घुटमळलेलं मन

 

हॉस्पिटलच्या शांत कॉरिडॉरमध्ये आठवणींमध्ये हरवलेला एक व्यक्ती

        सकाळीच आठवणं झाली , तशी या साठी काही विशेष दिवस असे काही लागत नाही. साऱ्या गोष्टी डोळ्या समोर सहज तरळून जातात. सिनेमाच्या पडद्यावर जशा फ्लॅशबॅक स्वरूपात दाखवल्या जातात ना अगदी तशाच ! सारं काही कालच घडलं असं वाटतं, आपण हतबल होऊन फक्त वाट पाहत होतो पण नियतीला तिचा डाव साध्य करायचा होता तो तिने केला. मेंदूतील रक्तस्त्राव पूर्ण क्लिअर करणं खूप जटिल प्रक्रिया, त्यात झालेला रक्तस्त्राव क्लीन करे पर्यन्त नुकसान झालेल्या पेशी , त्यामुळे होणारे इतर परिणाम हे सारं खूप गुंतागुंतीच आहे. तरी सकाळी ऑपेरिटीव पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर म्हणाले, “खूप सहन केलं त्यांनी”, एक डॉक्टर हे म्हणतो याचा अर्थ त्या ऑपेरेटीवने होणाऱ्या वेदनांचा अंदाज त्यांना असतोच. एवढ्या वेदना सहन केल्या पण शुद्ध काही आली नाही.

            तो निर्जीव पांढराशुभ्र हॉस्पिटलचा कॉरिडॉर, औषधांचा उग्र वास, डॉक्टरांच्या चेहऱ्यावरचं गंभीर शांतत्व आणि आतून सतत धडधडणारं मन — आजही सगळं तितकंच जिवंत वाटतं. आपण बाहेर उभे, पूर्ण हतबल. हातात काहीच नसताना केवळ आशेचा एक धागा पकडून बसलेले. पण नियतीने तिचा डाव आधीच ठरवलेला असतो. मेंदूतील रक्तस्त्राव थांबवणं, पेशींना पुन्हा जिवंत करणं, जीवनाला परत वळण देणं — हे सगळं डॉक्टरांच्या हातात असलं तरी अंतिम निर्णय कुठल्यातरी अदृश्य शक्तीकडेच असतो, हे त्या दिवशी प्रकर्षाने जाणवलं. त्याच्याकडे विनवणी करायला गेलो पण त्याने माझा अर्ज साफ नामंजूर केला.

            पंधरा वर्षांचा कालखंड सरला आहे, पण आठवणींचा फेरा काही संपत नाही. कितीही तुमच्या कामात व्यस्त असा बॅक ऑफ द माइंड कुठे ना कुठे तो धागा असतोच, जो आपोआप सुटतो आणि आठवणींचा न संपणारा सारीपाटाचा खेळ सुरू होतो. आपण त्यात गुंतून जातो, कितीही प्रयत्न केले, काही केल्या तुमच्या विचारांवर तुमचा कंट्रोल राहत नाही. मग आपसूकच सारं कागदावर उतरतं आणि कुठेतरी मन मोकळं केल्याचं समाधान. अर्थात हे मानण्या पुरतचं, असो..

            खूप मोठा काळ लोटला आहे, स्मृती शेष असणाऱ्या गोष्टी वारंवार पुढ्यात येऊन उभ्या ठाकतात आणि आपण त्यात अडकतो, डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो, काही सापडतं का, भेट होईल का ? या भावनेने भ्रमण करतो. काही संवाद होईल का याचा अंदाज घेत राहतो. हाती काहीच लागत नाही पण उगाच वाटतं राहतं , पदरी पडलेल्या दु:ख, वेदनेने आपली निवड का केली? “दैव बलवत्तर म्हणून ..” हि म्हण आपल्यासाठी का लागू झाली नाही? सारे ग्रह एकाच वेळी आपल्यावर का रूसले? असे आणि अनेक प्रश्न डोक्यात पिंगा घालू लागतात, ज्याची उत्तरं आज पर्यन्त कधीच मिळाली नाहीत आणि मिळणारही नाहीत.       

            कदाचित काही वेदना या विसरण्यासाठी नसतातच. त्या आपल्यासोबत जगत राहतात — शांतपणे, शब्दांविना. आणि मग एखाद्या दिवशी त्या कागदावर उतरतात… मन हलकं करण्यासाठी नव्हे, तर त्या व्यक्तीचं अस्तित्व अजूनही आपल्या श्वासांत जिवंत आहे, याची स्वतःलाच जाणीव करून देण्यासाठी.

 

अमित बाळकृष्ण कामतकर


image: Gemini 

टिप्पण्या

  1. शब्द वाचताना डोळे नकळत पाणावले… काही वेदना खरंच आयुष्यभर सोबत चालत राहतात. इतक्या संवेदनशीलपणे भावना मांडल्याबद्दल मनापासून सलाम. 🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडून शिकायचे लाइफ स्किल्स