आनंदचा ‘मुरारीलाल’
“मुरारीलाल”, हे नाव कानावर पडताच
डोळ्यासमोर कोण येतं? तुम्ही म्हणाल “आनंद” चित्रपटातील जॉनी वॉकर, खरं ही आहे ते
वॉकर यांनी ती भूमिका बजावली नव्हती तर ते ती भूमिका जगले होते. पण राजेश खन्नास प्रतिसाद
देणारे इसाभाई सुरतवाला हे पात्र त्यांनी निभावलं होतं. मुरारीलाल पात्र आपल्या
समोर उभं करण्यात जॉनी वॉकर यशस्वी झाले, असेच मी म्हणेन. साद असेल तर प्रतिसाद हा
प्रकृतीचा नियम पण तो सर्वानाच माहिती असतोच असे नाही. चित्रपटात एखादा दुर्धर आजार
सोबत घेऊन फिरणारा, केवळ सहा महिने आयुष्य असणारा आनंद ! अनेकांना साद घालत फिरतो पण
कुणीतरी एकच त्यास प्रतिसाद देतो. असेच साद घालत फिरणारा आनंद तर आपल्या अवती भवती सुद्धा तुम्हाला भेटत असतील. दिलखुलास आयुष्य जगणारे आनंद,
दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद मानणारे, आयुष्य नितांत सुंदर आहे आणि ते भर भरून
जगायला हवं म्हणून कृतीतून शिकविणारे आनंद ! एक नाव पण अनेक रूपं धारण करणारे आनंद
! तुम्हाला असा एखादा आनंद भेटला आहे का ? माझी रोज सकाळी अशाच एका “आनंदची” भेट
होते. एक मित्र म्हणून नक्कीच रोज भेटावा असाच हा आनंद !
मॉर्निंग वॉक दरम्यान,
प्रचंड ऊर्जा घेऊन अनेक ज्येष्ठ मंडळी भेटतात, भेटी दरम्यान आठवणीने , प्रेमाने
एकमेकांची विचारपूस करतात. विशेष म्हणजे, बदलत्या तंत्रज्ञानाचे साक्षीदार असणारी
मंडळी हातात मोबाईल घेऊन, कानात हेडफोन घालून वॉक करीत नाहीत. त्यांचा भर गप्पा
आणि सहृदय हास्यात दडलेला पहायला मिळतो. आयुष्यात अनेक जबाबदाऱ्या निभावलेली आणि
नक्कीच यशस्वी रित्या पार पाडलेली ही मंडळी आता नक्कीच मनसोक्त आयुष्य एन्जॉय करीत
असावीत. त्यापैकीच एक आनंद ! मागील काही महिन्या पूर्वी या “आनंद” आणि माझी ओळख
झाली, हे सद्गृहस्थ वयाने , मानाने मोठे आहेत. आजच्या पिढीस वय, कर्तृत्व आणि मान
याचं फारसं सोयर-सूतक नाही, खूप प्रॅक्टिकल आहेत ही मंडळी. हा विषय थोडा वेगळा आहे
, यावर पुन्हा कधीतरी… तर,
“आनंद”, रेट्रो मूड मध्ये सुरात गाणी म्हणतं भेटेल नाही तर “काय मंडळी”, म्हणून हस्तांदोलन
करेल, प्रत्येक वेळी चेहऱ्यावरील अनमोल हास्य तुम्हास फ्रेश फील देईल.
आयुष्यात संकट येतच असतात,
दू:ख असतंच पण ते धरून बसून हाती काहीच लागत नाही. उलट त्यावर मात करून पुढे जात राहणं
ही मंडळी शिकवितात. हृदयाची स्पंदन ऐकावीत म्हणजे कळतं त्याचं महत्व,
त्यातील नाद-सप्तक अनुभवण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कळतं त्याचं
महत्व, त्याचा आनंद अनुभवला आणि तो इतरांसोबत वाटता आला कि
जमलं आपल्यालाही , असा निष्कर्ष काढता येऊ शकेल. “जिदंगी बडी
होनी चाहिये, लंबी नही”, हे वाक्यच
भरपूर काही सांगत. दुनिया में कितना गम है , मेरा गम कितना कम है , उस्ताद आनंद
बक्षी लिखित “अमृत (१९८६)” या चित्रपटातील हे गीत , जीवना कडे पाहण्याची नवी
दृष्टी देतं असे मी मानतो. स्वत:च्या
अडचणी, दू:ख कुरवाळत बसलो की ती मोठी वाटतात, पण जरा इतर व्यक्तींकडे पाहिलं, आजू-बाजूला
पाहिलं की लक्षात येईल आपल्याकडे असलेल्या दू:खा पेक्षा किती तरी मोठं दू:ख
इतरांकडे आहे. सोलापूरचं साहित्य वैभव कविश्री स्व. दत्ता हलसगीकर यांनी कवितेतून
दू:खाच स्वागत करावं असेच सांगितले, तुम्ही त्याला आपलसं केलं , नाही तर त्याने जायचे कुठे? असा सवाल
केला आहे. खरही आहे ते, दू:ख तो अपना साथी है !! प्रत्येक मनुष्याच्या जीवनात
दू:खास अनन्य साधारण असे महत्व आहे, किंबहुना दू:ख आहे म्हणून सुखाची किंमत आहे, नाही का?
आयुष्यावर प्रेम करा,
जेवढे शक्य आहे तेवढा आनंद इतरांना द्या, नाती,
मित्र जपा, स्वत:वर प्रेम करा, इतरांना प्रेम द्या , क्षणभंगुर अशा आयुष्यात दु:खास
कुरवाळत न बसता आनंद वाटत रहा हाच संदेश “आनंद” देतो. तुम्हालाही कुणी “मुरारीलाल”,
म्हणून हाक मारली तर नक्की “ओ” द्या आणि त्यास विचारा “कसा आहेस जयचंद ?”
अमित बाळकृष्ण कामतकर
ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता,
सॉफ्ट स्किल ट्रेनर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा