सेवाभाव
“सेवाभाव”
हा प्रत्येक मनुष्याच्या आचरणात असावा असे वाटते पण व्यावसायिकता एवढी वाढली आहे
कि “सेवाभाव” हा सुद्धा “व्यावसायिक सेवाभाव” झाला आहे. निस्वार्थी सेवाभाव पहायला
मिळतो का ? तर हो, तो आजही पहायला मिळतो, अर्थात मी फक्त माझा अनुभव सांगत आहे ! बाकी तो
कुणाप्रती असावा, कुणाप्रती असू नये हे मला सुचवायचे नाही हे मात्र नक्की !!
घरामध्ये सेवाभाव अनुभवता येवू शकतो, पहा कधी प्रयत्न करून ... साध उदाहरण जर घेतल
कि, दुकानात सहकुटुंब जाताना, दुकानाचे दार आपण प्रथम आत
गेल्यास आपली मुल व बायको आत (दुकानात) येई पर्यंत आपण दार धरून ठेवतो कि आपले आपण
आत जातो ? यातून एकमेकांची काळजी घेणे हा हेतू तर दिसतोच पण सोबत सेवाभावाची शिकवण
आपण आपल्या मुलांना देत असतो , मी म्हणेन हे “बाळकडू” जर मुलांना दिल गेल तर आपसूकच
त्यांच्यात ते रुजेल आणि भावी पिढीला याचे वेगळे डोस द्यावे लागणार नाहीत. किती
साधी सोपी गोष्ट आहे , पहा अमलात आणून खूप आनंद मिळेल.. १९६६ साली “बादल” या संजीवकुमार
अभिनित चित्रपटातील आणि मन्ना डे यांनी गायलेले एक सुंदर गीत आहे “अपने लिये जिये
तो क्या जिये, तू जी ऐ दिल जमाने के लीये” अर्थ खूप मोठा आहे अर्थात या प्रकारची
अनेक गाणी आपण ऐकली असतील पण कधी वागण्याचा प्रयत्न केला आहे ? विचारा स्वत:ला , नसेल तर एकदा इच्छेला प्रयत्नांची
जोड द्या !!
पुण्यातील एका “केयर सेंटर” ला
भेट देण्याचा योग आला. हे केयर सेंटर (खास कर्करोगी रुग्णांसाठी) औषध निर्माण
क्षेत्रातील दिग्गज कंपनी चालविते. जे कर्करोगी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर
आहेत, ज्यांच्यावर उपचार होवू शकत नाही असे रुग्ण येथे येतात व हे केयर सेंटर
त्यांची संपूर्ण काळजी पूर्णपणे मोफत घेते. हा सेवाभाव व औदार्य मनाला स्पर्शून
गेलं आणि वाटलं फक्त पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा मनाने देखील श्रीमंत असण तितकच
महत्वाच आहे.हे केयर सेंटर रुग्णांकडून कोणत्याच स्वरूपात पैसे घेत नाही.
रुग्णांचा औषध उपचाराचा खर्च केयर सेंटर करत. रुग्णांसोबत रुग्णाचा एक नातेवाईक
येथे राहू शकतो. त्याची राहण्याची व्यवस्था देखील केयर सेंटर करत. फक्त नातेवाईकास
स्वत:चा जेवणाचा खर्च (अगदी अत्यल्प दरात ) करावा लागतो.
केयर सेंटर मध्ये येणारा प्रत्येक रुग्ण
हा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात असतो, रुग्णाच मरणं सुलभ व्हाव त्याला वेदना होवू नयेत त्यासाठी हा प्रपंच
हि कंपनी करते !! डॉक्टरांचे प्रयत्न जेंव्हा मेडीकली संपतात आणि आता काहीच करण
शक्य नसत तेंव्हा रुग्णास या केयर सेंटर मध्ये प्रवेश दिला जातो आणि त्यास
होणाऱ्या यातना कशाप्रकारे कमी होतील , उपलब्ध क्षण कसे आनंदात व्यतित करता येतील यावर
हे केयर सेंटर काम करते. मग त्यात रुग्ण व नातेवाईकासाठी योगा, करमणुकीची साधन, नृत्य, कला, भेट कार्ड तयार करणे आदी बाबींचा
समावेश करण्यात आला आहे. मृत्युच्या एवढ्या समीप असून देखील रुग्णाच्या व
नातेवाईकाच्या डोळ्यात कुठेच नैराश्य दिसून आले नाही. आताचा क्षण जगण्याची कला
प्रत्येकाने अवगत केली आहे असे म्हणाल्यास ती
अतिशयोक्ती होणार नाही. सेंटर ची माहिती करून देण्यासाठी आलेल्या केंद्र
प्रमुख मैडम, स्मित हास्याने स्वागत करून,
तितक्याच उत्साहात सेन्टरच्या कामाची माहिती देत होत्या, मधेच एखाद्या
स्वयं-सेवकाशी, रुग्णाची विचारपूस तेही
त्याच्या नावाने (पेशंट नंबर ने नाही). या सर्व बाबीत सेवाभाव च दिसत होता तोही
प्रामाणिक. आम्ही फक्त सेंटर पहायला आलो आहोत हे त्यांना नक्की माहिती होत, पण
तरीही तो उत्साह एक शिकवण देवून गेला !!
अजून एक महत्वाची बाब म्हणजे ज्या घरचा कर्ता
माणूस ह्या रोगाचा बळी ठरत असेल तर त्याच्या पत्नीस उपजीविकेचे साधन निर्माण करून
देण्यासाठी परिचारिकेचे, टेलरिंग चे प्रशिक्षण दिले जाते, होतकरू तरुण, तरुणी देखील
या प्रशिक्षणाचा लाभ घेवू शकतात.जो पर्यंत रुग्णाचा श्वास सुरु आहे तो पर्यंत
रुग्णाची काळजी आणि त्यानंतर ज्या नातेवाईकाने रुग्णाची साथ केली आहे त्याच्या “श्वासाची”
काळजी हे केयर सेंटर घेत हि बाब खूपच अभिनंदनीय आहे. Life after death हा प्रकार काय आहे आणि त्याची गरज किती मोठी आहे
हे येथे आल्यावर कळतं. ज्याच आयुष्य रुग्णाच्या जाण्याने उध्वस्त झालेलं असत अशा
सर्वाना पुन्हा जगायला शिकवणही खूप गरजेच असतं म्हणूनच Life after death या केयर
सेंटर मध्ये अनुभवता येईल. सेवा करणारे डॉक्टर्स, परिचारिका आणि सेवेत योगदान
देणारे स्वयं-सेवक यांना रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांशी संभाषणाचे प्रशिक्षण
दिले जाते, हे एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. केयर सेंटर असल्याने स्वच्छता, टापटीप,
नीट-नेटके पणा आलाच तोही सेंटर ने प्रार्थमिकतेने जपला आहे.
या भेटीने “सेवाभाव” ची नवीन व्याख्या
उमजली आणि या सेवेत आपणही खारीचा वाटा उचलावा अशी भावना निर्माण झाली.
अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा