"बाबा" नावाचं आभाळ… आणि अपूर्ण राहिलेली एक प्रार्थना

 तुज मागतो मी आता’ या प्रार्थनेतून उमटलेली वेदना

२०११ च्या एप्रिल महिन्यापासून माझ्या मोबाईलचा रिंगटोन एकच होता — “तुज मागतो मी आता” हे भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेलं गणेशस्तवन, त्या सुरांमध्ये एक आर्तता आहे, एक शरणागत भाव आहे, आणि एक विश्वासही — की आपण जे काही मागू, ते बाप्पा ऐकेल. त्यावेळी जे काही मनोमन मागत होतो, ते गणरायाने दिलं नाही, ही भावना मात्र मनात घर करून बसली. पण खरी कसोटी तेव्हा लागली, जेव्हा बाबा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होते. आयसीयूच्या बाहेर उभं राहून मशीनचे आवाज ऐकणं, डॉक्टरांच्या चेहऱ्यावरून अंदाज बांधणं, आणि प्रत्येक क्षण आशा-निराशेच्या दोलायमान अवस्थेत काढणं — हे सगळं आयुष्य बदलून टाकणारं होतं. “बाबा” व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या छातीतून येणारा श्वास हा त्यांच्या स्वतःच्या इच्छाशक्तीचा नव्हता, तर एका मशीनच्या सहाय्याने चाललेला होता. त्या अवस्थेत मनात एकच मागणं होतं — “बाप्पा, बाबांना लवकर बरं कर. यातून बाहेर काढ.” ही प्रार्थना नव्हती, ही विनवणी होती; किंबहुना आर्त हाक होती.

वडिलांच्या आठवणीत गणपतीसमोर प्रार्थना करणारा मुलगा – भावनिक श्रद्धांजली

१० मे २०११ रोजी मी पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती येथे दर्शनाला गेलो. गर्दी होती, आरतीचा नाद घुमत होता, सुवासिक फुलांचा दरवळ पसरला होता. पण माझं मन मात्र कोसळलेलं होतं. गणरायांच्या चरणी माथा टेकवला आणि डोळ्यांतून अश्रूंचा पूर वाहू लागला. “हे देवा, माझ्या बाबांना वाचव. त्यांना अजून आमच्यासोबत राहू दे.” त्या क्षणी माझ्या प्रार्थनेत कोणताही स्वार्थ नव्हता, कोणतीही महत्त्वाकांक्षा नव्हती — फक्त एक मुलगा आपल्या वडिलांसाठी आयुष्य मागत होता. पण बाप्पास कदाचित हे मान्य नव्हतं करायचं ११ मे २०११ रोजी बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले.

त्या दिवशी वेळ थांबली. आयुष्य दोन भागांत विभागलं गेलं — “बाबा असताना” आणि “बाबा नसताना”. पंधरा वर्षं उलटली, तरीही ती जखम आजही ओली आहे. ‘काळ’ औषध असतो, असं म्हणतात; पण काही जखमा अशा असतात की त्या भरत नाहीत, फक्त आपण त्यांच्यासोबत जगायला शिकतो. आपली माणसं सोडून जातात, तेव्हा वेदना होणं स्वाभाविक आहे. पण “बाबा” जेव्हा सोडून जातात, तेव्हा त्या वेदनेला शब्दच सापडत नाहीत. “बाबा” ही दोन अक्षरं उच्चारायला जितकी सोपी, तितकीच त्यांच्या अर्थाने अथांग. “बाबा” म्हणजे मुलासाठी आभाळ. आभाळ कधी दिसत नाही, पण ते सतत असतं — डोक्यावर, पाठीशी, संरक्षण देणारं. ते सावली देतं, पावसात भिजवतं, उन्हात झाकून घेतं. आणि एके दिवशी तेच आभाळ नाहीसं झालं, तर? मग सगळं सूनं-सूनं वाटू लागतं.

बाबांनी आयुष्यात दिलेला आधार, पहिल्या अपयशावर दिलेला धीर — हे सगळं इतकं सहज होतं की त्याची किंमत कळलीच नाही. बाबा रागावायचे, शिस्त लावायचे, कधी कधी कठोरही व्हायचे. त्या वेळी वाटायचं, “बाबा इतके कडक का?” पण आज जाणवतं — त्या कठोरतेच्या आड अपरंपार प्रेम दडलेलं होतं. बाबा म्हणजे घराचा कणा. ते बोलले नाहीत तरी त्यांची उपस्थितीच आश्वासक असते. ते स्वतःच्या वेदना कधी व्यक्त करत नाहीत. त्यांच्या खांद्यावर किती जबाबदाऱ्या आहेत, किती चिंता आहेत, हे ते दाखवत नाहीत. कारण त्यांना माहित असतं — जर मी डगमगलो, तर सगळं घर डगमगेल.

