कष्ट, सातत्य आणि समाधान—व्यवसायाची खरी कमाई
व्यवसाय आणि आपण स्वत: एक
वेगळच नातं तयार होते असे मी मानतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे पत्करता त्यास
कोणत्याही परिस्थिती मध्ये निभावता येणं आणि जमणं हे एक मोठ्ठं दिव्य असतं. अर्थात
या दिव्यातून जो यशस्वी पार पडतो त्यासच याचा आनंद घेता येतो. हा केवळ
उदरनिर्वाहाचा मार्ग नसतो, तर तो आपल्या अस्तित्वाचा,
आपल्या ओळखीचा एक अविभाज्य भाग बनून जातो. आपण ज्या गोष्टीची
मनापासून निवड करतो, जिच्यावर प्रेम करतो, त्या गोष्टीशी एकनिष्ठ राहणं हे केवळ कर्तव्य नसतं—ती एक साधना बनते. आणि
या साधनेतूनच खऱ्या अर्थाने समाधानाचा जन्म होतो. मागील २६ वर्षापासून व्यवसाय
करीत असताना अनेक प्रसंग असे आले कि आता थांबाव ! ब्रेक घ्यावा, दुसरं काहीतरी
पाहावं पण कामावर असणारी तुमची श्रद्धा, समर्पण तुम्हास एक जिद्द प्रदान करते आणि
पुन्हा नव्याने भरारी घेण्यासाठी पंख देते. अनेक वेळा तर प्रेरणा दूत बनून अनेक
मंडळी आली आणि त्यांनी मार्ग दाखविला, प्रोत्साहन दिलं, तुम्ही जे करत आहात
त्याचां सार्थ अभिमान आहे अशी कौतुकाची थाप पाठीवर दिली , ऊर्जा दिली. हे प्रेरणा
दूत अशावेळी प्रकट होतात जेंव्हा मन खचलेलं असतं, पुढे जाण्याची वाट धूसर असते आणि
प्रचंड नकरात्मकता पसरलेली असते. ही एक जादुच आहे असे मी मानतो.
२६ वर्षांच्या प्रवासात कोर्स
पूर्ण केलेले अनेक विद्यार्थी त्यांचे पालक भेटतात, महत्वाचे म्हणजे ओळख दाखवितात,
आजच्या पिढी मध्ये असे क्वचित घडते, पण यासही अपवाद आहेत, काही पालक आपुलकीने
चौकशी करतात, इंस्टीट्यूट मध्ये नवीन काही सुरू केले आहे का? या विषयी कुतुहलाने
विचारपूस करतात, हे सार काही एका दिवसात नाही घडलं, यासाठी अपार प्रामाणिक कष्ट,
कार्यालयीन कामकाजा साठी देण्यात येणारे संगणक शिक्षण, त्याचे प्रात्यक्षिक आणि
सर्वात महत्वाचे म्हणजे सातत्य ! नुकताच एक विद्यार्थी भेटला, त्याच्या सोबत छान
गप्पा रंगल्या, या गप्पातच त्याने प्रश्न केला, एवढी वर्षे, तोच नित्यक्रम, कधी
कंटाळा येत नाही का? रोज रोज तेच काम काय करायचं ? , रोज इंस्टीट्यूट, कोर्सचे
प्रशिक्षण !! मी थोडा अचंबित झालो, कारण
मला त्याच्या कडून असा प्रश्न अपेक्षित नव्हता.
नाही रे, अजिबात कंटाळा येत
नाही. हे बघ, एक साध समीकरण आहे, संचालक स्वयं-प्रेरित (Self
Motivated) असणे आवश्यक आहे. आपण स्वत:च motivated नसलो तर कोणीही येऊन हा भार उचलणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे आपण
ज्याचा स्विकार केला आहे, तो आनंदाने केला आहे, पूर्ण विचारांती केला आहे तर मग
त्या निर्णयाशी एकनिष्ठ राहणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे अजिबात कंटाळा नाही,
उलट आज काय आणि कसे नवीन करता येईल? काल केलेल्या गोष्टी आणखी उत्तम प्रकारे कशा
करता येतील याकडे लक्ष देऊन त्या उत्तम प्रकारे करणे याकडे ओढा असतो आणि तीच तर
खरी फ्री स्पेस आहे, जिथे आपण स्वत:ला आणखी समृद्ध करू शकतो. हे उत्तर काही
स्क्रिप्टेड नाही, अगदी वस्तुस्थिती आहे. हेच तत्व व्यवसायाच्या सुरुवाती पासून
सांभाळलेलं आहे. त्यावर विद्यार्थी म्हणाला, “ग्रेट !”, मी म्हणालो ग्रेट वगैरे
काही नाही रे , कर्म करणे आपल्या हातात आहे, त्यास चुकायचे नाही. शेवटी काय असतं, “जे तुम्हाला
आवडतं, जे तुम्हाला जमतं आणि ज्याची समाजास गरज आहे त्यासच करिअर म्हणतात.”
