फॉलोअर

इन्कलाब झिंदाबाद

“इन्कलाब झिंदाबाद” हा नारा शहीद भगतसिंग यांनी ८ एप्रिल १९२९ मध्ये दिल्ली विधानसभेत ब्रिटीशांचे लक्ष वेधण्यासाठी जेंव्हा बॉम्बस्फोट (रिकाम्या बाकावर) केला तेंव्हा दिला , हे आपण सगळेच जाणतो. स्वतंत्रता मिळविणे , नव चेतना जागविणे हेतूने, एक संघता राखण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी हा नारा दिला. अनेकांनी प्राणाची आहुती दिली मग या देशास स्वातंत्र्य मिळाले. “इन्कलाब झिंदाबाद” याचा इंग्रजी मध्ये अर्थ होतो, “Long Live Revolution” ज्यास हिंदीत “क्रांती अमर रहे” असे म्हंटले जाते. प्रत्यक्षात “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा उर्दू कवी व स्वातंत्र्यसैनिक हसरत मोहनी यांनी १९२१ मध्ये सर्व प्रथम लिहिला. याचा वापर भगतसिंग यांनी १९२९ मध्ये केला.
१९१७ साली रशियन क्रांतीच्या पार्श्वभूमीवर भारतात क्रांतीचे वारे वाहू लागले होते,आर्यलंडच्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीशांनी त्यांना स्वातंत्र्य देण्याचे कबूल केले होते, आता हाच धागा भारतातील तरुणांनी पकडला आणि बदलाचे वारे वाहू लागले. १९१८ साली प्रथम जागतिक युद्धाच्या समाप्ती नंतर भारतात असंतोष पसरू लागला होता, लोग रस्त्यावर उतरू लागले होते. या जागतिक युद्धात भारतीयांनी ब्रिटीशांना स्वराज्या साठी साथ केली होती पण ब्रिटीशांनी शब्द फिरवला, स्वराज्याचे अभिवचन देण्यात आले परंतु ते पाळण्यात आले नव्हते, बंडखोरी होऊ नये म्हणून कडक कायदे करण्यात आले होते, त्यातच १९१९ साली जालियनवाला बाग हत्याकांड घडले. १९२२ च्या मार्च अखेरीस संपूर्ण भारतात हेच वारे वाहत होते, त्या दरम्यान चौरी चोरा , उत्तरप्रदेश येथील पोलीस चौकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले पाहून व्यथित झालेल्या महात्मा गांधीनी अचानकपणे असहकार आंदोलन मागे घेतले. हे मात्र काही भारतीय तरुणांना मान्य नव्हते.

अशा तरुणां पैकीच एक होते, राम प्रसाद बिस्मिल , उत्तरप्रदेश येथील कवी, त्यांनी अलाहाबाद येथे १९२४ मध्ये हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ची स्थापना केली. ब्रिटीश राजवट उलथून टाकणे हा या संस्थेचा मूळ उद्देश. त्यानुसार त्यांनी काम सुरु केले, यामध्ये शस्त्र खरेदी करणे हेतू लोक वर्गणीचा मार्ग संस्थेने अवलंबिला, बॉम्ब तयार करणारे छोटे छोटे प्रशिक्षण केंद्र कलकत्ता येथे सुरु केली. ०९ ऑगस्ट १९२५ रोजी काकोडी षड्यंत्रात त्यांना आणि अश्फाकउल्लाह खान यांना अटक झाली आणि दोघांनाहि फाशीची शिक्षा झाली व त्याची अंमलबजावणी १९२७ ला झाली. तुरुंगात असताना त्यांनी दोन अजरामर गीते लिहिली, “मेरा रंग दे बसंती चोला” आणि “सरफरोशी कि तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुये कातील में है”. १९२८ मध्ये भगतसिंग यांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन चे नाव बदलून हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या नावाने काम करण्यास सुरुवात केली. या संस्थेने “इन्कलाब झिंदाबाद” हे ब्रीद म्हणून स्विकारले. एच.एस.आर.ए. या संस्थेचे मुख्य टीकाकार गांधी होते, १९३० च्या “यंग इंडिया” या मासिकात गांधीनी विधानसभेतील बॉम्बस्फोटाची तीव्र शब्दात निंदा केली होती. यास भगतसिंग यांनी कोर्टात घेण्यात आलेल्या चाचणीत उत्तर दिले होते, ते असे होते “जी नवीन चळवळ भारतात सुरु झाली आहे त्याने एका नवीन पहाट उगवेल असा विश्वास मला वाटतो. हि चळवळ गुरु गोविंद सिंग, छत्रपती शिवाजी महाराज, कमल पाशा, रेझा खान यांच्या आदर्शाने प्रेरित आहे, हे लक्षात घ्यावे.”
एच.आर.ए. असेल अथवा एच.एस.आर.ए. असेल या दोन्ही संस्था त्यांच्या उद्देशात असफल झालेल्या असतील पण क्रांतिकारी जे जीवन जगले, ज्यांना त्यांनी आदर्श मानले, स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न उराशी बाळगून जे फासावर लटकले अशा सर्वांनी “इन्कलाब झिंदाबाद” हा नारा दिला, जो आजही प्रेरणादायी आहे.

वंदेमातरम् !!
जय हिंद !!
इन्कलाब झिंदाबाद !!

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर

YouTube: Amit Kamatkar.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?