फॉलोअर

सोशल मीडिया एटीकेट्स !

 


हा एक नवा माहिती देण्याचा , जागो रे ! म्हणण्याचा विषय होवू शकतो, असं वाटलं नव्हतं. पण सोशल मीडियाचा वापर करीत असताना आज ज्या प्रकारे कमेन्टस् वाचण्यात येतात, त्या वाचल्यावर नक्की वाटतं की याचं शिक्षण देण्याची नितांत गरज आहे. काही मंडळी त्वेषाने द्वेष पसरविण्यात एवढी मग्न असतात की खरचं यांची शैक्षणिक पात्रता, विषयातील अभ्यास या विषयी कुतूहल निर्माण होतं. अभिव्यक्ति स्वातंत्र्य म्हणजे बेलगाम घोडा दवडणे होऊ शकत नाही. ताळतम्य हवच, एखाद्या व्यक्तीच्या ज्येष्ठतेचा, ज्ञानाचा आदर होताना दिसतं नाही. ही आपली संस्कृती नाही. सोशल मिडियावरील मंडळी शिक्षित आहेत पण साक्षर नाहीत हे नक्की. या विषयावर माझा ब्लॉग आहेच, तुम्ही तो वाचला असेल अशी आशा व्यक्त करतो. नसेल वाचला तर या लिंकवर क्लिक (https://amitkamatkar.blogspot.com/2025/03/educate-literate.html) करून  नक्की वाचावा. सोशल मिडियाचा वापर तसा अनेक वर्षे झाली करतो आहे. हा वापर करीत असताना शिष्टाचारांच (इंग्लिश मध्ये एटीकेट्स) पालन करणं यां विषयी कधी फारसं कुणी बोलेललं पाहिलं नाही अथवा कुणी यावर मार्गदर्शन केलं आहे असेही पाहिलं नाही. माझं अल्पज्ञान असेल ही , तुम्ही पाहिलं असेल अथवा वाचलं असेल तर नक्की सांगा. काहीना “शिष्टाचार” कोणत्या गावा ? असा प्रश्न ही कदाचित पडला असावा. असो , पण एक नक्की अलीकडे फेसबुक , व्हॉटस् अॅप, ही संवाद माध्यम वापरीत असताना काही एटीकेट्स आपण पाळतो का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे हे नक्की. कोणत्याही पोस्टवर आपण व्यक्त व्हायला हवं त्यावर कमेन्ट करायला हवं असे काही नसतं, हे ध्यानात घेतलं पाहिजे.

                   काही मोजकेच एटीकेट्स येथे देत आहे, आशा आहे हे वाचले जातील आणि अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले जातील.  

   १.      आदर – सोशल मीडिया वापरायचा हा सुवर्ण नियम म्हणावा लागेल, कारण इतरांशी तसेच वागा जसे तुम्हाला इतरांकडून हवे आहे. तुमच्या संवादातून आदर दिसायला हवा भलेही तुम्ही मताशी सहमत असाल अथवा नसाल.

   २.      पोस्ट करणेपूर्वी विचार करा – “पोस्ट” बटण दाबण्यापूर्वी तुमच्या शब्दांचे आणि कृतीचे संभाव्य परिणाम विचारात घ्या. एकदा इंटरनेट वर काही पोस्ट झाले की ते सहजा सहजी काढून टाकणे सोपे नाही.

   ३.      आक्षेपार्ह भाषा टाळा – आक्षेपार्ह भाषा किंवा द्वेषपूर्ण भाषा टाळा, यास खरे पाहिले तर सोशल मिडियावर स्थान नाही. अपमानास्पद शब्द, शिवीगाळ किंवा इतराना दुखावणारे किंवा अपमानित करणारे वापरणे टाळा.

    ४.     गोपनीयता सेटिंग्जचा आदर करा- जर एखाद्याने प्रोफाइल सेटिंग खासगी ठेवले असेल तर त्याच्या निर्णयाचा आदर करा, परवानगी शिवाय त्यांच्या कंटेंट मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करू नका.

    ५.     वाद टाळा – सोशल मीडिया हा सार्वजनिक आहे हे लक्षात घ्या. तुमच्याशी जोडलेले सगळेच तुम्ही केलेले कमेन्टस् वाचू शकतात याचे भान ठेवा. तुमच्या ऑनलाइन प्रतिष्ठेला जपा. कुणाशी मतभेद असल्यास खासगी मेसेज माध्यमातून व्यक्त व्हा , सार्वजनिक पोस्ट करणे टाळा.

     ६.     विनोद आणि व्यंग काळजीने आणि जबाबदारीने – सोशल मिडियावर विनोद आणि व्यंगावर सहज गैरसमज होऊ शकतात. इतराना अनवधानाने दुखवू नये तुमच्या धारदार शब्द सामर्थ्यास जबाबदारीने वापरा.

    ७.     श्रेय द्या – एखाद्या व्यक्तीची पोस्ट शेअर / फॉरवर्ड करीत असाल तर त्याचे श्रेय त्या व्यक्तीस द्या. त्यांना tag करा किंवा त्याचा उल्लेख करा.

    ८.     धीर आणि सहनशीलता ठेवा- सगळेच तुमच्या मताशी सहमत असतील असे नाही. धीर ठेवा आणि  सर्वात महत्वाचं सहनशीलता राखा

    ९.     अनफॉलो अथवा म्युट – जर तुम्हाला एखाद्याचा मजकूर सतत आक्षेपार्ह किंवा असहमत वाटत असेल तर वाद घालण्या पेक्षा त्यांना अनफॉलो करा किंवा म्युट करण्याचा विचार करा.

    १०.  राजकारण आणि धर्म- हे दोन्ही प्रांत खूपच सेन्सीटीव आहेत. सावधगिरी बाळगणं हाच योग्य उपाय असू शकतो. यातील चर्चा या फुट पाडणाऱ्या असू शकतात. या विषयांकडे संवेदनशीलतेने आणि आदराने पहा.

मला वाटतं हे शिष्टाचार सर्वानी फॉलो करणे अनिवार्य आहेत. तरच सोशल मिडियाचा वापर योग्य रीतीने आपण करीत आहोत असे म्हणता येईल अन्यथा नाही.

काळजी घ्या, सतर्क रहा.


अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता, सॉफ्ट स्किल ट्रेनर 


Image source: Google

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?