ओपन माईक- अतिथी लेख
बांगलादेश,
पाक दहशतवाद्यांचे ‘सेकंड होम’
- अनियंत्रीत
झाली ‘कालकेय’ ची सेना
नितीन फलटणकर
काही वर्षांपूर्वी
बाहूबली नावाचा एक चित्रपट आला होता. या चित्रपटाने लोकांना अक्षरशः वेडे केले
होते. या चित्रपटातील अमरेंद्र आणि महेंद्र बाहुबली अर्थात मुख्य नायकाचे कॅरेक्टर
प्रचंड गाजले. सोबतच यातील पहिल्या भागातील अत्यंत क्रूर दाखवलेला व्हिलन ‘कालकेय’
या कॅरेक्टरनेही लोकांच्या मनात घर केले होते. यात त्याला अत्यंत क्रूर आणि
विक्राळ दाखवले आहे. त्याचे सैन्य जिथे जाते तिथे मुलं,
महिला, पुरुष, वृद्ध
काही न पहाता सरळ त्यांना क्रूरपणे मारताना दाखवलेत. अशीच अवस्था सध्या
बांगलादेशाची झालीय. कट्टरतेच्या नावाखाली सुरु असलेल्या नंगानाचाने क्रूरतेची
परिसीमाच ओलांडली आहे. युनूस नावाच्या कालकेयच्या सेनेने दिसेल त्याला मारहाण करत
त्यांची हत्या करण्याचा सपाटाच लावला आहे.
गुरुवारी बांगलादेशचा
कट्टरनेता उस्मान हादी याच्या मृत्यूनंतर बांगलादेशात एका हिंदू युवकाला भरचौकात फाशीवर
चढवण्यात आले आणि त्याला तसेच जिवंत जाळण्यात आले. उपस्थित तरुण इतके आक्रमक झाले
होते की त्यांनी बांगलादेशातील दोन मोठ्या मीडिया हाऊसलाही आग लावली. इतकेच नाही
तर ढाक्यात एका मोठ्या दैनिकाच्या संपादकालाही रस्त्यावर नेत मारहाण करण्यात आली.
या घडामोडी बांगलादेश सर्वनाशाकडे नेत असल्याचे स्पष्ट करतात.
मागील काही दिवसांपासून
बांगलादेशच्या बातम्या येत आहेत. भारता विरोधी घोषणा,
हिंदू अल्पसंख्यांकांवर हल्ला, त्यांची घरं
पेटवली. भारताला तोडण्याची भाषा वगैरे-वगैरे. यावरून बिथरलेल्या पाकिस्तानने
बांगलादेशातील कट्टरपंथी बावळट जनतेला आपल्या जाळ्यात ओढण्यास सुरुवात केली आहे हे
स्पष्ट होते.
एकीकडे अफगाण पठाण, दुसरीकडे बलुचिस्तानचे बंडखोर तिसरीकडे इम्रानखानचे समर्थक आणि चौथीकडे स्वतंत्र सिंधू देशाची मागणी असा चौरंग झाल्यावरही पाकची खुमखुमी काही कमी होताना दिसत नाही.
पहेलगाव हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने केलेले सर्जिकल स्ट्राईक, सिंदुर ऑपरेशनने पाकिस्तानची बोबडी चांगलीच वळली आहे. याचाच एक भाग म्हणून भारतात एखादा दहशतवादी हल्ला झालाच तर पाक ऐवजी भारताने बांगलादेशवर हल्ला करावा व जागतिक पातळीवर भारताची छी-थू व्हावी असा पाकच्या बालिश नेतृत्वाचा डाव आहे. सुदैवाने भारतीय नेतृत्व व लष्कर अत्यंत परिपक्व व जबाबदार आहे. त्यामुळे पाकिस्तान असो अथवा बांगलादेश किंवा दोघांच्याही एकदाच मुसक्या आवळायला आपल्याला फारसा वेळ लागणार नाही.
काही वर्षांपूर्वी पाकिस्तानने
अफगाणिस्तान आणि तालिबानी दहशतवाद्यांचा असाच वापर करून घेतला. आता त्यांना याची
उपरती झाल्यानंतर ते पाकिस्तान विरोधी झाले आहेत.
पण अलीकडील काळात
बांगलादेश संदर्भात काही घडलेल्या घटना गंभीर आणि चिंताजनक अशा आहेत. बांगलादेशात
शेख हसीना यांच्या विरोधात कट करून युनूस सरकार सत्तेवर आले. त्यानंतर हा
घटनांमध्ये आणि भारत विरोधी कारवायांमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे.
ढाक्यातील संशयास्पद मृत्यू :
आंतरराष्ट्रीय गुप्तचर संघर्ष?
मोदी आणि रशियाचे
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकत्र अंतरराष्ट्रीय मंचावर अनेक जागतिक
नेत्यांसमवेत एकत्र असताना ढाक्यातील वेस्टिन हॉटेलमध्ये (Westin
Hotel, Dhaka) टेरेन्स अर्वेल जॅक्सन (Terrence Arvelle
Jackson) या अमेरिकन नागरिकाचा मृत्यू झाला. अधिकृतरीत्या तो
अमेरिकन सैन्याशी संबंधित नसल्याचे सांगण्यात आले असले, तरी
विविध आंतरराष्ट्रीय विश्लेषक आणि सोशल मीडिया चर्चांमध्ये तो सीआयएशी संलग्न
गुप्तचर एजंट असल्याचा आरोप करण्यात आला.
या चर्चांनुसार,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील कटाशी त्याचा संबंध होता,
तसेच रशियन गुप्तचर यंत्रणेच्या (केजीबी) हस्तक्षेपामुळे त्याचा अंत
झाला, अशीही कुजबुज आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. हे दावे
अधिकृतरीत्या सिद्ध नसले, तरी या घटनेने बांगलादेशातील गुप्त
हालचालींचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. यानंतरच भारत आणि रशिया अर्थात मोदी आणि
पुतिन अधिक निकट आले.
सेव्हन सिस्टर्स’ तोडण्याची धमकी
या पार्श्वभूमीवर
बांगलादेशातील नॅशनल सिटिझन पार्टीशी संबंधित नेता हसनत अब्दुल्ला,
, याने भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांबाबत (“सेव्हन सिस्टर्स”)
विभाजनाची भाषा वापरली. हा नेता यापूर्वीही कट्टर इस्लामी विचारसरणीशी जवळीक
दाखवणाऱ्या गटांशी संबंधित राहिला आहे.त्याची ही वक्तव्ये केवळ उन्मादी नसून,
पाकिस्तानच्या आयएसआयच्या जुन्या धोरणाशी साधर्म्य दाखवणारी आहेत.
भारताच्या अंतर्गत अस्थिरतेवर भर देण्याची नीती अवलंबायची आणि भारतीय सुरक्षा
व्यवस्था धोक्यात आणायची असा तो डाव.
युनूस सरकार आणि वाढता कट्टर प्रभाव
सत्ताबदलानंतर आलेल्या
युनूस सरकारवर कट्टरवादी आणि पाकिस्तानसमर्थक शक्तींचा प्रभाव वाढल्याचे आरोप होत
आहेत. जमात-ए-इस्लामीसारख्या संघटनांना मिळणारी मोकळीक,
भारतविरोधी निदर्शनांना मिळणारा अप्रत्यक्ष पाठिंबा आणि निष्क्रिय
प्रशासन हे सर्व बांगलादेशला स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणारे ठरत आहे. यातच
मागील काही दिवसांपासून पाकच्या दहशतवादी संघटनांचे म्होरके आणि आयएसआयचे एजंट
बांगलादेशमध्ये गुपचूप बैठका घेत असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांनी हेरले आहे.
बांगलादेश ‘सेकंड फ्रंट’
भारतातील सर्जिकल
स्ट्राइकनंतर थेट संघर्ष टाळणाऱ्या पाकिस्तानने आयएसआयमार्फत बांगलादेशात तळ
ठोकल्याची चर्चा आहे. भारतविरोधी नेटवर्क, कट्टर
गटांना चिथावणी आणि राजकीय अस्थिरता निर्माण करणे हा त्यामागचा स्पष्ट अजेंडा
मानला जातो. यातच देशात फिल्ड मार्शल मुल्ला मुनीर आणि पंतप्रधान शहाबाज शरीफ
यांचा विरोध वाढत आहे. गरज पडली तर पाकिस्तानातून अर्ध्या रात्री हे दोनही नेते
बांगलादेशला पलायन करू शकतात. कारण इतर देशांमध्ये पाकचा खरा चेहरा उघड पडल्याने
अझरबैजान, तुर्की, सौदी अरब असे
मुस्लीम देश वगळता इतर कोणताही देश या दोघांना ऐनवेळी देशप्रवेश देईल याची शक्यता
तशी कमीच आहे.
बांगलादेशच्या स्वातंत्र्यामागील भारताची निर्णायक भूमिका
- १९७१ मध्ये एक कोटी
निर्वासित भारतात- पाकिस्तानच्या लष्करी कारवाईनंतर सुमारे एक कोटी बांगलादेशी
निर्वासितांनी भारतात आश्रय घेतला. भारताने अन्न, निवारा व
वैद्यकीय मदत दिली.
- मुक्तीबहिनीला भारताचे
प्रशिक्षण- भारतीय लष्कराने मुक्तीबहिनीच्या हजारो जवानांना शस्त्रसज्ज प्रशिक्षण
व रणनितीचे मार्गदर्शन केले.
- गुप्तचर मदतीची
महत्त्वाची भूमिका- भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी हालचालींबाबत
मुक्तीवाहिनीला माहिती पुरवली.
- १३ दिवसांत निर्णायक
युद्ध- डिसेंबर १९७१ मध्ये भारत–पाकिस्तान युद्ध फक्त १३ दिवसांत संपले आणि
पाकिस्तानचा पराभव झाला.
- ९३,०००
पाकिस्तानी सैनिकांची शरणागती- १६ डिसेंबर १९७१ रोजी ढाक्यात पाकिस्तानच्या ९३,००० सैनिकांनी शरणागती पत्करली. इतिहासातील सर्वात मोठी लष्करी शरणागती.
- नितीन फलटणकर

आभार 🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर, आपण आपला लेख ब्लॉगवर प्रकाशित करण्यास अनुमती दिली.
उत्तर द्याहटवा