ads

फॉलोअर

जेन – “झी” आणि सत्तांतर ! त्या पलीकडे

 


सोशल मीडिया वापरण्यास परवानगी नाकारली हे अनेक कारणांपैकी एक निमित्त असू शकेल पण संपूर्ण देशाची खदखद तरुणाईने बाहेर काढली आणि चक्क सत्तान्तर करून दाखविले. हे सारं एवढं सहज साध्य होण्यासारख आहे असे वर-वर तर वाटत नाही पण घडलं तर तसचं आहे, सोशल मीडिया वापर करण्यावर बंदी आणली म्हणून पूर्ण सत्ता उलथविण्यात अग्रेसर असणारी Gen झी ! पूर्ण इलेक्ट्रोनिक , प्रिंट मिडियाने क्रेडिट याच पिढीस दिले आहे. प्रत्यक्षात भ्रष्टाचार, बेरोजगारी या प्रश्नाना त्रासलेल्या तरुण पिढीने बंड केले आणि सत्तांतर घडवून आणलं. सोशल मीडिया हे फक्त माध्यम नसून एक धारदार शस्त्र आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे हे मात्र नक्की.

मी माझ्या करिअर विषयक मार्गदर्शन सेशन मध्ये एक उदाहरण नेहमी देतो , पूर्वी जसे चांदीचा चमचा घेऊन जन्मला आलेला आहेस का? असे म्हंटलं जायचं अगदी तसेच १९९७-२०१२ मध्ये जन्मलेल्या पिढीस “गुगल स्पून” सोबत घेऊन जन्मलेली पिढी म्हणतो, विनोदाचा भाग सोडा, पण या पिढीस इंटरनेट वापर कसा करावा हे खास कुणास शिकवावं लागलं नाही. ही मंडळी त्यांना याचा वापर जसा हवा आहे तसा करण्यात निपुण आहेत. भ्रष्टाचार आणि त्यातून मिळालेल्या पैशाचा वापर करून अनेक नेते मंडळींची मुलं कशी चैनीचे आयुष्य जगत आहेत हे या पिढीस याच माध्यमातून समजलं आणि उठाव झाला असे सांगण्यात येते तसा विचार जरी केला तरी सत्तांतर घडणं यामागे कोणत्या शक्ति आहेत, त्याचे जगाच्या राजकारणात काय स्थान आहे? या मागे नक्की कोणती संस्था/ कोणते संघटन आहे? की अंतर्गत राजकीय इच्छाशक्ती या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं येणारा काळ देइल, पण अर्थात आजच्या लेखाचा तो भाग नाही. पण या घटनेमुळे जेन झी पुन्हा प्रकाशात आली. त्यांचं अस्तित्व यामुळे अधोरेखित झालं. या पिढीचे व्हिडीओ बाइट्स सांगतात की त्यांनी हा उठाव का केला? ज्यात प्रामुख्याने बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच दोन गोष्टींचा उल्लेख पहायला मिळतो. सरकार कुणाचं असाव? त्यांनी तरुणांसाठी काय कराव? यावर या पिढीने परखड मत व्यक्त करताना पाहण्यास मिळते. फक्त चोवीस तास सोशल मीडिया कुरवाळणारी युवा पिढी अशा पद्धतीने व्यक्त होईल यावर विश्वास ठेवणे थोड कठीण आहे. सोशल मीडिया मध्ये एखादी गोष्ट ट्रीगर केली जाते यासाठी काही मंडळी कार्यरत असतात.          

ही एक बाजू झाली, ज्यामध्ये भ्रष्टाचार, बेरोजगारी विरुद्ध केलेल्या बंडा विषयी आपण त्यांचं कौतुक करूया पण याची दुसरी बाजू जी जास्त भयानक वाटते ती म्हणजे मोबाईलचा होणारा अनियंत्रित वापर आणि त्यामुळे होणारे वाईट परिणाम. त्यात आता भर पडते आहे Ai ची. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी विठ्ठलास संबोधताना “जिथे जातो तिथे तू माझा सांगाती”, असे म्हंटले आहे , पण आता जिथे जिथे आपली नजर जाते तिथे आपल्याला एकच प्रकारच चित्र पहायला मिळतं , ते म्हणजे हातात मोबाइल आणि पटापट (अगदी क्षणार्धात) केलं जाणारं स्क्रोलींग. कामाच्या ठिकाणी कर्मचारी सायबरस्लॅकींग#1 मध्ये व्यस्त असतात त्यामुळे कर्मचारी वर्गाची उत्पादकता कमी होते. आरोग्याशी संबंधित तक्रारी हा अतिरिक्त पुरस्कार म्हणावा लागेल. विद्यार्थी मित्र मंडळी तर सगळीकडेच मोबाईलचा वापर करताना दिसतात. अर्थात हे सारं एका दिवसांत नाही घडलं, त्याची सुरुवात पालकांनीच केली, बाळ रडतं म्हणून , खात –पित नाही, शांत बसतं नाही आणि स्वत:ला फ्री राहायचं म्हणून या आणि अशा अनेक कारणांसाठी पालकांनी या पिढीस मोबाइल हे खेळणं म्हणून हातात दिलं आणि हेच खेळणं हातातून सुटतं आहे समजल्यावर बाळ रडतं आणि हट्ट पुरवून घेतं. सतत ऑनलाइन राहणं मानसिक अस्वास्थ्याकडे घेऊन जाणारं ठरेल, वेळीच काळजी घ्या, सतर्क रहा. “ब्रेन रॉट” हा शब्द प्रयोग ऑनलाइन जास्त वेळ घालवल्यामुळे एखाद्या व्यक्तीला होणाऱ्या मानसिक आणि भावनिक बिघाडाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. तो जनरेटीव ए आय मुळे आणखी वाढला आणि वाढत जाईल.             

          बेसुमार दर्जाहीन व्हिडीओ पण याची मोजदाद नाही होऊ शकत, वेळेचा प्रचंड अपव्यय आणि हे होताना , पालक हाताची घडी तोंडावर बोट ठेवून मुक संमती देतात. ही पालकांची चूक म्हणावी का? बरं दुसरी गोष्ट, स्वत:च्या देशाप्रती एवढी आपुलकी, देशसेवा करण्याची प्रचंड इच्छाशक्ती फक्त सोशल मिडियावरूनच मिळते असेही सिद्ध होते का? मानव्यशास्त्र आणि सामाजिक शास्त्र याची पूर्ण ओळख या पिढीस झालेली आहे असा निष्कर्ष काढला तर योग्य होईल काय? खर तर इतिहास, साहित्य, तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाज शास्त्र आणि अर्थशास्त्र या सारख्या विषयांचा यामध्ये अंतर्भाव आहे. शाळेत शिकविला जाणारा अतिशय दुर्लक्षित विषय सोशल सायन्स असतो, असे सर्व्हेक्षण सांगते. पण या पिढीस याची पूर्ण माहिती सोशल मिडियाच्या माध्यमातून मिळते . ती किती सत्य / असत्य कोण ठरविणार ? याचा पडताळा काय? त्यामुळे जे मिळतं, सापडतं तेच खर समजून वाटचाल धोकादायक ठरू शकते. कोणताही प्रश्न पडला तरी याचं उत्तर गुगल कडे आहे म्हणणारी ही मंडळी उद्या गुगल कडे याची उत्तरं नाही मिळाली तर काय करतील ? कोणाकडे जातील ? उत्तरं देण्यास पालक, शिक्षक सक्षम आहेत ? पाल्यास शाळेत घातलं, टयूषन क्लासेसची फी भरली की पालकांची भूमिका संपत नाही, त्यापलीकडे असणारी भूमिका पालकांनी समजून घेणे आवश्यक आहे. आपली मुलं आपलं ऐकतच नाहीत असे म्हणून वेळ निभावून नेणं कदाचित सोप असेल पण इतिहास तुम्हाला माफ नाही करणार, या पिढीतील मंडळी आपलं का ऐकत नाहीत? याचा विचार आपण करणार आहोत की नाही? यावर समुदेशन गरजेचे वाटतं मला, अर्थात दोघांचही समुदेशन गरजेचे पण भविष्याच्या दृष्टीने ही एक अतिआवश्यक प्रक्रिया आहे. या पिढीस पालक , शिक्षक म्हणून दिशा देणं कर्तव्य आहे, ते पूर्ण करायलाच हवं. 

हे लक्षात घ्याव, Ai माहिती देऊ करेल, ज्ञान नाही. माहिती ही एक प्रकारचा डेटा आहे, जो इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि तोच तुम्हाला दाखविला जाणार आहे. ज्ञान म्हणजे अनुभव, शिक्षण आणि समज यातून मिळालेली माहिती वापरण्याची क्षमता, ही क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहिलं तर चांगला विद्यार्थी घडेल, पर्यायाने उद्याचा नागरिक घडेल.         

 

#1- सायबरस्लॅकींग म्हणजे कर्मचारी त्यांच्या कामाच्या वेळेचा आणि कंपनीच्या संसाधनांचा वापर वैयक्तिक कामासाठी आणि कंपनीच्या कामाशी संबंधित नसलेल्या कामासाठी करतात. या मध्ये सोशल मिडियाचा वापर, ऑनलाइन खरेदी किंवा वैयक्तिक इ-मेल पाठवणे याचा समावेश असू शकतो.    

 

अमित बाळकृष्ण कामतकर

ब्लॉगर, लेखक, सल्लागार, व्याख्याता, सॉफ्ट स्किल ट्रेनर  


image source: Google Gemini


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

छावा

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

एआय शिक्षकांची जागा घेईल ?