फॉलोअर

ChatGPT कृत्रिम बुद्धिमत्तेचा अविष्कार- तारक की मारक ?

 



संगणकीय जगातील कृत्रिम बुद्धिमत्ता नवे नवे प्रयोग करताना आता आपल्याला पहायला आणि अनुभवाला मिळत आहे. येणाऱ्या पिढीला याचा खूप फायदा होवू शकेल अस वाटते. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता अनेक चमत्कार दाखवेल असा विश्वास तंत्रज्ञांना वाटतो आहे. मग ते क्षेत्र वैद्यकीय असेल, तांत्रिक असेल अथवा जिथे गरज असेल ते क्षेत्र ! सगळीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता कमाल दाखवेल हे मात्र नक्की ! आणि हा सगळा चमत्कार घडेल तुमच्याकडील डेटा मुळे !! तुमच्याकडील डेटा (माहितीसाठा) हा खूप महत्वाची भूमिका पार पाडेल यामध्ये शंकाच नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा हा डेटाच असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे मानवाला मिळालेली नवी देणगी आहे याच्या जोरावर बरेच प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तस पाहिलं तर आरोग्यसेवा हि मनुष्यबळावर अवलंबून आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता योग्यरीत्या वापरली गेल्यास, या क्षेत्रास त्याचा खूप मोठा फायदा होताना पहायला मिळेल. संशोधक, शास्त्रज्ञ आणि डॉक्टर्स यांची एक टीमच या विषयावर कार्यरत आहे नक्कीच हि मंडळी एका नव्या ए.आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाच्या अविष्कारा सह आजही आणि भविष्यातही समोर येतील.

चॅट बॉट हे एक असचं नव कोर तंत्रज्ञान जे तुम्हाला इंटरनेटच्या सहाय्याने संवाद साधण्यासाठी तयार केलेलं आहे. हा एक संगणक प्रोग्राम आहे. एका सर्व्हे द्वारे असं समोर आलं  आहे कि इंटरनेट युजर्स हे सोशल मेडिया साईटस् पेक्षा मेसेंजर चा वापर जास्त करतात. अगदी हाच धागा पकडून चॅट बॉट  ची निर्मिती केली जात आहे. काही नियम व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करून चॅट बॉट  ची निर्मिती होत आहे. हि सेवा कोणत्याही सेवेशी जोडता येवू शकते जसे कि काही ठराविक टास्क पासून गमतीसाठी चॅट बॉट  वापरता येवू शकतो. चॅट बॉट  तंत्रज्ञान आता काही भविष्य राहिले नाही, हे सध्या वापरात असणारे तंत्रज्ञान आहे. भाषा समजून घेण्याच्या क्षमतेमुळे बऱ्याच क्षेत्रात याचा वापर होवू शकतो. आभासी सहाय्यक, ब्रँन्डस् व ग्राहक यांच्यातील संवाद घडवून आणण्यास समर्थ होत आहेत आणि याचा ग्राहक वर्गास भरपूर फायदा होताना दिसत आहे.

हे सारं ठिक आहे, पण ChatGPT म्हणजे काय? तर वरील दोन्ही विषयातच ChatGPT (GPT म्हणजे जनरेटीव प्री-ट्रेनड् ट्रान्सफॉर्मर) विषयी माहिती दडली आहे. ChatGPT हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला चॅट बॉट आहे, जे ओपन AI (Artificial Intelligence) द्वारे विकसित केले गेले आहे. “ओपन AI” ही एक खासगी संशोधन प्रयोगशाळा आहे , या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित करणे हा आहे ज्याचा उपयोग मानवतेच्या भल्यासाठी करता येऊ शकेल, असे या खासगी प्रयोगशाळेचे म्हणणे आहे. तसे पाहिले तर ChatGPT हा एक संगणक प्रोग्राम आहे ज्यास मानवी भाषा समजते (संभाषणासाठी इंग्लिश भाषेचा वापर केला जातो आहे) आणि त्यास प्रतिसाद देण्यासाठी तो स्वत:ची भाषा वापरू शकतो. तसे त्यास प्रशिक्षित केले गेलेले आहे. यासाठी इंटरनेट वरील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणारा डेटा (या डेटा मध्ये इंटरनेट वरील पुस्तके, लेख, आणि वेबसाईट्स या गोष्टींचा समावेश होतो.) वापरण्यात आला आहे. एखाद्या स्मार्ट रोबोट सारखा विचार करून तुमच्याशी बोलू शकेल एवढे यास प्रशिक्षित केले आहे. इंटरनेट वरील बराच मोठा डेटा यासाठी वापरलेला असल्याने ChatGPT ला लोक भाषा कशी वापरतात याविषयी प्रशिक्षित केलं गेल आहे. जेव्हा तुम्ही ChatGPT ला काम करण्यास काही मजकूर देता तेंव्हा ते प्रशिक्षित करण्यात आलेल्या डेटाचा वापर करते आणि पुढे कोणता मजकूर येऊ शकेल याचा अंदाज लावते , हे करण्यासाठी अलगोरीदम व जटिल गणिती क्रियांचा वापर केला जातो. ChatGPT हे नॅचरल लॅंगवेज प्रोसेसिंग टूल आहे.

ChatGPT हे एक शक्तिशाली साधन बनू पाहत आहे कारण याचा वापर हा माहिती प्रदान करणे, मजकूर तयार करणे, भाषांतर, वैयक्तिक सहाय्य करणे (पर्सनल असिस्टंट), डेटा विश्लेषण, या सारख्या विविध बाबीं साठी करता येतो. यात एक गोष्ट खूप गंमतशीर आहे ती अशी की सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरना कोड लिहिण्यासाठी देखील ChatGPT मदत करेल. गणिती क्रिया सोडविण्यासाठी, स्वत:चा बायोडेटा लिहिणे- तसे पाहिले तर या विषयी फारशी जागृती नसते अशावेळी ChatGPT विद्यार्थ्याना बायोडेटा लिहिण्यासाठी मदत देऊ करणार आहे, तुम्ही व्यावसायिक असाल तर स्मार्ट असिस्टंटच्या अवतारात ChatGPT तुम्हास तुमचा बिझनेस प्लान देखील लिहून देइल! गुगल तुम्हास इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती उपलब्ध करून देते त्या वरुन युजरला स्वत: माहिती तयार करावी लागते, उदा- एखाद्या विषयी निबंध लिहायचा असेल तर गुगल माहिती कुठे उपलब्ध होईल हे सांगेल पण ChatGPT तुम्हाला पूर्ण निबंध लिहून देइल, कविता करेल तेही तुम्ही जेवढे शब्द सांगाल तेवढ्या शब्दांत ! आहे ना जादूची कांडी !! शाळेत मुलांना भाषणं लिहून आणण्यास सांगितले जाते, यांमध्ये मुख्य भूमिके मध्ये नेहमी मुलांची आई असते, आता ती जागा ChatGPT घेईल, तुम्ही फक्त विषय सांगितला तर तुमचे भाषण काही सेकंदात लिहून तयार होईल.       

तुम्हास आता पर्यन्त हे लक्षात आलं असावं की “डेटा कसा आणि किती महत्वाचा आहे?” ChatGPT मोफत सेवा उपलब्ध करून देते पण लक्षात घ्या काहीही मोफत नसतं  ChatGPT तुम्हास प्रथम नोंदणी करण्यास सांगत आणि तुमची माहिती भरून घेतं. अर्थात तुम्ही तुमच्या गुगलच्या अकाऊंट देखील लॉग इन करू शकता. चॅट सुरू झालं की तुम्ही फक्त तुमच्या डिमांड सांगायच्या ChatGPT त्या पूर्ण करण्यास सक्षम (ChatGPT कडे २०२१ पर्यंतचा डेटा फिड आहे) आहे. ज्या विषयाची ChatGPT कडे माहिती नाही त्याबद्दल ChatGPT दिलगिरी व्यक्त करेल.

एखाद्या सुविधेचे फायदे आणि तोटे दोन्ही असतात, तसेच ChatGPT चे देखील काही फायदे आणि तोटे आहेत-

ChatGPTचे फायदे:

§  यामध्ये मानवी संवादाची नक्कल दिसते ज्यामुळे आपण सहज संवाद साधू शकतो. तुम्ही ChatGPT ला प्रश्न अथवा आदेश देऊ शकता. सध्या वापरात असणारे आभासी सहाय्यक जसे की अलेक्सा, गुगल होम यांचा पुढील अवतार म्हणजे ChatGPT.

