फॉलोअर

तुझ्या दर्शने उजळो जीवन


 

श्री गणेश, आराध्य दैवत, बुद्धीची देवता , या वर्षीचा गणेशोत्सव आज सुरु होतो आहे. या १० दिवसात एक वेगळीच उर्जा आणि वेगळाच उत्साह पहायला मिळतो. गणेश प्रेमी कार्यकर्त्यांच्या तर उत्साहाला भरती आलेली पहायला मिळते. मग कुण्या गावाचा राजा, गल्लीचा राजा अशी अनेक बिरुदं सांभाळत श्री गणेश पृथ्वीतलावर येतात. परमतत्व ओंकार चे साक्षात स्वरूप असे गणेशतत्व हे श्री गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत पृथ्वीवर मुबलक प्रमाणात असतं त्याची भक्ती केली कि त्याचा आशीर्वाद लाभतो, तोच सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता त्यामुळेच आपणं दरवर्षी “आतुरता आगमनाची” म्हणत असू बहुतेक..... मी ही दरवर्षी गणरायाच्या आगमनाची वाट पहात असतो याही वर्षी त्याच्या आगमनाची वाट पहात आहे. गणेश पूजन आणि चतुर्थीचे व्रत याचे उल्लेख महाभारतात देखील आढळतात असे जाणकार सांगतात. श्रीकृष्णाने देखील गणेश व्रत केल्याचा उल्लेख शास्त्रात आढळतो.

अशा या गणरायाची मूर्ती मूर्तिकार घडवितो आणि शास्त्राप्रमाणे त्या मूर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली कि त्यात देव-तत्व येतं अशी आपली श्रद्धा आहे. यात कुणाचं दु-मत असण्याचं कारण नाही. काही दिवसांपूर्वी मी मूर्ती पहावयास गेलो होतो (मागील वर्षी प्रमाणेच या वर्षी देखील विद्या कॉम्प्युटर्स मध्ये शाडूच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध केल्या आहेत) तेंव्हा तेथील मूर्तिकाराशी बोलणे झाले, मी त्यांना म्हणालो मला मूर्ती अशी हवी, तशी हवी, त्यावर मूर्तिकार म्हणाले “मला सगळ्या मूर्ती सारख्याच वाटतात” तुमचा दृष्टीकोन (ज्या भावनेतून पहाल, जसे पहाल तसे दिसेल) जसा असेल तशी मूर्ती तुम्हास दिसेल, पण एका आईला जशी तिची मुलं प्रिय आणि सारखीच असतात अगदी तसचं त्या मूर्तिकाराच उत्तर मला वाटलं. गदिमांच्या लेखणीतून पाहिलं तर “फिरत्या चाकावरती देसी, मातीला आकार”, अगदी तसचं गणरायाची मूर्ती घडविताना मुर्तीकाराचे भाव खूप महत्वाचे वाटतात कारण त्या आकारावरच आपली श्रद्धा असते, भक्ती असते...काय सांगावे त्याच्याकडून हे कर्म करून घेणारा देखील तोच करता करविता असेल ! या घडविलेल्या मूर्ती मूर्तिकार विक्रीस ठेवतो, जेंव्हा या मूर्ती विक्रीस ठेवलेल्या असतात तेंव्हा असं वाटतं कि प्रत्येक वर्षी त्याची वाट पाहणारे आपणं, आता तो आपली वाट पाहतोय... आपण भक्त मंडळी त्या मूर्तिकाराच्या कष्टाचे दाम मोजतो आणि आपला देव पूजायला देव्हाऱ्यात नेतो. कारण त्याच्यावर असलेली “श्रद्धाच” आपल्याकडून हे करून घेते, असं मला वाटत. 

तू सुखकर्ता तू दुखहर्ता” या गाण्यात बराच मोठा अर्थ दडला आहे आणि प्रत्येक वेळी स्वत:बद्दल नवीन जाणीव होते. हे गाणं कधीही ऐकताना कुठेतरी 'स्वत्वा' ची जाणीव होते. तो अनाधि अनंत आहे आणि तोच कर्ता-धर्ता आहे हे मान्यच कराव लागत !! मी कर्म करतो पण त्यास फळ मिळेल याची चिंता तुझ्या भक्ताला करावीच लागणार नाही अस या दोन ओळी सांगतात –

"तुझ्या कृपेचा हात मस्तकी

पायी तव मम चिंता ||"

पण तुझ्या कृपेचा हात मस्तकी हवा , अर्थात तो सर्वानाच हवा असतो.

अगदी त्याच प्रकारे मी पणा , अहंभाव,नष्ट होणे आवश्यक आहे, अस सुचवीणाऱ्या या दोन ओळी-

देवा सरू दे माझे मी पण

तुझ्या दर्शने उजळो जीवन

बाप्पा, तुझ्याकडे दरवर्षी आम्ही भक्त मंडळी काही ना काही मागतोच (मनुष्य स्वभाव), बाप्पा, भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे, पण अद्याप या देशास आर्थिक  स्वातंत्र्य मिळालेल नाही, आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुझा कृपाशीर्वाद मिळावा कारण कष्टकरी, नोकरदार, व्यावसायिक सगळ्यांसाठी तूच एक आशेचा किरण आहेस. 

“तुज मागतो मी आता, मज द्यावे एकदंता !!  

तुझा अपराधी मी खरा
आहे इक्षु-चापधरा
माझी येऊ दे करुणा
तुजलागी गजानना”

गणपती बाप्पा मोरया !!!

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


इतर विषयांवरील लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करावं

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?