सावरकरांविषयी बोलण्याआधी सावरकर वाचा

 

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र – भारतीय स्वातंत्र्यलढा, अंदमान कारागृहातील त्याग, राष्ट्रवाद आणि समाजसुधारणेचे प्रतीक.

सावरकर या नावाचे भारतीय इतिहासात एक वेगळे स्थान आहे. भारताचा इतिहास सावरकरां शिवाय लिहिलाच जाऊ शकत नाही. सावरकरांविषयी अनेकांना कुतूहल असतं, कुणी ते मान्य करतं कुणी ते नाही स्वीकारत, ज्याचा त्याचा प्रश्न पण सोशल मीडिया, इलेक्ट्रोनिक मीडिया वर सावरकरां विषयी निरर्थक कमेन्ट केली की ट्रेंड होतं हे नक्की ! प्रसिद्धी मिळते असे काही बालबुद्धी मानतात आणि तसे वागतात सुद्धा. देव त्यांचे भले करो. पण हे नक्की असतं की या सर्व बालबुद्धींनी सावरकर वाचलेले नसतात. सावरकर कोण आहेत याचा थोडाही अभ्यास या लोकांनी केलेला नसतो. फक्त कानोपकानी गोष्टी पसरविणे आणि चिखलफेक करणे एवढाच काय तो यांचा अजेंडा असतो.

            सावरकर कुण्या सोम्या- गोम्याला समजत नाही एवढं मात्र नक्की. कारण या सोम्या- गोम्यांच्या बुद्धीची तेवढी क्षमताच नसते. भारतीय स्वातंत्र्य सैनिक, सशस्त्र क्रांतीचे प्रणेते, विज्ञानवादी सावरकर, साहित्य प्रभू सावरकर, महाकवी सावरकर, समाजसुधारक सावरकर, क्रांतिवीर सावरकर, हिंदू हृदय सम्राट सावरकर, पत्रकार, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भाषा शुद्धीकरण, शब्द कोश देणारे सावरकर, श्रुती-स्मृती, पुराणोक्त पुढील सावरकर, मराठीला समृद्ध करण्यास महत्वाचे योगदान देणारे सावरकर, देशासाठी ११ वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा भोगणारे सावरकर आणि त्या नंतर स्थान बद्धते मध्ये शिक्षा भोगत देशासाठी कार्यरत राहिलेले सावरकर, आपण स्वत:ला एक प्रश्न विचारावा की या पैकी कोणते सावरकर मला माहिती आहेत? जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर तुमच्या बुद्धीची मुक्ताफळं का बरे उधळता ?

            आजच्या तंत्रज्ञान युगात चिंता, नैराश्य हे दोन रोग अनेक तरुणांना जडले आहेत, असे सर्व्हेक्षण सांगतं. काय कारणं असावीत याचा विचार केला तर अनेक धक्कादायक संशोधनं पुढे येत आहेत. सावरकरांना अंदमान सेल्यूलर कारागृहात जिथे ठेवण्यात आले होते तिथे त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. कठोर शिक्षा, सश्रम कारावास असल्याने नैराश्य येऊन काहीही होऊ शकले असते. पण अशा कठीण परिस्थित देखील सावरकरांनी कोठडीत दहा हजार ओळींचे काव्य रचले. सर्वात महत्वाचे हे सारं त्यांना नंतरही मुखोद्गत होते. केवढी ही स्मरण शक्ति! संगणकीय भाषेत बोलायचे झाले तर सुपर कम्प्यूटिंगला देखील लाजवेल अशीच मेमरी म्हणावी लागेल. काही निलाजरे साक्षर आहेत ज्याना शिक्षेतील विदारकता, एकल कोंडले पणा म्हणजे काय? तो त्यांना समजूनच घ्यायचा नसतो. त्यांना एकच सांगण आहे, फार काही नाही एक तास अंधाऱ्या खोलीत एकट्याने वेळ व्यतित करून पहा, हा छोटासा प्रयत्न असेल , पहा सावरकर समजतात का ते..

            घराची राख रांगोळी होणे म्हणजे काय? ते सावरकर यांच्याकडे पाहिले तर लक्षात येईल. देश स्वतंत्र होण्यासाठी संपूर्ण परिवाराने सर्वस्व सुखाचा त्याग केला, त्यांच्या वाट्याला काय आले तर उपेक्षा ! देश पारतंत्र्यात असताना देखील आणि स्वतंत्र झाल्या नंतर देखील, इतके का आपण करंटे आहोत, कृतघ्न आहोत, संपूर्ण परिवाराने केलेल्या त्यागाची काहीच किंमत नाही?       

सावरकरांविषयी मतभेद असू शकतात, त्यांच्या विचारांशी सहमती-असहमती असू शकते; परंतु त्यांच्या राष्ट्रकार्यास, त्यागास आणि विलक्षण प्रतिभेला नाकारणे म्हणजे इतिहासाकडे डोळेझाक करण्यासारखे आहे. एखाद्या व्यक्तीचे मूल्यमापन करताना त्याच्या संपूर्ण आयुष्याचा, त्याच्या काळाचा आणि त्याने उभ्या केलेल्या कार्याचा विचार करावा लागतो. दुर्दैवाने आज अनेक जण काही तुटपुंज्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढतात आणि समाजमाध्यमांच्या गोंगाटात सत्याचा आवाज हरवून बसतो.

सावरकर हे केवळ एका राजकीय विचारसरणीचे प्रतिनिधी नव्हते, तर ते एक युगद्रष्टे होते. राष्ट्रभक्ती, सामाजिक समता, विज्ञाननिष्ठा आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचा त्यांनी सातत्याने पुरस्कार केला. अस्पृश्यता निर्मूलनासाठी त्यांनी केलेले प्रयत्न, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून समाजाला दिलेला समतेचा संदेश आणि अंधश्रद्धांविरुद्ध घेतलेली भूमिका यांचा उल्लेख अनेकदा जाणीवपूर्वक टाळला जातो. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व्याप्ती इतकी मोठी आहे की त्यांना एका चौकटीत किंवा एका विशेषणात बंदिस्त करणे अशक्य आहे.

इतिहास हा भावनांपेक्षा तथ्यांवर उभा असतो. त्यामुळे सावरकरांविषयी बोलताना किंवा लिहिताना अभ्यास, संदर्भ आणि वस्तुनिष्ठता आवश्यक आहे. केवळ टीका करण्यासाठी टीका किंवा स्तुती करण्यासाठी स्तुती यापैकी कोणताही मार्ग इतिहासाला न्याय देत नाही. सावरकरांना समजून घ्यायचे असेल तर त्यांच्या लेखनाचा, भाषणांचा, कवितांचा आणि त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा अभ्यास करावा लागेल.

राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सावरकरां विषयी कृतज्ञता बाळगणे ही कोणत्याही सुसंस्कृत समाजाची ओळख असण्यास कोणासही हरकत नसावी. मतभेद असोत, पण त्यागाचा सन्मान आणि इतिहासाचा आदर राखणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. कारण राष्ट्रनिर्मितीच्या महान यज्ञात स्वतःचे आयुष्य समिधा म्हणून अर्पण करणाऱ्या व्यक्तींचे स्मरण हीच त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरते.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर

 

महत्वाची टीप: व्यक्त होण्या अगोदर लेख पूर्ण वाचावा. असंस्कृत कमेन्ट करणे हा काही विशेष अधिकार नाही आणि कुण्या एकाच समाजाला प्राप्त नाही. हे लक्षात असू द्यावे.  

image source: Gemini


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड