संत श्री ज्ञानेश्वर – मुक्ताई
सध्याच युग हे
आर्टिफिशियल इंटेलिजंसच युग, जिथे ड्रायवरलेस कार आल्या आहेत, अशा जमान्यात
दिग्दर्शकाने “भिंत” चाललेली दाखवणं कितपत रुचेल हा खरा प्रश्नच ! पण तरीही दीगपाल
लांजेकर आणि टीम ने हे धाडस केलं आणि १४०० वर्षे वयोमान !! असणाऱ्या योगींच्या स्वागताला
सामोरं जाण्यासाठी संत श्री ज्ञानेश्वरांनी भिंत चालविली. हे सारं दिव्यच ! या
दिव्यत्वाची महती आणि माहिती नव्या पिढीस होणे नितांत आवश्यक आहे. वाचन आणि संयम
कमी होत चाललेल्या युवा पिढीस हा विषय पडद्यावर दाखवणं आणि चित्रपट गृहात आणणं हे
एक आव्हान आहे. तंत्रज्ञानाच्या युगात आध्यात्मिक वारसा जपणं आणि त्यासाठी
जाणीवपूर्वक प्रयत्न करणं मला कौतुकास्पद वाटतं.
हे एक दिग्दर्शक
निर्माते म्हणून आपण जाणलं आणि कशाचीही पर्वा न करता हे आपण पडद्यावर साकारलं.
यासाठी प्रथम आपले मन:पूर्वक आभार ! श्रद्धा ,भक्ति आणि नम्रता या जोरावर अनेक
असाध्य गोष्टी साध्य होतात याचे दर्शन या चित्रपटात होते. अहंकारामुळे होणारे
नुकसान सामान्य जनास दिसत नाही, पण भक्ति मार्गावर असणाऱ्या मंडळीना हे सारं ज्ञात
असतं. बदलत्या काळा नुसार बदलणे क्रमप्राप्त असतं तसं बदलावं देखील पण आपली पाळं-मूळं
कुठून आली आहेत , आपण कुणाचा वारसा सांगत आहोत , हे जाणून घेणं ही तितकच आवश्यक
आहे. समाजाकडून मिळालेली वाईट वागणूक, निंदा नालस्ती काहीही न बोलता स्वीकारून, कोणताही
अपशब्द न बोलता आयुष्याच्या वाटेवर मार्गक्रमण करीत राहणं सोपं नाही. पण या चार भावंडांनी
त्यांच्या कृतीतून हे साध्य करून दाखवलं आहे. कुठेही “अहम” पणा नाही, ज्ञानाचा गर्व
नाही, फक्त आपल्याकडे जे आहे ते भरभरून देत जाणं हेच जीवन आहे. हा अनमोल संदेश.
समाजाने वाईट वागणूक देऊनही
विश्व कल्याणासाठी, शांती साठी, समृद्धी साठी प्रार्थना करणारे ज्ञानेश्वर आजच्या पिढीस यां निमित्ताने
समजतील, विश्व कल्याणासाठी शुद्ध अंत:करण आणि निरागसतेने केलेली आर्त मागणी म्हणजे
“पसायदान”.
आयुष्यात निर्णय घेणं
गरजेचं असतं पण निर्णय होत नाहीत, द्विधा मनस्थिती निर्माण होते पण ज्ञानेश्वरांनी
अवघ्या २१ व्या वर्षी पृथ्वीतलावरील आपले कार्य पूर्ण झाले आहे आणि आपण संजीवन
समाधी घेत आहोत हा निर्णय घेणं, केवढी ही दृढता ! हा निर्णय घेताना मोठ्या भावा
सोबत केलेला संवाद ही तितकाच महत्वाचा. योग शक्तीची ताकत फार मोठी आहे. शरीरामध्ये
असणाऱ्या मुख्य सात ऊर्जा केंद्रांना सप्तचक्र म्हणतात. शरीराच्या गरजेप्रमाणे वातावरणातील
निसर्ग शक्ति आभामंडलात आकर्षिली जाते.
भगवद् गीता ज्ञान सामान्य
व्यक्ति पर्यन्त पोहोचावं तेही मराठी भाषेत, बोली भाषेत यासाठी ज्ञानेश्वरी अर्थात
भावार्थदीपिका लिहावयास घेणे, हा एक निश्चय दाखवितो, सोबतच “ज्ञान” सर्वांपर्यंत पोहोचावं
त्यावर सर्वांचा अधिकार आहे ही तळमळ. एकूण १८ अध्याय आणि ७०० श्लोकात सामावलेली ज्ञानेश्वरी
हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ. ज्ञानेश्वरांनी तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे
अतिशय सुंदर आणि प्रभावी वर्णन केले आहे. सर्व विश्वाचे आदिकारण त्याचा कर्ता आणि नियामक
ईश्वर मानला पाहिजे, हे ज्ञानेश्वरांनी विश्व-प्रपंचावरुन सिद्ध करणारे प्रमाण उत्कृष्ट
रीतीने मांडले आहे.
ही काही माहिती प्रथम शेअर
करण्याचं कारण खास आहे, नुकतचं ज्ञानेश्वरांची मुक्ताई चित्रपट पाहण्यास चित्रपट गृहात
जाण्याचा योग आला, पण चित्रपटगृह रिकामं पाहून खंत वाटली. निर्माता दिग्दर्शक यांच्या
एका उत्तम प्रयत्नास रसिक मायबाप प्रेक्षकांनी प्रतिसाद देण्यास हरकत नव्हती. पण तसे
घडलेलं दिसलं नाही. मन खिन्न झालं पण भावार्थदीपिकेतील पुढील श्लोक वाचण्यात आला ..
स्तुती कांही न बोलणे | पूजा
कांही न करणे |
सन्निधी कांही न होणे | तुझ्या
ठायी || २५ ||
अर्थात-तुमच्या संबंधाने काही न बोलणे स्तुती
होय, काही न करणे पूजा होय, आणि साधकाने जीव
व शिव अथवा ब्रह्म यापैकी कोणाचाच अभिमान न घेणे हीच तुमची जवळीक होय ||१८-२५||
ॐ सह नाववतु , सह नौ भूनक्तू
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा