उलगडता आलं नाही, मी आपलं रहदारी जास्त आहे असे स्वत:ला समजावीत पुढील
प्रवास सुरु ठेवला. खरे कौतुक मला नगर ते नाशिक प्रवासाचे वाटले, कारण यामध्ये
वाहक आणि चालक यांनी फक्त एकाच ठिकाणी विश्रांती घेतली आणि वेळेत प्रवास पूर्ण
केला. नाहीतर सोलापूर-पुणे या मेगा हायवे ने जाताना देखील परिवहन च्या बसेस जेवायच्या
(योग्य वेळ असल्यास नक्की जेवणास थांबावे) नावाखाली विनाकारण उशीर करतात आणि सहज
लवकर पूर्ण होणारा प्रवास लांबतो असा अनुभव आहे. पुण्यास कामा निमित्त वेळेत
पोहोचायचे असणाऱ्या मंडळींचे खूप हाल होताना पहावयास मिळतात.
राज्य
परीवहनच्या बसेस हि एक सेवा देतात, सेवेत विनयता, सेवा भाव, अविभाज्यता, प्रवासी
सहभाग या सर्व गोष्टी अंतर्भूत असणे आवश्यक आहे. हि एक आदर्श विचारधारा आहे हे मलाही
मान्य आहे, पण १९४८ (बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन या नावाने सेवा सुरु झाली
होती) ते २०२० या ७२ वर्षाच्या
कालावधीत देखील हेच मिसिंग आहे अस नाही का वाटतं तुम्हाला? परिवहन ची देखरेख
(स्वच्छता आणि वापर) हि फक्त सेवेतील कर्मचाऱ्यांनीच ठेवावी असं मला अजिबात
सुचवायचं नाही हे वाचकांनी ध्यानात घ्यावे. हि एक सामुहिक जबाबदारी आहे, सेवेतील
कर्मचाऱ्यांची जेवढी जबाबदारी तेवढीच प्रवाशांची देखील आहे. ती सर्वांनी मिळून पार
पाडावी. कर्मचारी मंडळींनी प्रवाशांच्या वेळेची किंमत करायला शिकले पाहिजे, आजच्या
जमान्यात वेळे बाबतीत अति दक्ष राहणे जास्त आवश्यक आहे, किंबहुना तीच खरी गरज आहे.
सुरक्षा सप्ताह साजरे होतात तसाच प्रत्येक दिवस स्वच्छता दिवस म्हणून साजरा झाला
पाहिजे. प्रवाशांनी देखील राज्य परिवहन बस हि आपल्या मालकीची बस आहे तिची जपणूक
केली पाहिजे हि भावना वाढीस लावणे काळाची गरज वाटते. फक्त बसेसची नावं परिवर्तन बस
अशी ठेवून काहीच होणार नाही. प्रवासी सेवेच्या प्रत्येक पाऊलावर हे परिवर्तन
दिसायला हवं, नाही का? आणि अर्थातच हे दोन्ही बाजूने हवं, प्रवासी म्हणून माझ्या
जबाबदारीचं भान मलाही हवं आणि सेवा देणाऱ्या परिवहनला देखील याची जाणीव हवी.
स्वच्छतेच्या, प्रवासाच्या, सुरक्षिततेच्या बाबतीत, अजून काही पावले उचलता येतील का ते पहावे
जसे कि एखाद्या विषयाची ओनरशिप देता येऊ शकते का? याची चाचपणी करता येऊ शकेल.
कामाचे दर्जा व्यवस्थापन करण्यात महामंडळाने रेटिंग पॉईंट्सची योजना सुरु करावी,
तिकीटा सोबत एखादा फॉर्म देता येऊ शकेल, अथवा app द्वारे हि यंत्रणा वापरात आणता
येऊ शकेल. शेवटी सर्विस ऑन डिमांड हि सेवा देखील सुरु करणे आवश्यक आहे, हि सेवा फक्त
व्हेकेशन, यात्रा मध्ये वापरताना पाहिली आहे, पण याची गरज जेंव्हा असेल तेंव्हा हि
सेवा वापरायची मुभा आगार व्यवस्थापकास असावी आणि तशी सूचना बस स्थानक आवारात
लावलेली असावी, अशा वेळी वाहक आणि चालक उपलब्ध होणे आवश्यक असते तेवढी काळजी
घेण्यात यावी म्हणजे योजनेचे तीन-तेरा वाजणार नाहीत.
मी केलेला
परिवहन प्रवास, प्रवासा दरम्यान आलेला अनुभव, अडचणी आणि त्यावर वापरात आणता येऊ शकतील असे उपाय देण्याचा एक
प्रामाणिक प्रयत्न केला आहे. तुमच्याकडेही काही कल्पना, सूचना असतील तर कमेंट
कराव्यात.
बी द
चेंज, यु एक्स्पेक्ट फ्रॉम द वल्ड !!
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा