फॉलोअर

संक्रमण

 


आपल्या अवतीभवती बऱ्याच गोष्टी घडत असतात, फक्त आपलं लक्ष नसतं. किंबहुना जो व्यक्ति कामात व्यस्त असतो त्यास फारसं देणं-घेणं नसतं की अवती भवती काय घडतं आहे. “लक्ष्य” साध्य करणे हेतु ध्येयाने पछाडलेल्या व्यक्ति अशाच असतात. हो, पछाडलेल्या , हाच शब्द योग्य वाटतो मला, कारण त्या शिवाय त्याची डेपथ लक्षात येत नाही. त्याचं महत्वही लक्षात येत नाही. व्यवसाय असेल अथवा नोकरी असेल दोन्हीकडेही पछाडलेपणा हवाच ! कामाची वेगळीच नशा. इतर कोणतीही नशा करण्यापेक्षा “कामाची” नशा कधीही लईभारी ! “एम्पटी माइंड इज डेविल्स वर्क शॉप”, असे उगाच नाहीत म्हणतं. सतत कार्य मग्न राहणं आरोग्यासही उत्तमच. आजच्या युवक वर्गात मला कामाप्रती समर्पण दिसून येत नाही, काय कुणास ठाऊक पण जी युवा मंडळी भेटतात त्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळी लक्षात येतं की त्यांचं ध्येयच मुळी ठरलेलं नाही. आयुष्यात काय करायचं ? काय मिळवायचं या विषयी ही मंडळी फारशी सीरियस दिसतं नाहीत. हे मापदंड सरसकट सर्वाना लागू होत नाहीत, हे या ठिकाणी जाणीवपूर्वक नमूद करतो. पण सॅपल साइज दहा धरला तर किमान सात युवक वरील प्रश्ना विषयी अनभिज्ञ आहेत.

तंत्रज्ञानदृष्टीने संपूर्ण जग ज्या फेज मधून आता जात आहे, ही एक ट्रांजिशन फेज आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने बऱ्याच गोष्टी बदलतील, बऱ्याच गोष्टी नव्याने शिकाव्या लागतील, काहींचे जॉब जातील, तेवढेच नव्याने तयार होतील, त्यासाठी काही विशेष कौशल्ये शिकावी लागतील, “अप टू डेट” राहणं अपरिहार्य आहे. हे मी फक्त आयटी, संगणक विषयी सांगत नाहीये तर सर्व क्षेत्रांविषयी सांगतो आहे. पूर्वी ज्या पद्धतीने यंत्रयुग आलं , संगणक युग आलं तसं आता कृत्रिम बुद्धीमत्तेचे युग येणार. “एक्स्पेक्ट द अनएक्सपेक्टेड”, या प्रमाणे गोष्टी आपल्या अवतीभवती घडणार आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. “निरंतर शिक्षण”, याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. आता जसे आपण पदवी, पदव्युत्तर शिक्षण झाले की म्हणतो शिक्षण झालं , असे करून चालणार नाही. अगदी सोप्या भाषेत, नोकरीच्या, व्यवसायाच्या ठिकाणी “पाट्या टाकून”, चालणार नाही. विविध कौशल्य आत्मसात करीत राहणं, शिकत राहणं अति –आवश्यक बाब बनणार आहे. मी उगाच बागुलबुवा नाही करत पण हीच फॅक्ट आहे.

फंडामेंटल, कन्सेप्ट क्लिअर असण्यावर आपण किती भर देतो ही साधारण शाळा / महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर ज्याच्या त्याच्या लक्षात येतं पण तो पर्यन्त उशीर झालेला असतो. आता तुम्ही म्हणाल, चॅटजीपीटी आलं आहे, आम्हाला सगळी माहिती लागलीच समजते, एखादा कन्सेप्ट क्लियर नसेल तर आम्ही तो विविध एॅप च्या सहाय्याने समजाऊन घेऊ शकतो. सगळं कसं चुटकी सरशी ! पण तुम्ही एक गोष्ट विसरता आहात, तुम्ही फक्त एंड यूजर बनून राहत आहात. आणि सगळ्यात महत्वाचं अवलंबून राहत आहात. ही सवयच वाईट, कुणावर का म्हणून अवलंबून राहायचं ? शेवटी मशिनच ते !! या साऱ्या गडबडीत ह्यूमन टच विरून जाणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल. जेंव्हा गरज आहे तेंव्हा पाहू, हे अॅटीट्यूड बदलावं लागेल, ज्या बाबी मशीन करू शकेल त्यासाठी माणसं का म्हणून ठेवली जातील? मग मशीन आणि आपणं वेगळे कसे? याची सिद्धता काय? आणि माणूस म्हणून वेगळेपणं काय ? याची उत्तरं आहेत काय तुमच्याकडे? हा उगाच बागूलबुवा नसून सावध करणं आहे. छोट्या शहरात याचे परिणाम दिसतील पण थोडा अवधी लागू शकतो. पण मेट्रो सिटीज मध्ये लागलीच याचे परिणाम दिसू लागले आहेत.

तंत्रज्ञानाचा वापर हा समाजाच्या हितासाठी करावा पण असे होईलच असे नाही, त्याचे धोके ओळखणे आणि त्यानुसार सतर्क राहणे ही देखील काळाची गरज बनली आहे. तंत्रज्ञान शिक्षित की साक्षर ? असे म्हणतात , ए  आय सगळ्या गोष्टी अगदी चुटकी सरशी करू शकेल. मग आपण याची माहिती घेणं, ज्ञान घेणं गरजेचं आहे की ए आय काय करू शकणार नाही? त्याची उपलब्धता माझ्या कडे आहे का? कोणत्या टेक्नॉलॉजी शिकण्याची आवश्यकता आहे ? असे प्रश्न युवकांना पडायला हवेत. पण तसे होताना दिसत नाही. निदान “अप टू डेट” राहणे तरी, ही मंडळी करू शकतील का? असा प्रश्न मला पडतो. खास करून इ.१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांशी मागील तीन –चार वर्षे झाले मी सॉफ्ट स्किल विषयी बोलतो आहे. त्याचे महत्व , फायदे इ. विषयी सांगतो आहे पण ही मंडळी त्या विषयी सीरियस होताना दिसत नाहीत. या वयोगटाच्या अनास्थे विषयी समजू शकतो पण हा प्रयोग करीत असताना मी पदवी, पदविका शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी देखील बोललो तेथेही भ्रमनिरास पदरी पडला. पण ही मंडळी कॅम्पस मध्ये झालेल्या मुलाखतीत उत्तीर्ण होऊन करिअर मध्ये पुढे मार्गस्थ झालेली असावीत. अशी आशा व्यक्त करतो.

ज्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रातील तंत्रज्ञान झपाट्याने बदलतं आहे त्याप्रमाणे ते आत्मसात करणं, ह्या बदलाच्या लाटेवर स्वार होणं आवश्यक आहे.

क्रमश:

 

पुढील भागात युवक वर्गाने काय करावं? काय शिकावं या विषयी मार्गदर्शन करेन.                               

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता, सॉफ्ट स्किल ट्रेनर


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

एआय शिक्षकांची जागा घेईल ?

तुम्ही शिक्षित की साक्षर ?