फॉलोअर

आ री आ जा - बाबांच अंगाई गीत

मराठी चित्रपट असो कि हिंदी चित्रपट दोन्ही चित्रपटात अंगाई गीतांना आगळेच महत्व आहे. कधी लिंबोणीच्या झाडा मागे झोपणारा चंद्र, तरी कधी डोळ्यात झोपेस येण्याचे आवतण देणारी आई, एक हवाहवासा वाटणारा फील देण्याचे काम या गीतांनी केले आहे. अंगाई गीतांचे वैशिष्ट्य असे कि याचे बोल जितके भावनिक, संगीत तितकच हृदय स्पर्शी, या अंगाई गीतांमध्ये आईची माया, प्रेम ओतप्रोत अनुभवण्यास मिळतं, काही गीतं ऐकताना डोळ्याच्या कडा कधी ओलावतात कळतच नाही, असचं एक गीत आहे, “कुंवारा बाप” या चित्रपटात, निर्माता अमरलाल छाबरिया आणि निर्देशक महमूद !! १९७४ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात “आ री आ जा, निंदिया तू ले चल कही”, हे गीत आहे. हे देखील अंगाई गीतच आहे पण या वेळी स्क्रीनवर आई नाही, तर बाबा, दाखवला आहे. महमूद यांनी चित्रपटात रिक्षाचालकाच्या भूमिकेस पुरेपूर न्याय दिला आहे. किंबहुना ती भूमिका महमूद जगले आहेत असे म्हणाले तरी योग्य होईल. एका रिक्षाचालकास सोडून दिलेलं बाळ सापडतं, तो त्याच्या पालकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो पण त्यात अयशस्वी होतो, त्याला जेंव्हा कळतं मुलास पोलिओ झालेला आहे तेंव्हा त्याचं मनपरिवर्तन होतं आणि तो त्याचा समाजाच्या चालीरीती, परंपरा मोडून मुलाचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतो आणि त्यावर ठाम राहतो.

          एक वडील म्हणून सुरु झालेला प्रवास स्क्रीन वर योग्य पद्धतीने साकारण्यात आलेला आहे. एकल पालक बनून सांभाळ करताना येणाऱ्या अडचणी महमूद यांच्या अभिनयाने साकार झाल्या आहेत, “कुंवारा बाप” भूमिकेस जणू महमूद यांचा परीसस्पर्शच !! किंग ऑफ कॉमेडी हे बिरूद मिरविताना महमूद या चित्रपटात कधी डोळ्यात पाणी आणतात कळतच नाही, आणि हीच या  अभिनेत्याची कमाल वाटते मला. जवळपास सगळ्याच चित्रपटात आईची थोरवी गायलेली आहे, निसंकोच ती गायलाच हवी, पण बाबा नेहमी यापासून दूर राहिला आहे, पण या चित्रपटात बाबाच हृदय देखील कसं मायेने ओतप्रोत भरलेलं असतं आणि बाबा त्याच्या मुलासाठी काय काय करू शकतो यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुलास अंगाई (लोरी) गीत गाताना किशोर दा यांचा आवाज मनाचा ठाव घेतं, गाण्याचे बोल मजरूह यांचे आहेत आणि संगीत राजेश रोशन यांच, तसं पाहिलं तर संगीतकार म्हणून राजेश रोशन यांचा हा पहिला चित्रपट. या पूर्वी राजेश रोशन लक्ष्मीकांत (लक्ष्मीकांत प्यारेलाल ) यांचेकडे संगीताचे धडे गिरवायचे, “कुंवारा बाप” या चित्रपटासाठी संगीतकाराचा शोध सुरु असताना, राजेश रोशन महमूद यांना भेटले, या भेटीत महमूद यांनी “सज रही गली मेरी”, आणि “आ री आ जा, निंदिया तू” या दोन गीतांना संगीत देण्यास सांगितले, आणि ट्यून आवडली तर चित्रपटाचे संगीत राजेश रोशन यांनी द्यायचे असे ठरले. हि दोन्ही गीतं अप्रतिम आहेत, श्रवणीय आहेत अर्थातच ती महमूद यांना आवडली आणि “कुंवारा बाप” या चित्रपटाचे संगीतकार होण्याचा मान राजेश रोशन यांना मिळाला.
          स्वत:च्या आयुष्यात दु:ख पाचवीला जरी असलं तरी मुलांच्या सुखासाठी आयुष्यभर झटणारा बाबा, मुलांच्या आनंदातच आपला आनंद मानतो, मुलाच्या सुखासाठी जगाला त्यागण्याचा विचार बाबाच करू शकतो, या अर्थाचे बोल मजरूह यांनी या गीतात पेरले आहेत, कथेस समर्पक गीत, सशक्त अभिनय, दर्जेदार संगीत, जादुई आवाज या जोरावर हे अंगाई गीत अजरामर झालं आहे एवढं नक्की !!

टीप: गाण्यात लहान मुलासाठी लता दीदी यांनी स्वर दिला आहे.

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

YouTube: Amit Kamatkar

टिप्पण्या

  1. खूपच छान... आपण सर्वश्रेष्ठ व्हावे, सक्षम व्हावे... हाच प्रयत्न असतो... वंदन पिता या प्रथम गुरूला... 🙏🙏🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?