“निष्ठा” म्हणजे काय रे भाऊ ?
“पक्ष सोडू
शकता, पण विचार कसा सोडणार?” हा प्रश्न
आता भूतकाळात जमा झाला आहे. आज सकाळी एका पक्षाच्या विचारसरणीवर जीव ओवाळून
टाकणारा नेता संध्याकाळी थेट विरोधी विचारसरणीच्या मंचावर गळ्यात उपरणं टाकून
बसलेला दिसतो. त्यामुळे ‘निष्ठा’ नेमकी कशाशी असावी, हा
प्रश्न आजच्या मतदाराला पडला आहे. ती पक्षाच्या चिन्हाशी हवी, पक्षाच्या नेत्याशी हवी, की पक्षाच्या
ध्येय-धोरणांशी?
सध्याच्या राजकारणाकडे पाहिलं
तर उत्तर स्पष्ट मिळतं—नेत्यांची निष्ठा पक्षाशीही नाही, चिन्हाशीही नाही आणि जनतेशी तर अजिबात नाही. त्यांची निष्ठा आहे ती फक्त
आणि फक्त सत्ता, संपत्ती आणि स्वतःच्या राजकीय अस्तित्वाशी! मतदार
हा गृहितच धरला गेला आहे आज पर्यन्त !
पक्षाची नीतीमूल्ये आणि
ध्येय-धोरणे या पुस्तकात लिहायच्या गोष्टी उरल्या आहेत. आजच्या राजकारणात ‘विचारसरणी’ (Ideology) हा शब्द
फक्त निवडणुका जिंकण्यासाठी मतदारांना खेळवण्यापुरता वापरला जातो. सत्तेची समीकरणं
जुळवायची वेळ येते, तेव्हा सर्वच पक्ष एकाच माळेचे मणी
ठरतात.
हा खेळ पाहिल्यानंतर मला एक
प्रश्न पडतो, सामान्य जनता काय पाहून मतदान करते? पण विचार केला तर लक्षात येतं की हा सर्वात
गुंतागुंतीचा प्रश्न आहे. सामान्य जनता ही काही एकसंध नाही. मतदारांचे अनेक स्तर
आहेत आणि त्यानुसार त्यांची मतदानाची कारणे बदलतात:
1. भावभावनिकता आणि अस्मिता:
अनेकदा मतदार जात, धर्म, प्रादेशिक
अस्मिता किंवा एखाद्या त्याबद्दलची भावनिक सहानुभूती पाहून मतदान करतो.
2. थेट लाभार्थी राजकारण:
अलीकडच्या काळात 'फ्रीबीज' म्हणजेच
मोफत योजनांचा सुकाळ झाला आहे. महिन्याला खात्यात जमा होणारे पैसे किंवा मोफत रेशन
पाहून मतदान करणारा एक मोठा वर्ग तयार झाला आहे. काम करायला नकोच ! सारं काही
सरकारी तिजोरीतून थेट तुमच्या बँक खात्यात !
3. नेत्याची वैयक्तिक कामे:
आमदार किंवा खासदाराने आपल्या सुख-दुःखात केलेली मदत, मतदारसंघातील रस्त्यांची कामे पाहून मतदार मतदान करतो, मग तो नेता कोणत्याही पक्षात असो.
पण दुर्दैव असं की, जनतेने कोणत्याही अपेक्षेने मतदान केलं, तरी शेवटी
त्यांच्या हातात काय पडतं? त्यास काय मिळतं? पक्षाला मतदान की व्यक्तीला? हाच खरा पेच! भारतीय लोकशाहीत हा फार मोठा पेच आहे. आपण मतदान कुणाला करतो?
जर आपण पक्षाला आणि त्यांच्या
विचारसरणीला पाहून मतदान केलं, किंवा आपण व्यक्तीला
(नेत्याला) पाहून मतदान केलं, तर तो व्यक्ती सत्तेसाठी
पक्षाची चिन्हं आणि नावं बदलून स्वतःचा नवा गट स्थापन करतो. दोन्हीही परिस्थितीत मतदाराच्या
मताची किंमत शून्य ठरते. मतदान करते वेळी किंमत केलेली असेल तर यास काहीच अर्थ उरत
नाही.
देश पातळीवर मतदान करताना
: राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षा, खंबीर
नेतृत्व आणि देशाची आर्थिक प्रगती या मुद्द्यांवर मतदान होतं. इथे स्थानिक उमेदवार
कोण आहे, यापेक्षा देशाचा पंतप्रधान कोण होणार, याला महत्त्व दिलं जातं.
राज्य पातळीवर:
इथे स्थानिक अस्मिता, शेतीचे प्रश्न, बेरोजगारी, उद्योग आणि राज्याचं राजकारण कळीचं ठरतं.
शहर/स्थानिक पातळीवर:
इथे पक्ष आणि विचारसरणी गौण ठरते. इथे पाणी, रस्ते,
कचऱ्याची विल्हेवाट, आरोग्य आणि तुमच्या
गल्लीत धावून येणारा कार्यकर्ता महत्त्वाचा असतो.
पण आज शोकांतिका अशी आहे की, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सर्वच पातळ्यांवर राजकारणाचा दर्जा खालावला
आहे. सकाळी सुरू होणाऱ्या भोंग्या पासून ते न्यूज चॅनल वर जोर-जोरात गळे फाडणाऱ्या
सुस्थितीत (सत्तेत / पदावर) असणाऱ्या नेत्या
पर्यन्त सार काही नाटकीय भासतं. हे का असे सुरू आहे? कोण कोणास फसवत आहे? मला तर याच
एकच उत्तर वाटतं “सबसे बडा रुपय्या”, हेच त्रिवार सत्य आहे याची खात्री होते. ७९ वर्षे झाली स्वतंत्रता मिळून आजही मूलभूत
विषयांवरच निवडणूक लढवली जाते. आजही रस्ते, वीज, पाणी, ड्रेनेज, शासकीय नोकरी एवढंच
!
शेवटी, या चिखलात सर्वात जास्त नुकसान कोणाचे होत असेल, तर
ते सामान्य करदात्या मतदाराचे. आपण उन्हातानात रांगेत उभे राहून ज्याला निवडून
देतो, तो एसी गाडीत बसून कोट्यावधींच्या डील करतो. मतदाराने काय
करायचे तर फक्त “कर” भरायचा.
नेत्यांची निष्ठा जर फक्त
सत्तेशी असेल, तर मतदारानेही आपली निष्ठा कोणत्याही
पक्षाशी किंवा नेत्याशी ठेवता कामा नये. मतदाराची निष्ठा स्वतःच्या हक्कांवर,
आपल्या मुलांच्या भविष्यावर, कुटुंबावर यांनी देशावर असायला हवी. जोपर्यंत
मतदार नेत्यांना जाब विचारणार नाही, तो पर्यन्त 'निष्ठा कशाशी खातात?' या प्रश्नाचे उत्तर
नेत्यांच्या बँक खात्यातच शोधत राहावे लागेल.
आता वेळ आली आहे मतदारांनी डोळे उघण्याची ! कारण
तुमचं एक मत म्हणजे नेत्यांच्या सत्तेचा परवाना नाही, तर तुमच्या भविष्याचा अधिकार आहे!
अमित
बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टीप: संविधानात
तशी तरतूद आहे, म्हणूनच नेते मंडळी हे धाडस करू शकतात असा गळा कुणी फाडत असेल तर त्याच
संविधानाने एक भारतीय म्हणून काही निती मूल्ये , कर्तव्यं देखील दिली आहेत, ती, आपण एक
भारतीय म्हणून पाळतो का? हा प्रश्न नक्कीच अनुत्तरित राहतो.
Image source: Gemini

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा