सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड
जिथे आपल्या भावना अलगद
गुंतत जातात, तिथे नकळत एक नातं आकार घेतं. त्या
नात्याला श्वास घेण्यासाठी मनुष्याचंच अस्तित्व आवश्यक असतं असं नाही. कधी एखादी
निर्जीव वस्तूही आपल्या भावविश्वात स्थान मिळवते. तिच्याशी शब्दांविना संवाद साधला
जातो, आठवणी गुंफल्या जातात आणि हळूहळू ती आपल्या मनाचा एक
अविभाज्य भाग बनते. म्हणूनच भावनांना स्पर्श झाला की नातं निर्माण होणं अटळ
ठरतं—ते जिवंत असो वा निर्जीव, नातं मात्र तितकंच खरं असतं. आता
हेच पहा ना, १९२२ साली ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला एक पूल , त्याच्याशी एक
सोलापूरकर म्हणून काय नातं असू शकतं? म्हंटल तर काहीच नाही, अथवा अनेक आठवणी या
सोबत जोडलेल्या असू शकतात. सोलापूरकरांनी अनेक वेळा त्याचां वापर केला, पण कालपरत्वे
पूलाची कालमर्यादा संपली आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव पूल पाडावा लागणे साहजिकच
आहे. आता जमाना सोशल मिडियाचा आहे, या पुलाच्या कार्यकाळात म्हणजे १०३ वर्षात
त्यास जेवढी प्रसिद्धी मिळाली नसेल तेवढी प्रसिद्धी अवघ्या काही दिवसांत मिळाली.
तिथे पूल आहे, ज्याचा वापर आपण करीत आलो आहोत हे देखील सोशल मीडियाने अधोरेखित
केले. पूल पाडण्याच्या काही दिवस अगोदर तर हा पूल बांधणाऱ्या इंजिनिअर कॉंट्रॅक्टर
विषयी माहिती देखील प्रसारित झाली. जे १०३ वर्षात घडलं नाही ते शेवटच्या दिवसांत
घडलं ! कदाचित त्या कॉंट्रॅक्टरच्या घरच्या मंडळींना देखील मिळणाऱ्या प्रसिद्धी
विषयी कल्पना नसावी ! सारं काही अद्भुत ! पॉवर ऑफ सोशल मीडिया ! रील्स आणि पोस्टचा
impact दुसरं काय ?
प्रत्यक्षात
सोलापूर आणि अवती भवती अशा अनेक गोष्टी आपल्याला दिसतील ज्या इतिहासाची साक्ष देत उभ्या
आहेत. त्याची किती माहिती घेण्याचा, त्या जपण्याचा आपण प्रयत्न करतो आपण सगळे ? याचं
उत्तरं नकारात्मक आहे. उगाचच इतिहासाचा दुराभिमान का बाळगावा? खरे तर तो जपण्यात, त्याच्या
आधारे आयुष्यात पुढे जाण्यात खरा अभिमान आहे. पण पुरातत्व विभाग आहे,त्याचे काम आहे,
त्यांनी तो जोपासला, सांभाळला पाहिजे, या मतांचे आपण सारे, कसे काय इतिहास जमा गोष्टी
जपू ! दुसऱ्या कडे बोट दाखवून इतिहास जोपासता येणार नाही. अशा सोलापुरातील गोष्टी तुम्हाला
माहिती असतील तर नक्कीच कमेन्ट करा आणि सांगा की त्याची काळजी कशी घ्यावी ? एक जबाबदार
नागरिक म्हणून काय करणे अपेक्षित आहे? यावर व्यक्त व्हा, मग शासनाने काय करावे ? हे
पाहुयात.
नुसते
फोटो काढून आणि सोशल मिडियावर पोस्ट करून “अभिमानी” आहोत हे सांगण्यापेक्षा तो जपायला
शिकून कसा समृद्ध करता येईल या कडे लक्ष देऊया. तरच पुढच्या पिढीस खऱ्या अर्थाने समृद्ध वारसा देता
येईल.
लक्षात
असू द्या-
“इंटरनेट वर ट्रेंड होणं
म्हणजे – क्षणभर पेटलेली काडी
तेजस्वी दिसणारी पण अक्षय
उजेड न देणारी”
अमित बाळकृष्ण कामतकर


nice thought
उत्तर द्याहटवाछान लिहिलंय सर
उत्तर द्याहटवा