माझ्यासाठी बाबा म्हणजे आत्मविश्वास. “तू करू शकतोस” म्हणत पाठीवर दिलेली थाप. आज जे काही थोडंफार उभं आहे, ते त्यांच्या कष्टांवर उभं आहे. त्यांनी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवून आमच्या स्वप्नांना प्राधान्य दिलं. बाबा गेल्यावरच त्यांच्या अस्तित्वाची खरी जाणीव झाली. घरात एखादी छोटीशी गोष्ट बिघडली, एखादा निर्णय घ्यायचा झाला, किंवा फक्त मन उदास झालं — तेव्हा सहज मनात येतं, “बाबांना विचारावं.” आणि लगेच जाणवतं — आता विचारायला कोणी नाही. हा रिकामेपणा असह्य असतो. अंत्यसंस्काराच्या वेळी लोक म्हणत होते, “धीर धरा.” पण धीर नेमका कुठून आणायचा? ज्यांनी धीर दिला, तेच नसताना? त्या दिवशी मला पहिल्यांदा “मोठं” व्हावं लागलं. घरातील जबाबदाऱ्या स्वीकारताना जाणवलं — बाबा असणं म्हणजे काय. त्यांच्या जागी उभं राहणं अशक्य आहे, पण त्यांच्या शिकवणीवर उभं राहणं आवश्यक असतं. कदाचित हेच काळ शिकवतो.

मला तर नेहमीच मनात प्रश्न येतो — बाप्पाने माझी प्रार्थना का ऐकली नाही? पण मग दुसऱ्याच क्षणी जाणवतं — कदाचित काही गोष्टी आपल्या हातात नसतात. कदाचित आयुष्याची लांबी आपल्या इच्छेवर ठरत नाही. पण त्या आयुष्यात त्यांनी जे दिलं, ते अमूल्य आहे. बाबांनी दिलेली मूल्यं, प्रामाणिकपणा, कष्टाची तयारी, आणि कुटुंबासाठी जगण्याची वृत्ती — हाच खरा त्यांचा वारसा आहे.  जो आपल्याला पुढे न्यायचा आहे.

आज पंधरा वर्षांनी मागे वळून पाहताना डोळ्यांत पाणी येतं, पण ओठांवर एक हलकीशी स्मितरेषा देखील येते. कारण त्यांच्या आठवणी वेदनादायी असल्या, तरी त्या उबदारही आहेत. त्यांचा आवाज, त्यांचं हसणं, त्यांच्या एखाद्या आवडत्या गाण्यावर ते देत असलेली दाद !, जुनी गाणी ऐकत असताना त्याची पडद्या मागची स्टोरी सांगणे  — हे सगळं मनात जिवंत आहे. ते शारीरिकदृष्ट्या  नसले, तरी त्यांच्या रूपानं माझ्यातला एक भाग कायम आहे.

बाबा” हा शब्द उच्चारताना अजूनही गळा दाटून येतो. कारण तो फक्त एक नात्याचा शब्द नाही; तो आधाराचा, सुरक्षिततेचा, नि:स्वार्थ प्रेमाचा प्रतीक आहे. “बाबा” म्हणजे आपल्या चुका पोटात घेणारा विशालपणा, आपल्या यशावर निःशब्द अभिमान बाळगणारा माणूस, आणि आपल्या अपयशावरही खंबीरपणे उभा राहणारा खांदा. आज जर ते असते, तर कदाचित माझ्या प्रत्येक यशावर त्यांनी कौतुकाने थोपटलं असतं. कदाचित माझ्या चुका दाखवून दिल्या असत्या. पण आयुष्याने वेगळा मार्ग निवडला. आता त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांची उपस्थिती शोधावी लागते. त्यांच्या शिकवणीत, त्यांच्या आठवणीत, आणि त्यांच्या आदर्शांमध्ये.

“बाबा” नावाचं आभाळ अचानक हरवलं, तेव्हा दुःखाला पारावार उरला नाही. पण त्या आभाळाखाली वाढलेलं रोपटं आता झाड व्हायचा प्रयत्न करत आहे. कारण बाबांनीच शिकवलं — परिस्थिती कितीही कठीण असली, तरी उभं राहायचं, पुढे चालत राहायचं. आजही कधी “तुज मागतो मी आता” हे स्तवन कानावर पडतं, तेव्हा हृदयात कळ उठते. त्या सुरांमध्ये माझी अपूर्ण प्रार्थना दडलेली आहे. पण त्याच वेळी त्या सुरांमध्ये बाबांची आठवणही आहे — कारण त्या दिवसांत, त्या आर्त क्षणांत, मी त्यांच्यासाठीच देवाला हाक मारली होती.

काळ पुढे सरकतो, आयुष्य पुढे नेतं; पण काही नाती काळाच्या पलीकडे असतात. “बाबा” त्यापैकीच एक.  ते गेले, पण त्यांनी दिलेली सावली अजूनही आहे — माझ्या विचारांत, माझ्या कृतीत, आणि माझ्या प्रत्येक श्वासात.

बाबा म्हणजे आभाळ. आणि आभाळ कधी खरंच नाहीसं होत नाही; ते फक्त आपल्या डोळ्यांना दिसेनासं होतं. त्यांच्या आठवणींच्या निळाईत मी आजही त्यांना शोधतो… आणि प्रत्येक वेळी मनात एकच शब्द उमटतो — “बाबा…”

 

अमित बाळकृष्ण कामतकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

तुम्ही शिक्षित की साक्षर ?

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर