फॉलोअर

गुरुपौर्णिमा

 

अज्ञान तिमिरान्धस्य ज्ञानाञ्जन शलाकया ।

चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः ॥

ज्ञानरूपी किरणाने जे अज्ञानरूपी अंधकाराने आंधळे झालेल्यांचे डोळे उघडतात त्या गुरूंना नमस्कार |

आज गुरुपौर्णिमा, गुरुप्रति आदर व्यक्त करण्याचा आणि आभार मानायचा दिवस, गुरुपौर्णिमेस एक आध्यात्मिक परंपरा आहे, गुरु - ज्यामुळे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी मिळते, आई व वडील हे आपले प्रथम गुरु, ज्यांनी आपल्याला घडवलं, आपल्या पायावर ताठ मानेने उभं कसं रहावे हे शिकवलं. प्रत्येकाच्या आयुष्यात हे दोन्ही गुरु असतात. आई हि सदैव मुलांची लाडकी असते, काही झाल तरी मुलांना आई लागते, त्या माऊलीच हि सर्वस्व असतात तिची मुलं. आई चं मुलां शिवाय विश्वच नाही अस म्हणालो तरी वावगं होणार नाही, अर्थात मुलांसाठी सुद्धा आईच विश्व आहे. या गुरूचे मार्गदर्शन माझ्या नशिबाने मला आजही मिळते आहे आणि मिळत राहो हि ईश्वर चरणी प्रार्थना ! पण माझे बाबा आज या जगात नाहीत. ते फक्त आठवणींच्या रुपात माझ्या सोबत आहेत. बाबांनी कृतीतून बऱ्याच गोष्टी शिकविल्या, त्या जेंव्हा पाहिल्या तेंव्हा त्याचे महत्व समजून घेता आलं नाही पण आज जेंव्हा ते नाहीत तेंव्हा प्रत्येक गोष्टीची आठवण आणि त्याचे महत्व कळते आहे. शाळेत पाऊल ठेवले कि तिथे आपल्याला शैक्षणिक गुरु भेटतात जे आपल्याला विविध पाठ, शैक्षणिक मूल्य शिकवितात आणि साक्षर करतात. या गुरुंचा आयुष्यातील वाटा हि तितकाच महत्वाचा असतो कारण शाळेतील एक तप आपण त्यांच्या सोबत असतो. ग.दि. माडगूळकर यांच्या गीताप्रमाणे, “फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार”, हे शिक्षक आपल्या आयुष्यास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करण्याचा दिवस म्हणून आजच्या दिवसास अनन्यसाधारण असे महत्व आहे. अर्थात हे ऋण असे एकदिवस आठवण करून फेडता येण्यासारखे नाही पण आजच्या दिवशी त्यांना धन्यवाद जरूर द्यावेत आणि कायम त्यांच्या ऋणात रहावे असे माझे मत. 

आज एक छान संदेश वाचायला मिळाला “माणसाला अज्ञाना कडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे हात धरून नेणारा प्रेमळ ज्ञानी म्हणजे गुरु”, “गुरु-शिष्य” हि परंपरा खूप मोठी आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पौर्णिमा ‘गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. महर्षी वेद व्यास यांचा जन्म याच दिवशी झाला होता. ब्रह्माच्या आज्ञेनुसार महर्षी व्यास यांनी महाभारत लिहिण्याचे निश्चित केले आणि त्यांनी श्रीगणेशास लेखनिक होण्याची विनंती केली यावर श्री गणेशाने हा प्रस्ताव एका अटीवर मान्य केला कि लिहिताना लेखणी थांबता कामा नये, यावर महर्षी व्यास गणेशास म्हणाले “तुमची अट मान्य पण तुम्हीही समजून घेतल्याशिवाय लिहायचे नाही”, आज विद्यार्थी वर्गास हि शिकवण खूप मोलाची आहे असे मी मानतो.

भरभरून देणारा निसर्ग देखील आपल्याला शिकवितो आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि समजून त्याप्रमाणे वागले पाहिजे. आयुष्यास आकार देताना भेटणारा प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवितो, आपण जर कायम विद्यार्थीदशेत राहिलो तर शिकण्याची प्रक्रिया अखंड चालू रहाते. लहान, थोर सर्वांकडून काही ना काही शिकायला मिळते फक्त आपण ते नम्र पूर्वक स्विकारले पाहिजे, त्यानुसार आचरण केले पाहिजे सोबतच त्या सर्वांप्रती ऋणी राहिलं पाहिजे असाच संदेश हि गुरुपौर्णिमा देते.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?