§  अष्टपैलू ChatGPT- असे आतातरी आपण म्हणू शकतो, पण ते खरचं अष्टपैलू आहे का हे येणारा काळच ठरवेल.

§  कंटाळवाणी वाटणारी कामे जसे की उदा. टायपिंग करणे, एखाद्या विषयावर लेख लिहिणे, निबंध लिहणे, तेही तुम्ही दिलेल्या शब्द मर्यादे मध्ये ही सारी कामे ChatGPT तुमच्यासाठी करेल.

ChatGPTचे तोटे:

§   इंटरनेटवरील उपलब्ध माहिती सगळीच खरी असते असे नाही, इंटरनेटचा वापर करीत असताना कुणी कोणत्या प्रकारची माहिती दिली आहे त्यात किती तथ्य आहे याची खातरजमा कोण करणार? (अद्याप ChatGPTला या विषयात प्रशिक्षित केले गेलेले नाही) कारण ChatGPTचा बॅक बोन हाच डेटा आहे ज्याच्या आधारावर माहिती पुरवली जाणार आहे.

§  साहित्य आणि लेखन याच्या रोज नव्या नावाने कॉपीज तयार होतील, लेख तोच असेल फक्त लेखकाचे नाव बदलेले असेल, (हा प्रकार सध्या whatsapp माध्यम वापरताना आपण पाहतो पण त्यात कॉपी पेस्ट दडलेलं असतं) एक प्रकारची साहित्य चोरीच म्हणावी लागेल यास.

§  सगळी माहिती, कल्पना चुटकीसरशी रेडिमेड मिळायला लागल्या तर मनुष्यप्राणी विचार करणं थांबवेल, किंबहुना सर्जनशील, नव्या निर्मितीचा ध्यास घेणारा मनुष्य प्राणी ChatGPTचा दास बनेल की काय अशी भिती मनात येते. पर्यायाने शिक्षक, वकील, कॉपी-रायटर्स, संगणक क्षेत्रातील कोड रायटर्स , लेखक, कवी , संपादक यांची कामे ChatGPT मार्फत केली जातील म्हणजे यां सगळ्यांना घरचा रस्ता दाखवला जाणार !! नुसता विचार केलातरी सारं भयंकर वाटेल. पण हे भविष्यात असं घडेल हे मात्र नक्की ! बेरोजगारीवर मात कशी करायची यावर आपल्याकडे आज तरी उत्तर नाही पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या बेरोजगारी कडे आजच गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि त्यानुसार मार्गक्रमण केले पाहिजे असे वाटते.    

§  नैतिक कायदेशीर परिणाम: इंटरनेटवर उपलब्ध डेटा कसा आहे यावर अवलंबून असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे मिळणारं आउटपुट कदाचित भेदभावपूर्ण किंवा पक्षपाती पद्धतीने प्रतिसाद देऊ शकतं. ज्याचा इतरांना त्रास होऊ शकतो. मिळालेल्या माहितीचे अवलोकन करणं , तपासून घेणं गरजेच असेल.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करीत असताना तो काळजीपूर्वक करणे क्रमप्राप्त आहे परंतु मनुष्य स्वभाव पाहता तो कितपत नैतिकरित्या होऊ शकेल याबाबत साशंकता आहे. गुगल सुरुवातीस फक्त टेक्स्ट (शब्द) सर्च केले की माहिती देऊ करीत होतं नंतर इमेज सर्च हा पर्याय आला, का आला? तर तसा डेटा त्यांच्याकडे तयार झाला, अगदी तसेच ChatGPT आज शब्द प्रोसेस करते भविष्यात इमेज (चित्र), आवाज, विडिओ इ. प्रकारची माहिती प्रोसेस करू शकेल. विषयातील तज्ञ आणि अभ्यासू व्यक्तींचा मान नक्कीच आहे तो त्यांना मिळायला देखील हवा पण जर भविष्यात ChatGPT ला विषयातील तज्ञ म्हणून पाहिले गेले तर ते योग्य होणार नाही, आभासी सहाय्यक म्हणून याकडे जरूर पहावं. 

   

डोळे आणि बुद्धी सदैव जागी ठेवा , सतर्क रहा, कठोर परिश्रम आणि ज्ञान संपादन यास कोणताच पर्याय असू शकत नाही हे लक्षात ठेवा तरच उद्याचा दिवस तुमचा आहे.  

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?