जवळपास २०-२२ वर्षा पूर्वी
विद्या कॉम्प्युटर्स, या माझ्या इंस्टीट्यूट मध्ये
शिक्षण घेतलेल्या महिला एका कार्यक्रमात भेटल्या, मी त्यांना नमस्कार केला आणि
म्हणालो, ओळखला का मॅडम? त्या म्हणाल्या हो, ओळखलं, पण आठवत नाही कुठे ओळख झाली,
मग मी त्यांना इंस्टीट्यूटचे नाव सांगितले, नाव ऐकताच त्यांचा चेहरा उजळला, आणि त्या
आनंदाने म्हणाल्या, सर, नमस्कार !! तुमच्या लक्षात आहे, मला खरच
आश्चर्य वाटतं आहे. त्या तेंव्हा नुकत्याच सोलापुरातील एका प्रतिष्ठित सहकारी
बँकेत नोकरीस लागल्या होत्या. संगणक वापर अनिवार्य असल्याने तेंव्हा कोर्स लावला
होता त्या कोर्स मध्ये घेतलेल्या ज्ञानाच्या जोरावर त्या आज बँकेत अधिकारी झाल्या
आहेत. केवढी मोठी उपलब्धी ! त्यांनी लागलीच इंस्टीट्यूट प्रति ऋण व्यक्त करीत
मन:पूर्वक धन्यवाद दिले. मी त्यांना इंस्टीट्यूटला भेट देण्याची विनंती केली.
जेंव्हा अशी मंडळी भेटतात आणि घेतलेल्या
ज्ञानाच्या जोरावर आयुष्यात मार्गक्रमण करीत आहेत याची पावती देतात, तेंव्हा खरचं
समाधान मिळतं. आणि हे समाधान पैशात मोजता येत नाही. कधी कधी प्रश्न पडतो की आपण २६
वर्षे झाली व्यवसाय करीत आहोत, काय साध्य केलं? काय कमावलं? हातात काय आपल्या, पण
अशी मंडळी भेटली की लक्षात येतं की आपण घेतलेले कष्ट सत्कर्मी लागलेले आहेत, लगेचच उत्तर समोर उभं राहतं—ही माणसं, त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम, आणि त्यांच्या डोळ्यांतील आदर. हीच खरी संपत्ती आहे. हे समाधान पैशात
मोजता येणार नाही, कारण ते मनात साठवलेलं असतं.
हे समाधान फार मोठं आहे.
त्यांच्या डोळ्यात आपल्या प्रति असणारा आदर, कौतुकाचा भाव हा आशीर्वादच देत असतो,
की चलते रहो.. आपला प्रवास योग्य दिशेने सुरू आहे. अर्थात समाधान मानण्यात असतं,
आपण किती समाधानी आहोत, याचं मोजमाप करणारं कोणतचं साधन अस्तित्वात नाही. शेवटी, समाधान हे बाहेर कुठे सापडत नाही—ते आपल्या दृष्टिकोनात असतं. आपण
केलेल्या कामात, दिलेल्या योगदानात, आणि
स्पर्श केलेल्या आयुष्यातच ते दडलेलं असतं. आणि म्हणूनच आजही मन एकच सांगतं—
“चालत
राहा… कारण हा प्रवास केवळ तुमचा नाही, तर अनेकांच्या
आयुष्याला प्रेरणा देणारा आहे.”, विद्या
कॉम्प्युटर्सचे ब्रीद ही हेच सांगतं, “विद्या परम् ध्येयम्”
अमित बाळकृष्ण कामतकर

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा