फॉलोअर

कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन

“ये दौलत भी लेलो, ये शोहरत भी ले लो”, या सुदर्शन फाकीर लिखित हे गीत आपण अनेक वेळा ऐकतो आणि आपल्याला वाटतं कि खरच असं घडावं, इच्छा तर खूप होते पण तस काही घडत नाही. बाल्यावस्था, किशोर, तारुण्य, जरावस्था या जीवनातील मनुष्याच्या अवस्था, या प्रत्येक अवस्थेतून मनुष्यास जावे लागते. विविध अवस्थांमध्ये विविध कामना मनुष्य बाळगून असतो, त्या पूर्णत्वास जाव्यात यासाठी कार्यरत देखील असतो किंबहुना जीवाचं रान करत असतो.
महाविद्यालयीन जीवन , टीन एज आयुष्यातील भन्नाट दिवस, जी काय मजा करायची ती याच दिवसात अस म्हणालो तरी अतिशयोक्ती होणार नाही, पॉकेट मनी हि महाविद्यालयीन जीवनात चालू व्हायची, साधारण ९० च्या दशकात तरी याच वेळी चालू व्हायची पण अलिकडे शाळेतच सुरु होते, असो, पण या पॉकेट मनी मध्ये जी काय धमाल असायची ती आज कमवत असलेल्या पैशात नाही. तसं पाहिलं तर लहानपणी खाऊ साठी पैसे मिळायचे, घरी आलेल्या नातेवाईकां कडून, मग ते पिगी बँकेत साठवायचे आणि खर्च करायचे असल्यास त्यातून खर्च करायचा असा रिवाज होता. या खाऊ साठी मिळणाऱ्या पैशास पॉकेटमनीच म्हणावी, नाही का? हि पॉकेट मनी त्या आयुष्यात मनमुराद आनंद द्यायची, खिशात चार पैसे का असेना अगदी श्रीमंतीचा फील यायचा ! मला आठवतं साधारण इयत्ता तिसरी मध्ये असेन त्यावेळी आमच्या घराच्या जवळ गल्लीतील मुल क्रिकेट खेळायची तेंव्हा त्यांच्याकडे खिशात पैसे असायचे मला वाटायचं आपणही खिशात पैसे ठेवावेत आणि यासाठी मी एकदिवस बाबांकडे हट्ट केला आणि खिशात पैसे ठेवले (किती हे महत्वाचे नाहीत), आणि काही मित्र चिअर करायला एकत्र बसलेली असायची, त्यांच्यात सामील व्हायचो, त्यावेळी काय तो रुबाब !  आता महिना कितीही कमविले तरी तो रुबाब काही करता येत नाही. आम्ही मित्र आईला मदत करायची, या नावाखाली, आता तसचं म्हणावं लागेल, घरापासून भाजी मार्केट तसं जवळच होतं, मी आणि माझे दोन मित्र निखिल आणि अमित आपापल्या घरी भाजी आणायचे काम अगदी हट्ट करून घ्यायचो, सगळी भाजी खरेदी करून झाली कि शिल्लक काही पैसे राहायचे, मग काय ते पैसे लगेच तिथल्या तिथे ते खर्च करायचे, त्यात मस्त भेळपुरीचा आनंद मिळायचा आणि परत गरमा गरम शेंगा खात घरी यायचे, यावर घरी आल्यावर आईची शाबासकी मिळायची ती वेगळीचं !! कधी तिघांपैकी दोघांचे, कधी एकाचे पैसे भाजी घेतल्यावर शिल्लक राहत नसतं मग काय यातही वेगळा आनंद मिळायचा, आनंद मिळवायचा तर पैसाच लागतो असं नाही, भेळ शेअर केली जायची एकाच प्लेट मध्ये गप्पा मारत, भेळ फस्त केली जायची आणि मग  एकमेकाची चेष्टा करतं घर कधी यायचं कळायचंच नाही. कधी शाळेतून घरी येताना बस चे पैसे वाचवायचे (म्हणजे ते भैय्याची भेळ खाण्यात खर्च करायचे) आणि घरी चालत यायचं काय मजा होती या सगळ्यात !!! साधारण दहा किलोमीटर अंतर सहज पूर्ण केलं जायचं आणि आता एक किलोमीटर चालायचं (व्यायामासाठी बर का) म्हंटल तर जमत नाही !!
    
पॉकेट मनी म्हणून बाबांनी दिलेल्या काही पैशात अवघं जग विकत घेता यायचं, ती जादू बाबांच्या कमाईच्या पैशाची होती कि अजून काही, माहिती नाही आणि आता कितीही काम करा, कितीही पैसा कमवा, काही पुरत नाही आणि हौस काही भागत नाही. आज बाबा नाहीत मग आई कडून पैसे मागून काही खरेदी केलं तर एक वेगळाच आनंद मिळतो, तुम्हाला झालयं का असं कधी? हा निसटून गेलेला आनंद परत मिळवायचा कधी प्रयत्न केला आहे का? आपण जे आयुष्य जगतो ते खरं म्हणजे याच टीन एज मध्ये, जिथे सगळ्यांनी फक्त आपलच ऐकावं अस आपलं मत असतं आणि कुणासही जुमानणं हे कधीच स्वीकारता येत नसतं. खिशात असणारे पैसे काही केल्या संपत नव्हते, आणि आयुष्यात मनमुराद मस्ती मित्रांसोबत करण्यात जो आनंद आणि समाधान होतं ते आज कशातच नाही, म्हणूनच गीतकार शैलेन्द्र आठवतात आणी आपसूकच त्यांच्याच भाषेत म्हंटल जात कोई लौटा दे मेरे बीते हुये दिन !!    

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?