भाषा सक्ती आणि शिक्षण
विशेष टीप : हा लेख वाचताना कोणत्याही
राजकीय चष्म्यातून वाचू नये. समाजात वावरताना जे पाहिलं ते मांडण्याचा प्रयत्न केला
आहे एवढचं.
उदाहरण- १
एक कॉम्प्युटर कोर्स करण्यासाठी इ.१०
वी परीक्षा पास (उत्तीर्ण) विद्यार्थिनी येते आणि तिला कोर्सचे अभ्यासक्रमाचे पुस्तक
कोणते (मराठी की इंग्रजी भाषेतील) देऊ विचारल्यावर ती उत्तर देऊ शकली नाही. कारण
ती म्हणते सगळं शिक्षण कन्नड भाषेत झाले आहे. वाचायला जे सोपे असेल ते द्या !! प्रवेशाच्या
छापील नमुन्यावर (ऍडमिशन फॉर्म) स्वाक्षरी देखील कन्नड भाषेत करते. तिचं शिक्षण
कर्नाटकात झालेले आहे हे एव्हाना आपल्या लक्षात आलेलेच असावे. संवाद हा पूर्ण मराठीत
झाला हे येथे नमूद करणे क्रमप्राप्त आहे.
उदाहरण- २
आज आपल्याकडील स्मार्ट फोन वर विविध
ॲप्स उपलब्ध आहेत ज्यावर विविध भाषा शिकता येतात. हे उघड सत्य आता सगळ्यांपर्यंत
पोहोचलेले आहे आणि गरज पडल्यास ही मंडळी त्याचा वापर करू शकतील. ज्यावेळी मेंदू
विकसित होत असतो (साधारण वयाच्या 14 वर्षा
पर्यंत) ते म्हणजे प्राथमिक शिक्षण अशा वेळी सारे छोटे दोस्त स्मार्ट फोनचा सर्रास
वापर करतातच हे सर्वांनाच माहिती आहे. हा वापर योग्य दिशेने कसा होईल याकडे पालक ,
शिक्षक म्हणून पाहण्याची नितांत गरज मला वाटते. योग्य अँप चा वापर
करून विविध भाषा , कौशल्यं आत्मसात करता येऊ शकतात, नव्हे हे प्रॅक्टिकली घडतंय सुद्धा.
पण आपल्याकडे “सुधारणा
आणि बदल” आपण सोडून दुसऱ्याने करावे अशी प्रथा आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष
द्यावे,
भाषा अनिवार्य आणि पर्याय असे शासनाने ठरवावे... अहो पण शासकीय
शाळेत शिकतात किती विद्यार्थी ? पट संख्या किती आहे ?
मराठी अनुदानित शाळा ओस पडू लागल्या आहेत, इंग्रजी
माध्यमांच पेव काही नवीन नाही पण या शाळात मराठी शिकवलीच जाते की (इयत्ता पहिली पासून),
हिंदी (इयत्ता ३ री पासून) आणि संस्कृत हा पर्याय इयत्ता पाचवी नंतर
मिळतो. पण शिक्षणाचा श्री गणेशा करीत असताना एक पालक कोणत्या शाळेची निवड करतो ?
तर इंग्रजी माध्यम.... का तर तशी गरजच आहे... बदलते जग. हा ट्रेंड काही
नवीन नाही.
आणखी
एक बाब, काही वर्षा पूर्वी टीएर १ , २ आणि आता टीएर ३ प्रकारच्या शहरातून एक नवा ट्रेंड
पहायला मिळतो आहे, पालकांचा सी. बी. एस. ई शाळांकडे वाढणारा कल. या शाळेत प्रवेश घेण्यास
पालक इच्छुक का होतो आहे? याचा विचार करणे आवश्यक नाही का? स्पर्धेच युग तर आहेच, या
युगात सर्वानाच अग्रेसर राहायचं आहे, त्यासाठी जमेल ते, परवडेल ते करण्यास पालक मंडळी
तयार असतात, अथवा तयार होतात. मग आशा ठिकाणी भाषा सक्ती किती महत्वाची ? बरं , “इंग्रजी”
काळाची गरज म्हणून इंग्लिश मिडियम शाळेत मुलांना प्रवेश घेतल्याने सगळ्याच विद्यार्थ्याना
अस्खलित इंग्रजी बोलता येऊ लागलं आहे काय? त्यांच्या मातृभाषे इतकी समृद्धता त्यांच्या
व्यावहारिक भाषेत येते आहे काय? याचं उत्तर नकारार्थी आहे. ही वस्तुस्थिती आहे, ती
आपण स्वीकारणार आहोत की नाही ? यात राजकारण घुसडू नये कारण समाजातील एक विदारक सत्य
आहे. अमाप पैसा खर्च करून मोठ्या शाळेत शिकून, विविध ट्यूशन्स, कोचिंग क्लास लावून
हातास काहीही लागलेलं नाही अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतात.
एक
अनुभव - विविध कौशल्यं शिकण्या विषयी जेंव्हा जेंव्हा आवाहन केले जाते, याचा तराजू
केला जातो, किती पैसे भरले आणि कसे वसूल होतील ? याची गणितं मांडली जातात, पण विद्यार्थ्याच्या
करिअर मध्ये यास अनन्य साधारण असे महत्व आहे हे मान्यच केले जात नाही. काही ठिकाणी
“कौशल्य” कोणत्या गावा? असा प्रश्न विचारला जातो. ही काही शिकायची बाब आहे काय? अनेक
पालक आजही अनभिज्ञ आहेत. या विषयी शासन स्तरावर काही निर्णय होतील काय? अगदी वाड्या,
वस्त्यांवर या विषयी जनजागृती होईल का? पारावरील गप्पा या विविध कौशल्या विषयी ऊहापोह
करताना रंगतील काय? हे सार दिवा स्वप्न आहे याची पूर्ण कल्पना मला आहे, पण कौशल्यं
शिकायची म्हणजे नक्की काय तर ज्याच्या कडे ती आहेत ती त्याच्याकडेच जाऊन शिकावी लागतील.
शिकायची तयारी असायला हवी, ती तयारी विद्यार्थ्यानी करावी यासाठी प्रयत्न करावे लागणार
आहेत. असे चित्र आहे. साधं घरातील नळाचे, फ्रीज, एयर कंडिशनचे काम करायचे तरी कौशल्य
हवं, कुणाशी संवाद साधायचा म्हंटल तरी कौशल्य हवं, कामाच्या ठिकाणी वागण्याचे, बोलण्याचे
कौशल्यं हवं, स्टार्टअप करायचं म्हंटलं तरी कल्पना हव्यात , विचार करण्याची दिशा हवी
मग हे सार कोणत्या शाळेत शिकायला मिळेल ? नवे शैक्षणिक धोरण एक उत्तम डॉक्युमेंट आहे,
याची अंमलबजावणी करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. तरच एक समृद्ध , शिक्षित, कौशल्य
निपुण, तंत्रस्नेही, जबाबदार विद्यार्थी घडतील.
थोडा विचार करा आणि पहा पटतयं का ?
अमित बाळकृष्ण कामतकर
ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता,
सॉफ्ट स्किल ट्रेनर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा