फॉलोअर



प्रारब्ध
          श्रद्धा आणि अंधश्रद्धा या बद्दल मी माझ मत मांडावे एवढा मी काही तज्ञ नाही अथवा तसा माझा व्यासंग हि नाही पण अनुभवातून जे शिकलो ते फक्त मांडण्याचा प्रयत्न करतोय एवढच ! श्रद्धा असावीच मग ती आपल्याला जीवनमूल्य देणाऱ्या गुरुवर असेल अथवा ज्या देवास (परमोच्च शक्ती) आपण मानतो त्याच्या बद्दल असावीच या मताचा मी आहे.  अर्थात देवाच अस्तित्व ज्यांनी मान्य केल आहे त्यांनाच माझे मत मान्य होईल यात शंका नाही.पण ज्या थोर शास्त्रज्ञांनी अणु मधून परमाणु शोधून काढला आणि त्यांच्या लक्षात आल कि त्यापुढेही एक शक्ती आहे , अर्थात ती शक्ती म्हणजेच देव ! या देवाला आपण जाती धर्माच्या चौकटीत कैद केल आणि मग जे चालु आहे त्या बद्दल न बोललेलच बर ! माझा हा मुद्दा नाहीच पण विश्वास जेंव्हा आपण ठेवतो तेंव्हा तिथेच किंतु-परंतु ला पूर्ण विराम दिलेला असतो हे बाकी खरे !!
          १० में माझा वाढदिवस, बाबा जहांगीर हॉस्पिटल येथे ब्रेन हेमोरेज झाल्याने एडमिट होते त्यामुळे आम्ही पुण्यात होतो. मी आणि माझी बहिण आशु ने ठरवल कि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच दर्शन घ्यायचं आणि मग हॉस्पिटल ला जायचं. आम्ही गणपतीच दर्शन घ्यायला मंदिरात पोहोचलो आणि मी धरून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला, असे वाटले कि घरातील ज्येष्ठ व्यक्तीला गाऱ्हाण सांगायला आलो आहे आणि श्री गणेश घरातील ज्येष्ठ !! मी तसाच श्री. गणेशास “बाबांना बर कर” त्यांना जीवनदान दे म्हणून “याचना” करू लागलो आणि म्हणालो “मी जे काही पुण्यकर्म केले असेल त्याच फळ माझ्या बाबांना दे, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे !! दर्शन घेतल्यानंतर मी आणि आशु हॉस्पिटल मध्ये पोहोचलो, डॉक्टरांनी विषय थोडा सिरिअस आहे असच सांगितल आम्ही वाट पहात होतो पण आशा सोडली नव्हती, काहीतरी चमत्कार होईल आणि खरच काहीतरी घडेल....या विचारात १० में दिवस संपला !!!!     
          ११ में ला सकाळी हॉस्पिटल ला जाण्याच्या अगोदर आईला कुणीतरी सांगितल होत,काही गोष्टी करायला (अर्थात वैद्यकीय सोडून) त्या गोष्टी केल्यास फरक पडेल, गुण येईल ..... शेवटी अंतिम ध्येय, बाबा बरे व्हावेत हेच असल्याने आम्ही ते हि करून पाहू म्हणालो आणि आम्ही हॉस्पिटल गाठलं !! आयसीयू मध्ये स्वच्छता सुरु असल्याने थोडा वेळ थांबाव लागल, आम्ही आत गेलो, बाबा शांत झोपलेले, कुठलीही हालचाल नाही, पण तरीही प्रचंड विश्वासाने आईने त्या गोष्टी केल्या आणि शेवटी आईने “अंगारा” काढला आणि तो बाबांच्या मस्तकास लावला, तीचा भोळा-भाबडा विचार “अंगारा लावल्यान चमत्कार घडेल”  मलाही तसच वाटलेलं कारण “देव” ज्यावर विश्वास ठेवलेला, त्याचाच हा अंगारा, तो काम करेल आणि जे वैद्यक शास्त्र करू शकल नाही ते काम “अंगारा” करू शकेल पण तस काहीच झाले नाही....बाबांचा रक्तदाब दुपारनंतर जो खालावत गेला तो सामान्य झालाच नाही आणि ११ में २०११ ला “बाबा” आम्हाला सोडून गेले.....
          आज ५ वर्षे होवून गेली तरी पण याचा विसर अजिबात होत नाही. आज जेंव्हा माझी पत्नी सौ.आदिती, आदित्य व आरोहीस (माझी मुल) अंगारा लावते तेंव्हा आपसूकच माझ्या डोक्यात येत काय साध्य होणार ? पण तिची नितांत श्रद्धा असल्याने तसे करण्यात तिला आनंद मिळतो. आदिती जेंव्हा मुलांना अंगारा लावते तेंव्हा मी हॉस्पिटल मधील ते दृश्य अनुभवतो आणि वाईट वाटत पण परत वाटत त्या “शक्ती” वर विश्वास ठेवलाय ना  ! मग किंतु-परंतु ला स्थान नाही !!
          मी अजूनही देव मानतो, ती शक्ती आहे हेच खरे !! पण प्रारब्ध कुणालाच चुकत नाही, बाबांचा सहवास हा माझ्यासाठी तेवढाच होता, हे माझे प्रारब्ध होते आणि ते मी स्वीकारले......

अमित कामतकर
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मी सोलापूरचं आय. टी. पार्क बोलतोय ......

ब्रॅंडींग लीडरशिप

सार्वजनिक उत्सव – आज गरज आहे ?