वाणीची जादू- संवादातून जिंकली मनं

 

पर्यटन व्यवसायातील संवाद कौशल्याचे महत्त्व स्पष्ट करणारे आरू मोघन यांचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व

माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. परंतु समाजात राहण्यासाठी केवळ ज्ञान, पदवी किंवा संपत्ती पुरेशी नसते; माणसाला माणसांशी जोडून ठेवणारा जो अदृश्य धागा असतो, तो आहे – संवाद. विचार, भावना, अनुभव आणि अपेक्षा यांची देवाणघेवाण करण्याची कला म्हणजे संवाद. आणि ही कला जितकी प्रभावी, तितके व्यक्तिमत्त्व अधिक आकर्षक आणि यशस्वी बनते.

संवाद हा केवळ बोलण्यापुरता मर्यादित नसतो. योग्य शब्दांची निवड, ऐकण्याची क्षमता, चेहऱ्यावरील भाव, शरीरभाषा (देहबोली) आणि समोरील व्यक्तीच्या भावनांचा आदर यांचा समन्वय म्हणजे प्रभावी संवाद. अनेकदा एखाद्या व्यक्तीचे ज्ञान अफाट असते, पण ते योग्य पद्धतीने मांडता येत नसल्याने त्याला अपेक्षित यश मिळत नाही. उलट काही व्यक्ती आपल्या प्रभावी संवाद शैलीमुळे लोकांच्या मनात सहज स्थान निर्माण करतात.

            व्यवसाय करीत असताना संवाद कौशल्य महत्वाचेच आहे. तुमचा व्यवसाय तुम्हाला घडवतो, शिकवतो, व्यवसायात तुमचे समर्पण असायला हवे ही एकच अट यामागे असते. ज्याच्याकडे हे समर्पण असतं तो व्यक्ति अनेक गोष्टी लीलया करतो आणि त्यात यशस्वी होतो. याचे अनेक दाखले देता येतील. तर व्यवसाय करीत असताना ग्राहक महत्वाचा, त्यास केंद्र स्थानी मानून तुम्हाला मार्गक्रमण करणे अनिवार्य असतं, “कस्टमर इज किंग” असं नुसतं म्हणणं आणि त्यानुसार त्यास वागणूक देणे यात फरक असतो. असेच एक क्षेत्र आहे ज्यामध्ये संवाद कौशल्यास अनन्य साधारण महत्व आहे, ते म्हणजे टुरिझम, या व्यवसायात तर तुमची “वाणी” तुमचे निम्मे काम करते.

            नुकतेच एका हरहुन्नरी व्यक्तीला भेटण्याची संधी मिळाली, ज्यास ‘वक्तृत्व’ हे देवाने देणगी स्वरूपात दिले आहे. कुणी मनापासून बोलतं, कुणी बुद्धी वादी बोलतं तर काही जण पोटातून बोलतात. म्हणजे त्यांच्या बोलण्यावर त्यांचे दोन वेळेचे अन्न त्यांना मिळते. याची जाणीव ठेवून बोलताना चेहरा सारं  सांगत असतो. तो फक्त वाचता यायला हवा. यांची देहबोली देखील बरच काही सांगते, ‘टुरिस्ट गाईड’ म्हणून जी माहिती ही मंडळी पुरवितात ती शक्यतो त्यांच्या स्थानिक अभ्यासा नुसार, दंतकथा,  प्रचलीत माहिती नुसार आणि पिढ्यान पिढ्या त्यांना मिळत आलेल्या संस्कारावर अवलंबून असते. मला वाटतं ही मंडळी त्यांच्याकडील माहिती, आजच्या तंत्रज्ञान भाषेत सांगायच झालं तर ‘गुगल’ मनापासून जपत, सांभाळत त्यात कालानुरूप बदल करत वारसा जपतात, अगदी तिसरी / चवथी पिढी याच व्यवसायात कार्यरत आहे हे अभिमानाने सांगायला ही मंडळी विसरत नाहीत. “आरू मोघन”, असाच एक व्यावसायिक !

            आरू ने अवघ्या पाच मिनिटाच्या माहिती वजा संवादात उपस्थित सर्वांची मने जिंकली. त्याच्या वाणीत स्थानिक पर्यटन विषयक आपुलकी, पर्यटक हा त्याचा ग्राहक आहे आणि त्यावरच त्याचे घरदार चालते ही श्रद्धा, समाज माध्यमाचे भान, सोशल मीडियावर ट्रेंड होणाऱ्या गोष्टी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे देशप्रेम ! ते पर्यटकांनी देखील कसे जपावे याचा वस्तूपाठ त्याने उत्तम संवाद कौशल्याच्या आधारे आम्हा सर्वांपर्यंत पोहोचविला. सशस्त्र क्रांतीच्या आधारे देश स्वतंत्र करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे भारतीय आणि त्यांचे विषयी आदराची भावना त्याच्या बोलण्यात सतत दिसत होती. अर्थातच ठिकाण एव्हाना तुम्हाला समजलं असेल, श्री विजय पुरम् (जुने नाव – पोर्ट ब्लेअर). स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विषयी त्याच्या मनातील आदर त्याने उत्तम आणि प्रभावी शब्दात व्यक्त केला. त्याच्या पूर्वजांनी सावरकर पाहिलेले, त्यांचं तेज , बुलंद आवाज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दोन जन्मठेप होऊन देखील व्यथित न होता जपलेला कणखर बाणा. सावरकरांनी हाल-अपेष्टा सहन केल्या म्हणूनच आपण आज स्वत:ला स्वतंत्र म्हणवतो आहोत, अशी कृतज्ञता व्यक्त करण्यास तो विसरला नाही.

            व्यवसाय करताना ग्राहकास खुश ठेवावे असा नियम जरी असला तरी देहबोली, विचार आणि त्या अनुषंगाने आचार , वाणीतून मनाला भिडणारे आणि आपलेसे करणाऱ्या शब्दांची त्याच्याकडे वानवा नव्हती हे नक्की.              

आजच्या डिजिटल युगात संवादाचे स्वरूप बदलले असले तरी त्याचे महत्त्व कमी झालेले नाही. ई-मेल, सोशल मीडिया, ऑनलाइन मिटिंग्ज आणि व्हर्च्युअल संवाद यामध्येही स्पष्टता, सभ्यता आणि परिणामकारकता आवश्यक आहे. एका चुकीच्या संदेशामुळे प्रतिमा खराब होऊ शकते, तर एका सकारात्मक संवादामुळे नवीन संधींची दारे उघडू शकतात.

संवाद कौशल्य महत्वाचे आहे, हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहेच. काही मंडळी विशेष प्रयत्न करून त्याचे संवर्धन करतात, आजकाल याचे विशेष क्लासेस देखील घेतले जातात. संवाद कौशल्य ही सातत्यपूर्ण सरावातून विकसित होणारी कला आहे. चांगले वाचन, सक्रिय ऐकणे, आत्मपरीक्षण आणि नियमित संभाषण यांमधून ही क्षमता अधिक परिपक्व होते. संवादाचा उद्देश केवळ बोलणे नसून, समोरच्याच्या मनापर्यंत पोहोचणे हा असतो.

ज्ञान माणसाला सक्षम बनवते; पण संवाद कौशल्य त्या ज्ञानाला प्रभावशाली बनवते. सामान्य जीवनातील नाती असोत किंवा व्यवसायातील यशाची शिखरे, प्रत्येक ठिकाणी संवाद हीच प्रगतीची वाट उजळणारी दीपशिखा आहे. म्हणूनच संवाद कौशल्य ही केवळ एक कला नसून, व्यक्तिमत्त्व घडवणारी आणि यशाकडे नेणारी सुवर्णकिल्ली आहे. आरू मोघन ने हे नक्की जाणलं आहे आणि त्याने याचा वस्तूपाठ कृतीतून शिकवला असेच मी म्हणेन.

 

अमित बाळकृष्ण कामतकर

सोलापूर  

टीप: श्री विजय पुरम् येथून नेताजी सुभाषचंद्र बोस बेटाकडे आरू मोघनच्या बोटीतून जाता येईल. तिथे त्याची भेट नक्की होईल.

फोटोत- आरू मोघन


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

डिजिटल लीडरशिपकडे वाटचाल करणारे सोलापूर

सोलापूरचा १०३ वर्षांचा पूल : इतिहास, भावना आणि सोशल मिडियाचा ट्रेंड